नकोशा स्पर्शांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:07 AM2017-10-10T02:07:20+5:302017-10-10T02:08:12+5:30

परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली.

 Unconscious touch crowd! | नकोशा स्पर्शांची गर्दी!

नकोशा स्पर्शांची गर्दी!

Next

परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. या गडबडीत अनेक महिलांची नको त्या स्पर्शांनी कोंडी केली. एरव्ही, कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी या विकृत स्पर्शांनी स्त्रीमनाचा कोंडमारा होतच असतो, पण बोलत कुणीच नाही. ही विकृती जिथल्या तिथेच ठेचण्याची गरज आहे.
‘गर्दीतून येताजाता हे पुरुष अगदी वाईट्ट स्पर्श करतात. कधी बाई न बघितल्यासारखे अंगचटीला येतात.’
‘‘रेल्वे पूल किंवा बसमधली गर्दी अगदी नकोशी वाटते. एवढे वाईट स्पर्श होतात ना की, स्वत:चीच किळस वाटते. त्यापेक्षा गर्दीत जाणेच नको वाटते.’’
‘‘असा कोणी हात लावला की, त्याला धरून बदडून काढावसं वाटतं. पण, आपण एकटं पडण्याचीदेखील भीती वाटते.’’
या प्रतिक्रिया निश्चितच प्रातिनिधिक म्हणाव्या अशा आहेत. गर्दीत वावरणाºया किंवा गर्दीतून फिरणाºया प्रत्येक महिलेला या असल्या नको असलेल्या स्पर्शांची सवय (कितीही नकोसे वाटले तरी) होतेच.
मुळात, हे असे स्पर्श करावेसे का वाटतात? लोकांची अशी मानसिकता का असते? कुठेही बाई दिसली की, स्वत:ची मालमत्ता असल्यासारखेच पुरुष तिला स्पर्श का करतात? परवा झालेल्या एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेतही अनेक महिलांना हा अनुभव आलाच असेल. या मानसिकतेला नेमकं काय म्हणावं?
पुरुष आणि स्त्रिया या दोघांचाही याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगवेगळा असतो आणि हा दृष्टिकोनच त्यांची मानसिक स्थिती, जडणघडणदेखील दर्शवतो.
गर्दीत दिसलेल्या एखाद्या बाईला सहजशक्य असेल तर धक्का देणे, विचित्र पद्धतीने हात लावणे ही मुळातच सामान्य मनोवृत्तीची लक्षणं नाहीत, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे सांगतात. अनेकदा तर मुद्दाम जाऊन बायकांना धक्का दिला जातो. अशा प्रकारे कोणाच्याही जबरदस्तीने अंगचटीला जाणे, ही अत्यंत विकृत भावना आहे. अनेकदा पुरुषांना आपल्या लैैंगिक भावना कशा व्यक्त कराव्यात, ते कळत नाही. त्याचा काही अंदाजच येत नाही. मग त्यातून असे प्रकार घडतात आणि त्यातही अशा काही घटना घडल्या तर बायका त्याला प्रतिकार करतातच असं नाही. अनेकदा घाबरून किंवा मग, ‘कुठे हे प्रकरण वाढवायचं, सारखं पोलीस चौकीत जायचं’, अशा मानसिकतेतून याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्तीच वाढीला लागते. यातूनच मग पुरुषांचे फावते. एकदा असे धक्के देऊन किंवा स्पर्श करूनही काहीही होत नाही म्हटल्यावर त्यांचीही भीड चेपते आणि पुढच्या वेळी पुन्हा दुसºया बाईला अशाच कोणत्या ना कोणत्या प्रकारे खजील करायला ते मागेपुढे पाहत नाहीत.
खरंतर, ही अत्यंत विचित्र मानसिकता आहे. केवळ बायकांना स्पर्श करूनही समाधान मिळवणारी माणसं असतात. अनेकदा अशा वागण्यामागे आपल्या वैयक्तिक आयुष्यात समाधानी नसणं, हेदेखील कारण असू शकतं. पण, त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. अनेकदा हा सारा विकृत मानसिकतेचाच खेळ असतो.
अशा वागण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, ज्या वयात लैंगिक शिक्षणाचे व्यवस्थित ज्ञान द्यायला हवे, त्या वयात ते दिले जात नाही. त्यामुळे मग, मित्रांकडून शिक किंवा मग इंटरनेट आहेच. यातून माहिती जरी मिळत असली तरी इतर प्रकारच्या शिक्षणाप्रमाणेच हे शिक्षणही त्याच पद्धतीतून द्यायला हवे.
बायकांच्या दृष्टिकोनातून या सगळ्याचा विचार करायचा तर असे स्पर्श हे त्यांच्यासाठी निश्चितच धक्कादायक, मनावर आघात करणारे, हीन वागणूक दर्शवणारे असतात. मुळातच, चांगले आणि वाईट स्पर्श ओळखण्याचा एक ‘सिक्स्थ सेन्स’ बायकांकडे असतोच. त्यामुळेच हे असे नकोसे स्पर्श त्यांना झटकन लक्षात येतात. या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, अशा घटनांमध्ये ९९ टक्के महिला या आवाजच उठवत नाहीत. वास्तविक, अशा वेळी त्या व्यक्तीला रोखणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी मारामारीपर्यंत जरी नाही, तरी किमान त्या व्यक्तीला तिथल्या तिथे रोखणे केव्हाही आवश्यकच आहे. आपल्याला किमान विरोध होतो आहे, हे जरी कळलं तरी पुढच्या वेळी असा प्रकार करताना तो माणूस दहादा विचार करेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अशी घटना घडली की बायकांनी स्वत:ला दोष देणं योग्य नाही, असेही उमाटे यांचे म्हणणे आहे. उलट त्याला विरोध करा. अशा वेळी अ‍ॅग्रेसिव्ह होणं जास्त महत्त्वाचं आहे. विकृत मनोवृत्तीच्या माणसांवर अंकुश बसवणं, फारच महत्त्वाचं आहे. अडनिड्या वयातील मुलींना हे स्पर्शज्ञान करून देणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण, त्यांच्याबाबतीत असं काही घडलं तर, आपल्यासोबत नेमकं काय होतंय, हे त्यांना कळायला हवं. यासाठीच मुलींनादेखील योग्य त्या वयात लंैगिक शिक्षण देणं आवश्यक आहे.

- अश्विनी भाटवडेकर -ashwini.bhagwat@lokamt.com 

 

Web Title:  Unconscious touch crowd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.