आगरी भाषा बोलताना तरुण संकोचतात : डॉ. पाटील यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:32 PM2019-01-03T16:32:47+5:302019-01-03T22:16:35+5:30

संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक स्थानिक भाषा वर्ष २०१९ विशेष

Youngsters hesitate to speak Agri language: Dr. Patil | आगरी भाषा बोलताना तरुण संकोचतात : डॉ. पाटील यांची खंत

आगरी भाषा बोलताना तरुण संकोचतात : डॉ. पाटील यांची खंत

googlenewsNext

- आमोद काटदरे

ठाणे : शिक्षणामुळे आगरी समाज सुशिक्षित झाला आहे. त्यामुळे मराठीतील प्रमाणित भाषेच्या वापराकडे कल वाढला आहे. यामुळे आगरी माणसाला आज आपली भाषा बोलताना संकोच वाटू लागला आहे. आपली भाषा, त्यातील साहित्य, मौखिक परंपरा, लोककथा, लोकगीते, म्हणी, तसेच परंपरा टिकवण्यासाठी ही भाषा घराघरांमध्ये बोलण्याबरोबरच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या नवीन पिढीला शिकवण्याची गरज आहे, असे मत आगरी भाषेचे अभ्यासक डॉ. अविनाश पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्र संघाने २०१९ हे वर्ष स्थानिक भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर केले आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी, कोळीकडे प्रामुख्याने पाहिले जाते. प्रत्येक मैला गणिक भाषा बदलते त्यानुसार जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या कातकरी, कोकणा, वारली, ठाकूर ‘क’ आणि ठाकूर ‘म’ या भाषा असल्याची नोंद भाषातज्ज्ञांनी केली आहे.


आगरी भाषेबाबत पाटील म्हणाले की, आगरी भाषा बोलणाºयांचे प्रमाण घटू लागले आहे. नवीन पिढीचा ओढा सध्या मराठीपेक्षाही इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्याकडे अधिक आहे. साधारण पन्नास-साठीच्या पुढची मंडळी आगरी भाषा बोलतात. परंतु, ही मंडळी देखील तरु ण, लहान मुलांशी बोलताना संकोचतात. अनेकांना मागसलेपणाची अथवा आपण गावंढळ असल्याची भीती वाटते. मालवणी भाषा जशी सर्रास बोलली जाते, तसे आगरीबाबत सध्या होताना दिसत नाही. आगरी भाषा टिकवण्यासाठी ठिकठिकाणी त्याचे वर्ग भरवण्याची गरज आहे. नवीन पिढीला आपली भाषा, त्यातील शब्द, लहेजा, भाषा सौंदर्य, व्याकरण, म्हणी, मौखिक लोकगीते विशेषत: धवलगीते हे भाषावैभव माहिती नाही. हे भांडार त्यांच्यापुढे मांडण्याची गरज आहे. गजानन पाटील, सर्वेश तरे, मोरेश्वर पाटील यांनी आगरी शाळेची अभिनव कल्पना राबवली. तिला युवा पिढीचा चांगला प्रतिसादही मिळाला.

पाटील पुढे म्हणाले, की आगरी भाषा, साहित्याच्या संवर्धनासाठी अनेक संस्थांचे योगदान मोठे आहे. मोहन भोईर यांच्या जाणीव प्रकाशनतर्फे विविध पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. आगरी साहित्य विकास मंडळ, १९०१ मध्ये मुंबईत स्थापन झालेले आगरी ज्ञात हितवर्धक मंडळ, ठाण्यातील अखिल आगरी हितवर्धक मंडळ, दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली अखिल आगरी समाज परिषद आजही ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे. ‘आगरी दर्पण’ हे मासिक ते प्रसिद्ध करीत आहेत. दीपक म्हात्रे त्याचे संपादक आहेत. मुंबईतील नायगाव येथून १९८४-८५ पासून ‘आग्रसेन’ हे मासिकही प्रसिद्ध होत आहे. प्रमोद ठाकूर त्याचे संस्थापक संपादक आहेत. तर, प्रा. वासंती ठाकूर सध्या त्याचे संपादन करत आहेत. तसेच अखिल आगरी सामाजिक संस्था, पेण तसेच आगरी यूथ फोरम, डोंबिवली यांचेही योगदान परंपरा, वसा टिकवण्यात मोठे आहे.


