कुठल्या मार्गाने जाणार कल्याण-मुरबाड रेल्वे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:42 AM2019-03-18T04:42:07+5:302019-03-18T04:42:27+5:30

कल्याण-मुरबाड रेल्वेची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली जाते. त्यावर मते मिळवून राजकीय पक्ष आश्वासन विसरून जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वेसेवा व्हावी, असे वाटत असेल तर कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कल्याण-मुरबाड न करता ती नगरपर्यंत नेल्यास अधिक फायदा होईल आणि रेल्वेला उत्पन्नही मिळू शकेल.

 Which way will Kalyan-Murbad railway go? | कुठल्या मार्गाने जाणार कल्याण-मुरबाड रेल्वे?

कुठल्या मार्गाने जाणार कल्याण-मुरबाड रेल्वे?

googlenewsNext

- पंकज पाटील, मुरबाड



1950 पासून कल्याण-मुरबाडमार्गे अहमदनगर ही रेल्वेसेवा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १९७०- ७२ च्या दरम्यान या अनुषंगाने ढोबळ सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र त्यानंतरही रेल्वेसेवा केवळ कागदावरच राहिली. मुरबाड आणि कल्याण दरम्यानच्या गावांचा विकास झालेला असला तरी ही रेल्वेसेवा कागदावरूनही पुढे सरकली नाही. कल्याण-मुरबाडमार्गे अहमदनगर ही रेल्वेसेवा आजही व्हावी अशी आग्रही मागणी आहे. मात्र या रेल्वेचा मार्ग बदलण्याचे प्रयत्न गेल्या चार वर्षात झाले. मुरबाडकडे येणारी रेल्वेसेवा टिटवाळामार्गे वळवावी अशी आग्रही मागणी राजकीय हेतूसाठी पुढे आली. त्या अनुषंगाने चार वर्ष केंद्रात पाठपुरावाही झाला. अर्थात पाठपुरावा झाल्यावर मंजुरीही त्याच मार्गाला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. मात्र हा मार्ग ज्या भागातून दाखविण्यात आला आहे तो मार्ग ५० वर्षातही कुणालाही अपेक्षित नव्हता. या मार्गाला मंजुरी देताना रेल्वे प्रसासनाने कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगरमार्गे मुरबाड हा मार्ग दाखविल्याने मुरबाडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमार्गे रेल्वेमार्ग जाणार या विचाराने या दोन्ही शहरातील नागरिक धास्तावले आहेत. मूळात उल्हासनगरमार्गे रेल्वेसेवा नेणे ही काही सोपी बाब नाही. मात्र अशक्य वाटणारी ही रेल्वेसेवा प्रत्यक्षात उतरणार का हाच मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. कल्याण-मुरबाड रेल्वेची निवडणुकीच्या तोंडावर झालेली घोषणा ही राजकीय खेळी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मुरबाड हा एकमेव असा तालुका आहे की त्याच्या चारही बाजूला असलेले तालुके हे रेल्वेने जोडले गेले आहेत. कल्याण, कर्जत, शहापूर आणि अंबरनाथ या चारही तालुक्यांमधून रेल्वे गेली आहे. मात्र एकमेव मुरबाड तालुका हा रेल्वे सेवेपासून वंचित राहिला आहे. मुरबाडकरांना मुंबईसोबत जोडण्यासाठी प्रभावी साधन म्हणजे रेल्वे. यासाठी ७० वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री शांताराम घोलप यांनी त्यासाठी सर्वात आधी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. ही मागणी होती कल्याण - मुरबाड मार्गे नगरला जोडणारी रेल्वेसेवा. मात्र ती सर्वेक्षणापुरतीच मर्यादीत राहिली. घोलप यांच्यापासून सुरू झालेल्या प्रभावी मागणीचा पाठपुरावा आज नव्याने करण्यात आला आहे. कल्याण ते मुरबाड रेल्वेसेवा झाल्यास त्याचा लाभ या भागातील नागरिकांना होणार हे निश्चित. मात्र हा मार्ग निघणार कुठून याबाबत असलेला संभ्रम आजही कायम आहे. चार वर्षांपूर्वी या रेल्वेच्या अनुषंगाने नवीन मागणी करण्यात आली. ती मागणी होती कल्याण-टिटवाळामार्गे मुरबाड ही रेल्वेसेवा. अर्थात ही रेल्वे टिटवाळा मार्गे निघाल्यावर घोटसईमार्गे मुरबाडला जोडण्यात येणार होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ज्या मार्गांचे भूमिपूजन केले तो मार्गच वेगळा निघाला.
या आधी कधीच विचार केला गेला नाही तो मार्ग म्हणजे कल्याण-उल्हासनगर-कांबामार्गे मुरबाड ही रेल्वे. मुरबाड रेल्वेसेवा उल्हासनगरहून येणार हा निर्णय रेल्वेचा धाडसी निर्णय मानला जात आहे. उल्हासनगरमार्गे ही रेल्वे फिरविण्याचे गणित कोणत्याच राजकीय नेत्याला किंवा या
रेल्वेसाठी पाठपुरावा करणाऱ्यांना कळलेले नाही. त्यातच जो रेल्वे मार्ग दर्शविण्यात आला आहे त्याची प्रशासनाने योग्य चाचपणी केली आहे की नाही याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
कल्याणहून मुरबाडला रेल्वे यावी ही मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न सुरू आहे. मात्र चार वर्षांपूर्वी मुरबाड रेल्वे टिटवाळामार्गे मुरबाडला येणार हे गृहीत धरण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील गावांना जोडले गेल्यावर त्याचा विकास होईल अशी अपेक्षा स्थानिकांनी ठेवली. टिटवाळामार्गे रेल्वे आल्यास घोटसई, गोवेली, गुरवली,म्हसकळ,मामणोली आणि परिसरातील गावांना त्याचा लाभ होणार होता. मात्र या ग्रामस्थांच्या वाट्याला निराशा आली आहे. रेल्वेने अचानक ही रेल्वे थेट विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरमार्गे वळविल्याने या गावांना त्याचा लाभ होणार नाही. दुसरीकडे उल्हासनगरमार्गे रेल्वे केल्यास थेट कांबा आणि आपटी या गावांना जोडण्याचे काम केले जाईल. डोंगराळ भागातून ही रेल्वे गेल्यास परिसराचा विकास होण्यास मदत होईल अशी अपेक्षा रेल्वेची आहे. मात्र ज्या मार्गावरून रेल्वे सेवा सरकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्या जागेचा विचार करता बहुसंख्य जागा ही वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. तसेच उल्हासनगरमधून कांबापर्यंत रेल्वेमार्ग निश्चित करणे हे सर्वात आव्हानात्मक काम ठरणार आहे. उल्हासनगरच्या दाट वस्तीतून रेल्वे मार्ग काढणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.

