World Sparrow Day 2019 celebration in thane | World Sparrow Day 2019 : ठाण्यात जागतिक चिमणी दिन साजरा
World Sparrow Day 2019 : ठाण्यात जागतिक चिमणी दिन साजरा

ठळक मुद्देठाणे येथील धर्मराज्यच्या कार्यकर्त्यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त तलावपाळी, जांभळी नाका, नौपाडा परिसरात चिऊताईचे घरटे वाटप करून चिमणीच्या संवर्धन व संगोपनाचे आवाहन केले.मोहम्मद दिलावर या भारतीय पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने 2010 मध्ये प्रथमच 20 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस' साजरा केला.  चिमणीसारख्या दैनंदिन जीवनातल्या साध्या पक्ष्यांचे अस्तित्त्व हे निसर्ग-पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करणे हा चिमणी दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

ठाणे - ठाणे येथील धर्मराज्यच्या कार्यकर्त्यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त तलावपाळी, जांभळी नाका, नौपाडा परिसरात चिऊताईचे घरटे वाटप करून चिमणीच्या संवर्धन व संगोपनाचे आवाहन केले आहे. मोहम्मद दिलावर या भारतीय पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने स्थापन केलेल्या, "नेचर फॉर एव्हर सोसायटी ऑफ इंडिया" या सामाजिक संस्थेने, फ्रान्स वगैरे देशांमधल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 2010 मध्ये प्रथमच 20 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस' (world sparrow day) साजरा केला.  सर्व भारतीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. 

चिमणीसारख्या दैनंदिन जीवनातल्या साध्या पक्ष्यांचे अस्तित्त्व हे निसर्ग-पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते, हे अधोरेखित करणे हा चिमणी दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.  पृथ्वीतलावर 'चिमणी' हा छोटेखानी पक्षी, वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र आढळतो. निसर्ग-पर्यावरणात, या साध्या जीवाचं महत्त्वं चीनमध्ये 1959-61 च्या दरम्यान, चीनचे तत्कालीन अध्यक्ष माओत्सेतुंग यांच्या एका अविवेकी व अतिरेकी निर्णयाने सर्व जगाला कळून चुकले. चिमण्या धान्यपिकांच्या कणसातले दाणे टिपून खातात म्हणून माओत्सेतुंग यांनी धान्य उत्पादन अधिक व्हावं यासाठी चिमण्यांची सार्वत्रिक हत्या करण्याचे फर्मान सोडले होते. अशातऱ्हेने मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचा नाश करण्यात आल्यानंतर, काळी काळांतर चीनमध्ये विविध पिकांवरील किटक व किडीचे प्रमाण एवढे बेसुमार वाढले (ज्या, किडी-कीटक एरव्ही, चिमण्या खाऊन फस्त करायच्या) की, चीनभर सगळी पिके शेतकऱ्यांच्या हातची जाऊन 2 कोटीच्यावर चिनी लोकं दुष्काळ पडून उपासमारीने मेले. 

आपल्या आधुनिक राहत्या इमारतींमध्ये चिमण्यासारख्या छोट्या पक्षांना (जे, पूर्वी कौलारु घरांच्या आश्रयाने एखाद्या खोपटात वा खोप्यात आपला संसार थाटायचे) आश्रय मिळेनासा झाला. शिवाय, या मोबाईलने व्यापलेल्या जगात, भल्यामोठ्या शक्तिमान मोबाईल टॉवर्समधून ऊत्सर्जित होणाऱ्या हानिकारक इलेक्ट्रो-मॅग्नेटिक प्रारणांमुळे (electro-magnetic radiation) व इतर प्रदूषणामुळे चिमण्यांसारख्या छोट्या सजीवांचं अवघं अस्तित्वचं धोक्यात आलं आहे.  त्याचबरोबर निसर्ग-पर्यावरणाचा समतोलही पूर्णत: ढासळू लागला आहे. मानवी-अस्तित्वासह संपूर्ण सजीवसृष्टीला वाचविण्यासाठी युध्दपातळीवरुन सर्वकष प्रयत्न व्हायला हवेत व पूर्वीसारखीच साधीसुधी निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैलीच माणसांनी अंगीकारली पाहीजे  हा ही या 'आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसा'चा (world sparrow day) महत्त्वपूर्ण संदेश आहे. 


Web Title: World Sparrow Day 2019 celebration in thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.