ठळक मुद्दे* आफ्रिकेच्या जंगलाचं भौगोलिक स्थान असं आहे की तुम्हाला या ठिकाणी सूर्याच्या अगदी उदयापासून ते अस्तापर्यंत प्रकाशाच्या हजारो छटा अनुभवायला मिळतात. या जंगलाचं सौंदर्य या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर आणखीनच उठून दिसतं.*प्राण्यांच्या अनेक जाती-प्रजाती इथे पाहायला मिळतात. झेब्रा, जिराफ, हरणं, सांबर आणि अनेक कधीही न पाहिलेले पक्षी, सरपटणारे प्राणीही तुम्हाला इथे दिसतील. इतक्या सगळ्या प्राण्यांना एकत्र ठेवणारी ही जगातली सर्वात मोठी नैसर्गिक इकोसिस्टम मानली जाते.* घनदाट जंगलाचं सौंदर्य हवेतून पाहण्याची संधी मिळणार असेल तर? आफ्रिकेच्या जंगलात हॉट एअर बलूनच्या माध्यमातून जंगल अनोख्या पद्धतीनं एक्सप्लोअर करण्याची संधी मिळते.

 - अमृता कदम


जंगलातलं पर्यटन म्हटलं की सर्वांत आधी आठवते ती आफ्रिकन सफारी. जैवविविधतेनं नटलेल्या या परिसरात फिरताना इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वृक्ष-वनस्पती दिसतात की हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींचं तीर्थक्षेत्रच मानलं जातं. तुम्ही निसर्गप्रेमी असा किंवा फोटोग्राफर आफ्रिकेच्या जंगलातलं अद्भुत निसर्गसौंदर्याचा अनुभव क्वचितच दुस-या कुठल्या ठिकाणी मिळू शकतो. ही सफारी आयुष्यात एकदा तरी अनुभवलीच पाहिजे असं म्हटलं जातं ते का याची काही ठळक कारणं आहेत.

फुल-डे सफारी

धरतीवरच्या या स्वर्गात जर तुम्हाला पूर्ण दिवसभर भटकायची संधी मिळणार असेल तर लोक काही तासांच्या तिकीटाकडे का वळतील? अगदी सूर्योदयासोबत दिवस सुरु करून तुम्ही पूर्ण दिवस तुम्ही इथल्या जंगलात काढू शकता. अशी सुरूवात केल्यामुळे वेगवेगळ्या वेळांमध्ये तुम्हाला प्राणी दिसण्याची शक्यताही अधिक वाढते. या फुल डे सफारीत नास्ता-जेवणासाठी काही विशिष्ट स्टॉपही उपलब्ध असतात.

 फोटोग्राफीची सर्वोत्तम संधी

फोटोग्राफीत पुरेसा प्रकाश हा किती महत्वाचा असतो हे तुम्हाला कुठलाही व्यावसायिक फोटोग्राफर सांगेल. आफ्रिकेच्या जंगलाचं भौगोलिक स्थान असं आहे की तुम्हाला या ठिकाणी सूर्याच्या अगदी उदयापासून ते अस्तापर्यंत प्रकाशाच्या हजारो छटा अनुभवायला मिळतात. या जंगलाचं सौंदर्य या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर आणखीनच उठून दिसतं. ज्यामुळे घरी परतल्यावरही तुम्ही या अविस्मरणीय सफारीची मजा किमान काही वर्षे तरी विसरणार नाही.

अद्भुत जैवविविधता
असं म्हणतात की कुठलीही आफ्रिकन सफारी ही सिंह, चित्ता, हत्ती, गेंडा, रानगवा या पाच प्रमुख प्राण्यांच्या अर्थात ‘बिग फाइव्ह’च्या दर्शनाशिवाय पूर्णच होत नाही. अर्थात ही केवळ झलक असते. याशिवायही प्राण्यांच्या अनेक जाती-प्रजाती इथे पाहायला मिळतात. झेब्रा, जिराफ, हरणं, सांबर आणि अनेक कधीही न पाहिलेले पक्षी, सरपटणारे प्राणीही तुम्हाला इथे दिसतील. इतक्या सगळ्या प्राण्यांना एकत्र ठेवणारी ही जगातली सर्वात मोठी नैसर्गिक इकोसिस्टम मानली जाते.

 रस्ता सोडून जंगलात भटका

जंगलात फिरताना जर तुम्हाला वहिवाटीचा रस्ता सोडून हवं तिथे भटकण्याची संधी मिळत असेल तर यापेक्षा जास्त थ्रिलिंग काय असू शकतं?प्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलातला बराचसा भाग हा वाहतुकीसाठी प्रतिबंधित असला तरी काही ठिकाणी मात्र तुम्हाला ही संधी जरु र मिळते. अशा ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला बाईक किंवा एसयूव्ही भाड्याने मिळते. या माध्यमातून तुम्ही एका जबरदस्त साहसाचा अनुभव घेऊ शकता.

हॉट एअर बलून्स

घनदाट जंगलाचं सौंदर्य हवेतून पाहण्याची संधी मिळणार असेल तर? आफ्रिकेच्या जंगलात हॉट एअर बलूनच्या माध्यमातून जंगल अनोख्या पद्धतीनं एक्सप्लोअर करण्याची संधी मिळते. इथल्या मसाई मरा नदीवरून फिरताना काठावरचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. शिवाय आधीच निसर्गसौंदर्यानं नटलेल्या या जंगलाची मजा आकाशातून आणखी चांगल्या पद्धतीनं अनुभवता येतात. निसर्गसौंदर्य अगदी जवळून अनुभवण्याची इच्छा असेल, डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर पाहिलेले प्राणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे असतील तर किमान एकदा तरी आफ्रिकन सफारीवर जायलाच हवं.