कल्याणच्या महापौरपदाचा दावा भाजपा सोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:38 AM2018-04-23T03:38:04+5:302018-04-23T03:38:04+5:30

उल्हासनगरच्या सत्तेसाठी तडजोड : ओमी टीम काकुळतीला, साई पक्ष नरमला, शिवसेनेला अचानक लागली सत्तेची लॉटरी

Will the Kalyan Mayor's claim leave the BJP? | कल्याणच्या महापौरपदाचा दावा भाजपा सोडणार?

कल्याणच्या महापौरपदाचा दावा भाजपा सोडणार?

Next

सदानंद नाईक।


उल्हासनगर : पक्षाचाच एक भाग असलेल्या ओमी टीमला काहीही झाले तरी सत्तेतील पदे मिळू द्यायची नाहीत, असा पण केलेल्या भाजपातील असंतुष्ट गटामुळे उल्हासनगरात शिवसेनेला सत्तेची लॉटरी लागली आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या वाटाघाटी सुरू झाल्याने ओमी टीम काकुळतील आली असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मूठभर सदस्यांच्या बळावर भाजपाला हवे तसे वाकवण्याचा प्रयत्न करणारा साई पक्षही नरमला आहे. उल्हासनगरमधील भाजपाचे सध्याचे महापौरपद अबाधित रहावे अशी शहारध्यक्ष कुमार आयलानी यांची इच्छा असल्याने त्या बदल्यात भाजपा कल्याण-डोंबिवलीचे महापौर सोडण्यास राजी झाल्याचे सांगण्यात येते.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपाच्या सत्तावाटपाच्या करारानुसार मे महिन्यात शिवसेनेकडून वर्षभरासाठी भाजपाला महापौरपद मिळणार होते. त्यासाठी फिल्डिंग लावलेल्या इछुकांची निराशा होण्याची शक्यता आहे.
उल्हासनगरच्या राजकारणातील माजी आमदार कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्या टीममधील शीतयुद्ध भडकल्याने हातची सत्ता जाऊ नये यासाठी भाजपाने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील एमी टीमचे महत्त्व संपेल. शिवाय साई पक्षाची गरज उरणार नाही. तेथे सतेत शिवसेनेला वाटा दिला जाईल. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करून ओमी कलानी गटाची कोंडी केली, तर तो गट फुटून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाच्या जागा शिवसेनेपेक्षा कमी होतील. तरीही तेथील महापौरपद भाजपाला टिकवायचे आहे. सध्या कुमार आयलानी यांची पत्नी मीना या महापौर आहेत आणि त्यांना त्यांच्या महापौरपदाची अडीच वर्षे पूर्ण करायची असल्याने शिवसेनेला सध्या तरी त्या पदासाठी संधी मिळणार नाही. त्यामुळे त्या बदल्यात स्थायीसह काही समित्या वाटून घेण्याचा पर्याय आहे. पण उल्हासनगरचे महापौरपद लगेच मिळणार नसेल, तर त्या बदल्यात भाजपाने कल्याण-डोंबिवलीचे वर्षभरासाठी मिळणारे महापौरपद सोडण्याची तयारी दाखवल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. त्याऐवजी कल्याण-डोंबिवलीत अन्य पदे भाजपाला मिळतील, अशी ही तडजोड आहे. त्यावर वाटाघाटी सुरू आहेत.
ंओमी कलानी यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने भाजपातून फुटून जर ते बाहेर पडले तर सतत वेगवेगळ््या मुद्द्यांवरून पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत. अजूनही भाजपाशी जुळवून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश आले नाही, तर पालिकेत बाजपाची कोंडी करून विधानसभेची तयारी करण्याचा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे.
साई पक्षाने गेले दशकभर उल्हासनगरच्या सत्तेच्या, पदांच्या नाड्या आपल्या हाती ठेवल्या होत्या. आता भाजपा-शिवसेना सत्तेसाठी एकत्र आल्यावर संख्याबळासाठीही त्यांना साई पक्षाची आवश्यकता नाही. पदांच्या वाटपात वाटेकरी वाढला, तर बंडाळी माजेल. त्यामुळे साई पक्षालाही सत्तेपासून दूर ठेवून ती पदे शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तोंडचा घास साई पक्षाने हिरावून घेतल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते. ते उट्टे काढण्याची आयती संधी त्यांना चालून आली आहे.

भाजपाची सारी गणिते विधानसभेची, तर शिवसेनेची लोकसभेची
विधानसभा निवडणुकीत जरी शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तरी त्या काळात महापौरपद आपल्या पक्षाकडे असणे भाजपाला फायद्याचे ठरेल. शिवाय शिवसेनेचा विरोधही मवाळा असेल. त्यामुळे या दोन्ही शहरात या निवडणुकीचा विचार करून पदांचे वाटप केले जाईल. पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतून मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या मार्गातील काटे दूर करण्यासाठी खूप अगोदरपासून प्रयत्नशील आहेत. उल्हासनगरमधील तडजोड ही लोकसभेसाठी त्यांच्या फायद्याची ठरणार आहे.

मतदारांचा कौल भाजपा-ओमी टीमला : उल्हासनगरच्या मतदारांनी भाजपाला एकट्याला नव्हे, तर भाजपा-ओमी टीमला एकत्र कौल दिल्याचा दावा ओमी टीमने केला आहे. भाजपासोबत आम्ही पाच वर्षे सत्तेत राहणार असल्याचा दावा ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी व्यक्त केला. उल्हासनगरच्या महापौरपदाचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे तो पाळला जाईल आणि मे महिन्यात आम्हाला महापौरपद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Will the Kalyan Mayor's claim leave the BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.