गुगलमॅपवरील रेघोट्या

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. मात्र या मार्गाला मंजुरी देताना रेल्वे प्रशासनाने जागेची पाहणी केली आहे की नाही यावरच शंका व्यक्त केली जात आहे. मूळात टिटवाळामार्गे मुरबाड या मार्गाचा पाठपुरावा सुरू असताना अचानक नवा प्रस्ताव आला कुठून हेच गूढ उकललेले नाही.
रेल्वे प्रशासनाने निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण घोषणा व्हावी या हेतूने कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. मात्र ते करताना जो मार्ग नकाशात दाखविण्यात आला आहे तो मार्ग म्हणजे गुगल मॅपवरील रेघोट्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण नेमका हा मार्ग कोणत्या भागातून आणि पसिरातून जातो हे स्पष्ट दर्शविलेले नाही.
केवळ उल्हासनगरनंतर कांबा, आपटी, पोटगाव आणि मुरबाड या स्थानकांना मार्क करण्यात आले आहे. मूळात उल्हासनगरहून कांबापर्यंत कोणत्या मार्गाने रेल्वे येणार हे श्रेय घेणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला माहित नाही ही सत्य परिस्थिती आहे.

महिनाभरापूर्वी नवा प्रस्ताव आला कुठून

कल्याण-मुरबाड रेल्वे टिटवाळामार्गे नेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी केली. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली. असे असताना रेल्वेकडे नवा प्रस्ताव आलाच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे. उल्हासनगरमार्गे नव्या मार्गाचा प्रस्ताव महिन्याभरापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडे आला होता.

वास्तविक या मार्गाला अंतिम मंजुरी दिलेली नाही. निवडणुकीच्या वातावरणात कल्याण-मुरबाड रेल्वेचे श्रेय लाटण्यासाठी या मार्गाचे भूमिपूजन झाले असे जाहीर करण्यात आले. इतकेच नव्हे तर या मार्गासाठी निधीही मंजूर झाला आहे अशी बॅनरबाजीही केली आहे.

रेल्वे प्रशासनाने अधिकृतपणे या मार्गासाठी तरतूद केलेली नाही. प्रस्ताव स्वीकृतीनंतर मार्गाचा अभ्यास करून तेथून रेल्वे जाणे शक्य आहे की नाही याचा निर्णय घेणार आहे. दुसरीकडे नवा प्रस्ताव कुणी आणला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Web Title:  Which way will Kalyan-Murbad railway go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.