मुरबाड पालिकेला ‘हायटेक’ प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:34 AM2019-04-05T04:34:31+5:302019-04-05T04:35:02+5:30

कामकाजासाठी लेखणीचा वापर : संगणकाचा वापर होत आहे कमी

Waiting for 'Hi-tech' in Murbad | मुरबाड पालिकेला ‘हायटेक’ प्रतीक्षा

मुरबाड पालिकेला ‘हायटेक’ प्रतीक्षा

Next

बदलापूर : नव्याने स्थापन झालेल्या मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींमध्ये अजूनही ई-गव्हर्नन्स यंत्रणा राबवण्यात आलेली नाही. नगरपालिका संचालनालयाकडून अद्याप यासंदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने कामकाज संगणकीकृत करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या पालिकांचे कामकाज संगणकीकृत करण्यासंदर्भात आदेश मिळावे, अशी मागणी मुरबाड नगरपंचायतीमार्फत सरकारकडे केली असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी देविदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.

नव्याने स्थापन झालेल्या मुरबाड नगरपंचायतीमधील कामकाज हे आजही लेखणीद्वारेच होत आहे. संगणकीकृत यंत्रणा राबवण्यात येत नसल्याने आजही कामगारांचे पगार जुन्याच पद्धतीने काढले जात आहेत. पाणीपट्टी आणि घरपट्टी हेच केवळ संगणकीकृत आहे. उर्वरित सर्व कामकाज हे लेखी स्वरूपात होत आहे. त्यामुळे मुरबाड पालिकेतील कामकाज संगणकीकृत करण्याच्या हालचाली प्रशासनामार्फत सुरू आहे.
मुरबाड पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना निलंबित केल्याने त्या पालिकेचे कामकाज पाहण्यासाठी अंबरनाथचे मुख्याधिकारी पवार यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.
प्रभारी पद असतानाही त्यांनी पालिकेतील कामकाजात बदल करण्याचे काम हाती घेतले आहे. कामगार आणि अधिकाऱ्यांच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी कार्यालयातील कामकाज संगणकीकरण करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

ई - गव्हर्नन्ससाठी मुरबाडचा पुढाकार

सरकारने मान्यता दिलेले सॉफ्टवेअर वापरून पालिकेचे कामकाज संगणकीकृत करण्याची मागणी करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने सरकारस्तरावर हा पाठपुरावा सुरू आहे. मुरबाड पालिकेच्या निमित्ताने राज्यातील सर्वच नव्या नगरपंचायतींनाही त्या आदेशाचा लाभ होणार आहे.

मात्र, धोरणात अजूनही नगरपंचायतींमध्ये ई-गव्हर्नन्स यंत्रणा राबवण्याबाबत स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे ही यंत्रणा सुरू करण्यासाठी मुरबाडने पुढाकार घेतला आहे.

कामात सुसूत्रता येण्यासाठी आणि सुरुवातीपासून सर्व माहिती संगणकात आल्यावर भविष्यात काम करणे सोपे जाणार आहे. सरकारकडून अजूनही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून यासंदर्भात अभिप्राय मागवण्यात आला आहे. सोबत ई-गव्हर्नन्स यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यासंदर्भातील आदेश येताच यंत्रणा कार्यान्वित होईल. - देविदास पवार, प्रभारी मुख्याधिकारी, मुरबाड
 

Web Title: Waiting for 'Hi-tech' in Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.