आगरी बोली, लोकसंस्कृती व साहित्य परंपरा या विषयावरील प्रबंधाबाबत पाटील यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाली आहे. आगरी समाजाची भाषा, परंपरा इतरांना समजावी, यासाठी त्यातील निवडक प्रकरणांचे पुस्तकही आगरी यूथ फोरमने प्रकाशित केले आहे. आगरी भाषेच्या संशोधनाबाबत पाटील यांनी केलेल्या कार्याबाबत त्यांचा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी गौरवही केला आहे. पाटील यांच्या प्रबंधात आगरी बोली लोकसंस्कृती व परंपरा, भूमिका, आगरी समाज प्राचीन इतिहास, आगरी समाज आर्वाचन इतिहास, आगरी बोलीतील लोकसाहित्याची मौखिक परंपरा त्यात धवलगीते, गणपती, होळी, शेतावरची गाणी, श्रमपरिहार गीते, आगरी बोली मौखिक लोककथांची परंपरा, आगरी बोली आर्वाचन साहित्य परंपरा (१९८४ ते २०१७ कालखंड), आगरी बोलीतील कादंबरी, साहित्य, साहित्य समीक्षक, आत्मचित्रे, कथा, कविता, नाटके तसेच आगरी बोलीतील लावणी व वाङ्मयीन परंपरा (१९३४ पासून), आगरी भाषिक सौंदर्य, आगरी बोली उद्भव आणि विकासमध्ये व्याकरण, म्हणी, वाकप्रचार तसेच आगरी सामाजातील सामाजिक व साहित्य चळवळ यावर आधारित प्रकरणे आहेत.

पाटील यांनी सांगितले की, आगरी समाजातील लग्न, हळद आदी मंगल कार्यांमध्ये धवले गायले जातात. लग्नकार्यात लग्न मांडव स्थापनेपासून, देव उठवण्यापर्यंतच्या विधीमध्ये धवले गीत गाण्याचा मान धवलारीण यांना असतो. धवल गीतांचा संदर्भ महानुभव पंथांत आढळतो. महादंबा ही पहिली धवलारीण व आद्य कवयित्री. तिने गोविंद स्वामी यांच्या लग्नात कार्यात पहिले धवलगीत सादर केले. ते ७० ते ८० कडव्यांचे होते. त्यातील काही ओळी पुढील प्रमाणे

‘सर्वेश्वराच्या शिरी धरूनिया चरणे, मग धवली गायीन गोविंदुराणा जेणे रु क्मिणी हरियली तेणे पवाडे केले अद्भूत, पाविजे परम गती भक्ती आइकता कृष्णा चिरत्र.’

धवल गीते ही मोठी लोकगीतांची परंपरा आज आगरी समाजाकडे आहे. धवले गीते पुस्तकातूनही प्रसिद्ध झाले असले तरी ही मौखिक परंपरा आहे. ती टिकवण्यासाठी आज भावी पिढीने पुढे येण्याची खरी गरज आहे.

पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख व बोली भाषांचे प्रमुख विवेक कुडू म्हणाले, की बोली भाषांतील जुने शब्द लोप पावत आहेत. परंतु, या शब्दांचा वापर केला तर सध्या विनोद निर्माण होत आहेत. कोणतीही बोली भाषा ही गावठी नसते. त्यामुळे ग्राम संस्कृतीही मरण पंथाला लागली आहे. शहरांकडे होणारे स्थलांतर त्याला तितकेच कारणीभूत आहे. पारंपरिक व्यवसाय जसे संपुष्टात येत आहेत, तसे त्यांच्याशी निगडीत व्यावसायिक बोलीतील शब्दही मागे पडत आहेत. उदा. नांगर हाकलणे, पागा, ओटा, बैल हे शब्द कमी वापरात येत आहेत. आज आजीच्या काळातील मंडळीना पूर्णत: बोली भाषा येते. तिच्या मुलाला बोली आणि प्रमाणित भाषा येते. तर नातवाला केवळ प्रमाणित भाषा येते. त्यामुळे मधल्या प्रकारातील मंडळींनी आजीचा वारसा आपल्या नातवंडांकडे पोहोचवला पाहिजे. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आपल्या मातृभाषेत इंग्रजीची सरळमिसळ करताना दिसतात. बोली भाषा टिकवण्यासाठी त्याचा जागर गाव पातळीवर व्हायला हवा. शाळा, महाविद्यालय किंवा स्थानिक पातळीवर भाषांचे उपकेंद्र सुरू व्हायला हवीत.

आगरी समाज हा मूळत: कुणबी, म्हणजे शेतीप्रधान आहे. त्यांच्या कष्टांवर व त्याला मदत करुन बलुतेदार व इतर समाज जगत होते. हे सारे आगरातील समाज. हे समाज आगरी (प्रमुख) लोकांबरोबरच त्यांची आगरी बोली बोलत होते व बोलतात. म्हणून या बोलीस केवळ आगरी बोली- जातिवाचक न म्हणता, ‘आगरी बोली’- ‘आगरातील बोली’ म्हणणे संयुक्तिक ठरेल.

