वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांचे ठाण्यात ढोलताशात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:33 PM2017-12-18T18:33:15+5:302017-12-18T18:36:08+5:30

वाहतुकीचे नियम मोडले की त्यांच्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आपण नेहमीच पाहतो. ठाण्यात मात्र थोडा आगळा-वेगळा प्रकार सुरू आहे. येथे वाहतुकीचे नियम मोडले की पोलिसांकडून चक्क ढोल-ताशे बडवून वाहनधारकांचे स्वागत केले जात आहे.

Unique Welcome to traffic rules violators in Thane | वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांचे ठाण्यात ढोलताशात स्वागत

वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांचे ठाण्यात ढोलताशात स्वागत

Next
ठळक मुद्देटॅप मोहीमवाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रमवाहनधारकांना नियमांबाबत माहिती

ठाणे : टॅप (ट्राफिक अवेअरनेस प्रोग्राम) अर्थात वाहतूक जनजागरण मोहिमेंतर्गत वाहतूक शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्याऐवजी त्यांचे ढोल-ताशाने स्वागत केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी भरचौकात केलेल्या या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून नेहमीच जनजागरण केले जाते. तरीही त्याचा फारसा उपयोग नाही. वाहतुकीचे नियम सर्वत्र सर्रास तोडले जातात. अशा वेळी कारवाई केल्यास नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल कटुता निर्माण होते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूक जनजागृती मोहीम सुरु केली. या मोहिमेंतर्गत शनिवारी सिने अभिनेता संतोष जुवेकर यांच्या मदतीने ठाणेकरांनी मजेशीर शिक्षा अनुभवली. यावेळी तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि हरीनिवास सर्कल येथे वाहतूक पोलिसांची पथके संतोष जुवेकर यांच्यासोबत ढोल आणि ताशे घेऊन उभे होते. नियम मोडणार्‍या ठाणेकरांचे यावेळी ढोल-ताश्यांनी स्वागत करण्यात आले. पथकाने वाहनधारकांना त्यांची चूक प्रेमाने लक्षात आणून देत वाहतूक नियमांची माहिती देऊन साक्षर करण्यात आले. यापुढे वाहतूक नियम तोडणार नाही, असे मैत्रीपूर्ण वचन जुवेकर यांनी त्यांच्या स्टाईलने नागरिकांकडून घेतले. महत्वाचे म्हणजे वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली नाही. याउलट तोडलेला नियम लिहिलेली कि-चेन भेट देण्यात आली. काही वाहनधारकांनी ढोल-ताश्यांवर नाचत मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणेकरांनी वाहतूक नियमांचे महत्व समजून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जुवेकर यांनी केले.
रस्त्यावर उभा असलेला वाहतूक अधिकारी लोकांच्या सुरिक्षततेसाठीच झटत असतो. अशा वेळी नागरिकांनीसुद्धा वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे महत्वाचे आहे. या अभिनव मोहिमेद्वारे ठाणेकरांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. अशा मोहिमा यापुढेही राबविण्यात येतील, असे उपायुक्त अमित काळे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Unique Welcome to traffic rules violators in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.