छोटा शकीलच्या भावाकडूनच ‘ती’ शस्त्रे मिळाल्याची नईमची कबुली

By जितेंद्र कालेकर | Published: July 19, 2018 10:15 PM2018-07-19T22:15:21+5:302018-07-19T22:28:44+5:30

कोकेन तस्करी प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने गोरेगावातील नईम खानच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत केला होता. ही शस्त्रास्त्रे छोटा शकीलचा भाऊ अन्वर यानेच दिल्याची कबूली आता नईमने ठाणे पोलिसांना दिली आहे.

weapon got from Chota Shakil's brother: Naim admitted to Thane police | छोटा शकीलच्या भावाकडूनच ‘ती’ शस्त्रे मिळाल्याची नईमची कबुली

नईमच्या घरातून मिळाली एके ५६ सह शस्त्रास्त्रे

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कामगिरीनईमच्या घरातून मिळाली एके ५६ सह शस्त्रास्त्रेनईमला ठाणे कारागृहातून केली पुन्हा अटक

ठाणे : आपल्या घरातून हस्तगत केलेली शस्त्रास्त्रे ही छोटा शकीलचा भाऊ अन्वर याच्याकडूनच मिळाल्याची कबुली नईम खान याने ठाणे खंडणीविरोधी पथकाला दिली आहे. एका अपरिचित व्यक्तीने अन्वरच्या सांगण्यावरून ती आपल्याकडे ठेवण्यासाठी दिली होती, अशीही माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईतील गोरेगाव भागातील नईमच्या घरातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने ५ जुलै रोजी एके-५६ रायफल, तीन मॅगझिन्स, १०८ जिवंत काडतुसे आणि दोन पिस्तूल ही शस्त्रसामग्री हस्तगत केली. १ आॅक्टोबर १९९७ च्या एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये गुंडाळून ठेवलेली ही शस्त्रे छोटा शकीलने पाठवल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांनी वर्तवला होता. कोकेनच्या तस्करीप्रकरणी नागपाडा येथील जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याच चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरेगावातील बांगुरनगरच्या क्रांती चाळीत छापा टाकून पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने ही शस्त्रास्त्रे जप्त केली. या प्रकरणात पोलिसांनी नईमची पत्नी यास्मिन हिला अटक केली. तिच्याकडून सखोल माहिती न मिळाल्याने पोलिसांनी ठाणे कारागृहातून नईमचा ताबा घेतला. छोटा शकीलच्याच सांगण्यावरून मायकल जॉन डिसुझा ऊर्फ राजू पिल्ले, नईम खान आणि नितीन गुरव हे तिघे इक्बाल अत्तरवाला याच्या खुनासाठी शस्त्रसामग्रीसह जोगेश्वरी येथे जमले होते. रफीकअली सय्यद ऊर्फ सीडी यानेही या तिघांना मदत केली होती. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी या चौघांना २० एप्रिल २०१६ रोजी अटक केली होती. तर, छोटा शकील ऊर्फ शकील बाबू शेख, अन्वर शेख, रझाक बलोच, रियाज मेमन आणि तबरेज आलम हे या खून प्रकरणात वॉण्टेड आहेत. नईमला १३ जुलै २०१८ रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला या प्रकरणात १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. याच कोठडीदरम्यान त्याने पोलिसांना ही शस्त्रे अन्वरने २०१४ मध्ये अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ दिल्याची कबुली दिली.
शकीलच्या भावानेच ही शस्त्रे दिल्याने १९९३ च्या बॉम्बस्फोटांशी या शस्त्रास्त्रांचा काय संबंध आहे? किंवा त्यावेळी त्यांचा वापर झाला किंवा कसे, याचाही तपास सुरूअसून ती यापूर्वी वापरण्यात आली किंवा नाहीत, याबाबतचा अहवाल न्यायवैद्यक विभागाकडून अद्याप आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: weapon got from Chota Shakil's brother: Naim admitted to Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.