कुठे आहे आगरी वस्ती
आगरी समाजाची वस्ती पश्चिम महाराष्ट्रातील खारेपाटात म्हणजे गुजरातच्या दक्षिणेस ठाणे जिल्ह्यातील पालघर ते मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याचे दक्षिणेचे शेवटचे टोक आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव जिल्ह्याचा थोडासा भाग यात आहे. तिथे ही आगर बोली बोलली जाते. अलिबागकडील आगर बोली मूळ स्वरुपात आहे. नवी मुंबईत ती कोळी बोली व आगर बोली, अशी मिश्र स्वरुपात दिसते तर पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, विरार या भागात ती तेथील वाडवळ वगैरेंच्या बोलीत मिसळून गेलेली दिसते. ग्रामीण भागात ही बोली बºयाच स्वरुपात बोलली जाते. विरारकडे ती बरीचशी अनुनासिक ईआहे. ‘ळ’ ऐवजी ‘ल’ आणि ‘ण’ ऐवजी ‘न’ येणे हे या बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य. उदा- सकाळ-सकाल,कोण-कोन, सण-सन.

हाती घेतल्या बाय कुदली
घेतल्या बाय पड्या
देव गेलं माल्याच्या काय मल्या.
काय बाय हलदी खनू-खनिल्या बाय हलदी
भरल्या बाय पड्या
पड्या काय न्हेल्या- गंगंचे तिरी धुयाला
हलदी धुईल्या चोलील्या
गायगोमुतरी उकलिल्या
सूर्याचे किरनी वालईल्या
त्या हलदी बाय चºहेईल्या
चºहईल्या धवले बैलावरी
हलदी उतरील्या, उतरील्या
मंडपी सोनशेल्यावरी
हलदी बाय चºहेईल्या
.....बायचे अंगावरी
(मौखिक परंपरेतून)


आगरी भाषेचे व्याकरण
सर्वनामे
आगर बोलीत सर्वनामे प्रमाण बोलीप्रमाणे सर्वच न येता काहीशा फरकाने येतात. प्रथम व द्वितीया पुरुषवाचक सर्वनाम आपणच्या जागी आपन व स्वत:च्या जागी सोता, खुद्द, खुद अशी सर्वनामे येतात.

क्रियापदे
आगर बोलीत नपुंसकलिंगाचा विचार होत नाही. ते पुल्लिंगामध्येच धरले जाते. ते काजळ- तो काजल, ते पुस्तक-तो पुस्तक. त्यामुळे वाक्यात कर्ता, कर्म जरी नपुंसकलिंगी आले तरी क्रियापद त्याप्रमाणे येईलच असे नाही. उदा. त्यानी घराचा दार उघारला (त्याने घराचे दार उघडले) इथे ते दार ऐवजी तो दार पुल्लिंगी शब्द वापरुन क्रियापद आले आहे. वर्तमानकाळात क्रिया चालू असताना प्रश्नार्थक क्रियापद येते तेव्हा करता-करताव, खाता-खाताव अशी रुपे होतात.


आगरी अंकगणित
जुन्या म्हाताऱ्या अशिक्षित माणसांना शक्यतो वीसच्या वर अंक मोजता येत नसत. मग ‘यक ईसा (वीस) न यक’, ‘यक ईसा न दोन’ असे ते मोजत. ‘यक इसा’ म्हणजे वीस, ‘दोन इसा’ म्हणजे चाळीस असे मोजत. एका हातात तीन वस्तू व दुसºया हातात दोन वस्तू घेऊन एका वेळेस ३ अधिक ५ बरोबर पाच मोजत. त्यास एक ‘हातोळी’ म्हणत. विसाच्या चार ‘हातोळ््या’ करीत. असे वीस पाच वेळा मोजत, असे शंभर होत.
................
आगरी उखाणे
आगर भाषेमध्ये ‘उपडा तांब्या बोंब मारी’ (रिकामं भांडं आवाज करी/घंटी), ‘भुजलेला निवटा झाडावर उडं’ (कोयता चालणे), ‘आभावरशी आल्या आयाबाया त्यांच्या लाललाल डोया’ (मिरच्या), ‘यके बाटलीन दोन रंग’ (अंडे) असे नानाप्रकारचे उखाणे आहेत.
............
(लेखक : शंकर सखाराम देशमुख)
(पुण्यातील पद्मगंधा प्रकाशनच्या भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण-महाराष्ट्र या ग्रंथावरून साभार)

Web Title: Youngsters hesitate to speak Agri language: Dr. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.