The voters got swollen due to the mix of memories | याद्यांच्या घोळामुळे मतदार झाले घामाघूम
याद्यांच्या घोळामुळे मतदार झाले घामाघूम

डोंबिवली : मतदान करायचे होते, पण मतदारयाद्यांमध्ये नावच नाही, त्यामुळे काय करायचे, अशी घालमेल सर्वत्र दिसत होती. मतदारांच्या सकाळी ७ वाजल्यापासूनच डोंबिवलीतील मतदानकेंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या. आपलेही नाव यादीमध्ये आहे ना, हे पाहण्यासाठी पोलिंग बुथवर मतदारांनी गर्दी केली होती. प्रचंड उकाड्यामध्ये घामाघूम झालेल्या मतदारांच्या चेहऱ्यांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र, काहींना यादीत नाव नसल्याने घरी परतावे लागल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदारयाद्यांतील या सावळ्या गोंधळामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने डोंबिवलीकरांनी सकाळच्याच सत्रात मतदानाचा हक्क उरकण्याचा निर्धार केला होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही सकाळीच सपत्निक स.वा. जोशी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ऊ न वाढायच्या आत मतदारांनी घराबाहेर पडायचे आवाहनही केले.

शहरातील पूर्वेला टिळकनगर, मानपाडा रोड, भगतसिंग रस्ता, पेंडसेनगर, मढवी शाळेजवळ, म्हात्रेनगर, जोशी शाळेचा परिसर, ठाकुर्लीमध्ये पंचायतबावडी, सारस्वत कॉलनी, हनुमान मंदिराजवळच्या परिसरातील महापालिकेची शाळा, शेलारनाका, खंबाळपाडा, कांचनगाव या ठिकाणी तसेच पश्चिमेला जोंधळे शाळेजवळ, संतोषीमाता रोड, दीनदयाळ रस्त्यावर नवरे कम्पाउंड, सम्राट चौक, आनंदनगर, घनश्याम गुप्ते रस्त्यावर जयहिंद कॉलनी, महात्मा गांधी शाळेजवळ, गांधी रोड, भागशाळा मैदान, सुभाष रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, बावनचाळ परिसर, राजूनगर, गणेशनगर आदी परिसरांत बुथ लावण्यात आले होते. आघाडी आणि युतीच्या वतीने हे बुथ लावण्यात आले होते. तेथे नाव शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. विविध पक्षांचे नगरसेवक संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून होते. मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. टिळक पथ, सावरकर रोड, ब्राह्मण सभा परिसरातील मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नितीन प्रभाकर दिघे यांनी नावे गहाळ झालीच कशी, असा सवाल केला. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावेच गायब झाल्याने त्यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

के.बी. वीरा, टिळकनगर, मढवी शाळा, तर पश्चिमेला महात्मा गांधी शाळेतील मतदानयंत्रांमध्ये सकाळी बिघाड झाल्याने मतदारांचा जवळपास अर्धा तास वाया गेला. राजाजी पथ येथील म्हात्रेनगरच्या स्वामी विवेकानंद शाळेत मतदान सकाळी ७.३० वाजता सुरू झाल्यामुळे अर्धा तास वाढवून देण्याची मागणी स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली.

तरुणांनी ऑनलाइन याद्यांमध्ये नावे असल्याची खात्री करून मतदानासाठी रांग लावली; मात्र पुरवणीयाद्यांमध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांची निराशा झाली. त्याबाबत झोनल अधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे धाव घेतली. अखेर, त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. याबाबत, पहिल्यांदाच मतदान करणाºया स्वरूपा दीपक कुलकर्णी हिची प्रतिक्रिया बोलकी होती. पहिल्यांदा मतदान करण्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. मात्र, संघर्षानंतर मतदान करण्याची संधी मिळाल्याचे खूप समाधान आहे, असे स्वरूपा हिने सांगितले.

स्वामी विवेकानंद शाळेतील मतदानकेंद्रावर मूळचे डोंबिवलीकर चंद्रशेखर पिसाट हे पत्नी शमा यांच्यासह ठाण्यातून मतदानासाठी आले होते. मात्र, यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. ५० वर्षांत पहिल्यांदाच ही नामुश्की ओढवल्याचे ते म्हणाले. तर तुकारामनगर येथील रहिवासी नितीन मेहता, सीमा डे यांनाही असाच अनुभव आला. ठाकुर्ली येथील न्यू मॉडेल शाळेतील मतदानकेंद्रावर ईव्हीएम धीम्या गतीने सुरू असल्याने मतदारांना तासभर ताटकळावे लागले. त्यामुळे लांबलचक रांगा लागल्या होत्या.


कल्याणमध्ये मतदानप्रक्रियेला सुरुवात होण्याअगोदरपासूनच आबालवृद्धांनी मतदानकेंद्रांवर रांगा लावल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, तर काही ठिकाणी मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांच्या उत्साहावर ‘ईव्हीएमचे विघ्न’ आल्याचे चित्र भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम मतदारसंघात सोमवारी पाहायला मिळाले. त्याचवेळी शारदा मंदिर शाळेतील मतदानकेंद्रांमध्ये येणाºया मतदारांसाठी आनंददायी मतदान सोहळा पाहायला मिळाला.

पश्चिमेतील शंकरराव चौकाजवळ असलेल्या जोशी शाळेतील मतदानकेंद्रावर सकाळी ७ वाजता गेलेल्या विजय परमार यांना त्याठिकाणचे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे सांगण्यात आले. सुमारे ४० मिनिटे मशीन बंद पडल्याने मतदानास उशीर झाला. मात्र, अन्य मतदारांसाठी वेळ वाढवून द्यायची त्यांची मागणी अधिकाºयांनी ऐकली नाही. तसेच, मतदान यंत्र अंधारात ठेवल्याने त्यावरील उमेदवारांचा तपशील दिसत नसल्याची तक्रार मनोहर भावसार यांनी केली. तर बिर्ला महाविद्यालयात ईव्हीएम सकाळी एक तास बंद पडले होते. त्याबाबत तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी तक्रार केली.


Web Title: The voters got swollen due to the mix of memories
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.