वाडा, डहाणूत करप्याचे थैमान; पावसाने मारली प्रदीर्घ दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:44 AM2018-09-19T03:44:40+5:302018-09-19T03:45:02+5:30

भाताची रोपे पडली पिवळी, वरुणराजा बरसण्याची गरज

Wada, trekking trunk; The rainy season | वाडा, डहाणूत करप्याचे थैमान; पावसाने मारली प्रदीर्घ दांडी

वाडा, डहाणूत करप्याचे थैमान; पावसाने मारली प्रदीर्घ दांडी

Next

वाडा : यावर्षी पाऊस उत्तम पडल्याने भातशेती जोमात बहरली होती. भाताचे उत्पादन देखील विक्र मी होईल या आशेवर शेतकरी होता. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तिच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
भाताचे कोठार म्हणून संबोधिले जात असलेल्या वाडा येथील कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. १७६ गावे व दोनशेहून अधिक पाड्यातील १८००० प्रक्षेत्रामध्ये या भाताची लागवड केली जाते. येथील जिनी वाडा कॉलम, सुरती, ४ गुजरात, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसूरी, आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतले जाते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिकरणामुळे येथील मजूर पुण्यात वरती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे.
भातशेतीत एकरी येणारा खर्च व त्यातून मिळालेले उत्पन्न यांची गोळाबेरीज केली असता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शेती तोट्यात चालली आहे. तरीही पारंपरिक व्यवसाय असल्याने शेती ओस ठेवली तर लोक हसतात म्हणून शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेती करावी लागते. यावर्षी पिके बाहेर पडण्याची वेळ आली तरी पाऊस पडत नसल्याने भात पिकावर करपाची लागण झाल्याने पिके पूर्ण वाया वाया जातील अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुरता कोंडीत सापडला आहे. तरी कृषी विभाग मात्र झोपी गेलेला आहे. भात शेतीची पाहणी करायला त्यांना वेळ नसल्याने पिके पूर्ण हातातून जातात की काय अशी भीती शेतकºयाला वाटू लागले आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात....!
मोखाडा : गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने भात पीक संकटात आले आहे जमिनीला तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली असून पाण्याअभावी शेतातील कवळी रोपटी सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी ‘बगळया’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने अनेक विघ्नांवर मात करून हातातोंडाशी आणलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न येऊन ठाकला आहे.
तालुक्यात २५९ गावपाडे असून नागली, भात, वरई, खुरासनी, कुळीद, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात परंतु यामधील ‘भात’ हे पीक प्रामुख्याने घेतले जात असून २ हजार ३७ हेक्टरात भात पीक घेतले जाते. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे १०० टक्के भाताची रोवणी करण्यात आली. परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आली आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अनेक शेतात आता भेगा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दहा दिवसांत पाऊस आला नाही तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
तसेच भेगांचा परिणाम पिकांवर होवू नये यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते विशेष म्हणजे गतवर्षी पावसाने ताण दिल्याने आॅगस्टच्या महिन्यात ही रोवणी करण्यात आली व ही पिके चांगली पिकावीत यासाठी शेवटापर्यत पावसाची आवश्यकता असतांना पावसाअभावी भात पीक पिवळसर पडत आहे. काही भागात वाढत्या तापमानामुळे पीके सुकू लागली आहे. तसेच मागील ढगाळ वातावरणाचा परिणाम कीडींचा प्रादुर्भाव वाढविण्यात झाला आहे. काही भागात ‘खोड किडा’ व बगळयाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाने आणखी ताण दिल्यास कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

करपा रोगामुळे व पाण्याअभावी उत्पादनावर परिणाम
डहाणू/बोर्डी : आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस अक्षरश: गायब झाल्याने पाण्याअभावी नापिकीचा सामना करावा लागेल असे सध्याचे चित्र आहे. गतवर्षी खोडकीडा तर आता करपा रोगाची लागण आणि उंदरांनी उच्छाद मांडल्याने पिक धोक्यात आले आहे. तालुक्यात भात हे प्रमुख पीक १५ हजार हेक्टरात घेण्यात येते. जमीन व पाण्यानुसार २५४५ हेक्टरात हळवे, ९९०६ हे पिक घेतले जाते.
निमगरवे आणि २५४० या गरव्या भाताचीही लागवड केली जाते. यंदा सरासरी 95 टक्के भात लावणी झाली आहे. येथील सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून यावर्षी आतापर्यंत १८०० मिमी पाऊस झाला आहे. तर गतवर्षी २ हजार मिमीचा टप्पा पावसाने ओलांडला होता. यावेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील काही दिवस पाऊस न झाल्याने खाचरातील पाणी सुकले असून पिकं पिवळी पडली. हा एकप्रकारचा रोग असल्याचे म्हणणे आहे.
मागील वर्षी परतीच्या पावसाने आणि खोडकिड्याने बळीराजाला नुकसानीचा सामना करायला लावला होता. शिवाय मागील वर्षी भात पीक विमा योजनेचे पैसे भरले होते, मात्र नुकसान होऊनही आजतागायत त्याची भरपाई निम्यापेक्षा अधिक शेतकºयांना मिळलेली नाही. दरम्यान ग्रामपंचायतीअंतर्गत असलेले कोंडवाडे हद्दपार झाल्याने मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. सर्व समस्यांचा सामना करून जे पीक शेतात उभे राहील ते गुरांमुळे हाती लागणार नाही.

Web Title: Wada, trekking trunk; The rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी