पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:02 AM2019-06-10T03:02:31+5:302019-06-10T03:03:08+5:30

तुर्भेत रविवारी लोकार्पण : सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च

Walk on the accident due to a pedestrian bridge; | पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

पादचारी पुलामुळे अपघाताला आळा, तुर्भेत रविवारी लोकार्पण

Next

नवी मुंबई : तुर्भे येथील रेल्वे रुळावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. पालिकेच्या निधीतून रेल्वेप्रशासनाने हा पूल बांधला असून, त्यासाठी सहा कोटी ८४ लाख रुपये खर्च आला आहे. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांकडून रूळ ओलांडण्याच्या होत असलेल्या प्रयत्नात होणारे अपघात थांबणार आहेत.

ट्रान्सहार्बर रेल्वेमार्ग व ठाणे-बेलापूर मार्ग झाल्यापासून जनता मार्केट व तुर्भे नाका परिसर विभागला गेला आहे. या दोन्ही विभागाला जोडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने नागरिकांकडून रस्ता तसेच रूळ ओलांडला जात होता. यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यावर पर्याय म्हणून पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पूल उभारून रस्ता ओलांडणाºया प्रवाशांची गैरसोय दूर केली होती; परंतु रेल्वेरुळावर पूल नसल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा मृत्यूच्या दाढेखालून प्रवास सुरूच होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरील पादचारी पूल वाढवून तो रेल्वेरुळावरून जनता मार्केटला जोडावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेविका बेबी पाटील यांनी रेल्वे प्रशासनासह पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील यांनीही सदर मागणीवर जोर दिला होता. त्यानुसार खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे प्रशासनाला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती; परंतु केवळ रेल्वे प्रवाशांसाठीच पादचारी पूल अथवा भुयारीमार्ग बांधण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत होते, यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वेरूळ ओलांडावा लागत होता. याकरिता त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भिंतीलाही भगदाड पाडण्यात आलेले आहे. अखेर पादचारी पुलासाठी लागणारा खर्च देण्याची पालिकेने तयारी दर्शवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. तर आमदार संदीप नाईक यांनीही अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडून त्या ठिकाणी पादचारी पूल आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
जुलै २०१७ मध्ये पालिकेने रेल्वे प्रशासनाला सहा कोटी ८४ लाख रुपयांच्या निधी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेने पूलाच्या कामाला सुरुवात केली. त्यातही अनेक अडथळे आल्यानंतर अखेर रविवारी त्याचे उद्घाटन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, प्रभाग समिती अध्यक्षा उषा भोईर, स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, पूजा मेढकर, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, नगरसेवक मनोहर मढवी, निशांत पाटील आदी उपस्थित होते.

पालिकेने हटवले झेंडे
पुलाच्या कामाच्या श्रेयवादात सुरू असलेल्या चढाओढीतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर शिवसेनेचे झेंडे लावले होते. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला असता एपीएमसी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त लावला होता. त्यानंतर पालिकेने सदर झेंडे हटवल्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्येच पुलाचे उद्घाटन उरकण्यात आले.

खासदारांची उद्घाटनाची वेळ साधली

ऐरोली येथील पालिकेच्या वास्तूच्या उद्घाटनावेळी शिवसेना व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. खासदार राजन विचारे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने राष्टÑवादीने उद्घाटन उरकल्याने हा प्रकार घडला होता.

तुर्भेतील पादचारी पुलाच्या उद्घाटनापूर्वीही श्रेयवादातून राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना असे वातावरण रंगले होते. त्यामुळे या कार्यक्रमास खासदार विचारे वेळेवर पोहोचतील का? याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते.

तर नियोजित वेळेनुसार महापौरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याच्या तयारीत प्रशासन व सत्ताधारी होते. नेमके त्याच वेळी वाहतूककोंडीत अडकलेली गाडी सोडून खासदार विचारे यांनी पायी चालत येऊन उद्घाटनाची वेळ साधली.

Web Title: Walk on the accident due to a pedestrian bridge;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.