अजित मांडके / ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर हा नव्याने विकसित झालेला पट्टा. तेथील पांढरपेशा, उच्चभ्रू मतदारांमुळे या पट्ट्याला प्रत्येक निवडणुकीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने-शिवसेनेला कडवी झुंज दिली. निसटत्या विजयावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. विधानसभेतील भाजपाची ही
कडवी झुंज आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल.
ओवळा - माजिवडा या मतदारसंघातील काही भाग ठाणे, तर काही भाग मीरा-भाईंदर महापालिकेत जात असला तरी ठाण्याच्या भागातही भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आताच्या घडीला बदललेल्या राजकीय समीकरणांचा आणि प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे येथे फारसे कडवे आव्हान दिसून येत नाही. नव्या समीकरणांचा विचार करून येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते या भागातून
मिळाली होती.
पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडण्यात आल्या आणि तेथूनच सरनाईक यांनी आघाडी घेतली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला काँटे की टक्कर दिली होती. राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांना २० हजार ६८६, मनसेचे सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ आणि कॉंग्रेसचे प्रभात पाटील यांना १३ हजार ५८९ मते मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीत घोडबंदर पट्ट्यात भाजपाचा वरचष्मा दिसून आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह कॉंग्रेस आणि शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला.
२०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत येथून २४ नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन जागांवर अपक्ष, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर कॉंग्रेसने
विजय मिळविला होता. आता ही परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेला येथे पोषक वातावरण असले, तरी भाजपाने विधानसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने मुसंडी मारली होती ते पाहता येत्या ठाणे पालिका निवडणुकीतही भाजपा येथे करिष्मा दाखविणार हे नक्की.
येथील मतदारांचा वर्गही बदलला आहे. पूर्वी हा पट्टा आगरी कोळ्यांचा म्हणून ओळखला जात असे. गेल्या काही वर्षात येथील रस्त्यांचे जाळे मोठे झाले आणि नवनवीन गृहसंकुले उभी राहिली. त्यामुळे उच्च्भ्रू, मध्यमवर्गीय मतदारांचे प्रमाण वाढत गेले. एका जातीचे परंपरागत वर्चस्व उरले नाही. आजवरची मते जरी शिवसेनेच्या पारड्यात पडली, तरी नव्या मतदारांचा कौल निर्णायक ठरू शकतो. त्यामुळेच आता येथील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओवळा माजिवड्यात सेना - भाजपा टक्कर

च्भाजपाने दिव्याबरोबरच घोडबंदर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेला लढत देऊ शकतील, असे तगडे उमेदवार भाजपाकडेही आहेत. त्यामुळे येथे शिवसेना विरुध्द भाजपा या लढतीतील चुरस दिसून येईल.
च्विधानसभा निवडणुकीत सेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते येथून मिळाली होती. पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडल्या आणि सरनाईक यांनी आघाडी घेतली.