राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:31 AM2018-06-17T04:31:00+5:302018-06-17T04:31:00+5:30

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे.

Trying to keep NCP out of the competition | राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

राष्ट्रवादीला स्पर्धेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न

Next

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात व्हावी, याकरिता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांनाच लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डावखरे यांच्यावर गद्दारीचा आरोप करून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार असले, तरी शिवसेना, भाजपाने आपल्या संघर्षात राष्ट्रवादीच्या तिसऱ्या उमेदवाराचीही मतदारांनी दखल घेऊ नये, अशी परस्परांवर चिखलफेक सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
‘गद्दाराला धडा शिकवा’ ही राष्ट्रवादी काँग्रेसची हाक असून, त्यांचे लक्ष्य डावखरे हेच आहे. निरंजन यांना लक्ष्य करताना सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा कोकण पदवीधर मतदार संघ मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाकडून पदवीधरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.
येत्या २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदान होणार असून, मतमोजणी २८ जूनला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाली, तर विधान परिषदेतील त्यांचे संख्याबळ वाढेल. सध्या विधान परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत नाही. जुलै महिन्यात विधानसभेतील सदस्यांनी मतदान केल्याने, विधान परिषदेवर निवडून जाणाºया सदस्यांची निवड झाल्यावर भाजपा बहुमतात येईल. तत्पूर्वी कोकण व मुंबई पदवीधर या दोन्ही मतदार संघांवर वर्चस्व मिळवून भाजपाची डोकेदुखी वाढविणे हाच शिवसेनेचा हेतू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असो की, पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेनेने परस्परांवर टीका करून, उत्तम यश संपादन केले आहे. तोच पॅटर्न पदवीधर निवडणुकीत अंमलात आणला जात आहे.
निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते विजयी झाले, तर भाजपासारख्या नव्या पक्षातही त्यांची राजकीय कारकीर्द बहरेल. मात्र, पराभव झाला तर ना घर का ना घाट का, अशी स्थिती होईल
>पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत
मित्राला जागा सोडत गेल्याने भाजपा कमी झाली, परंतु आता पालघरपाठोपाठ कोकण पदवीधरच्या निमित्ताने जी संधी आली, त्या संधीचे सोने करत कोकण पुन्हा आपल्याकडे घ्यायचे असल्याचा नारा भाजपाने दिला आहे. अर्थात, हे स्वप्न साकार करताना त्यांचा उमेदवार हा आयात आहे व संघ परिवाराच्या संस्कारांत वाढलेले पदवीधर तो कसा स्वीकारतात, याबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत. भाजपाने पदवीधरांसाठी कोणत्याही योजना आणलेल्या नाहीत. केंद्र सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे जंगजंग पछाडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे मैदानात उतरले आहेत, परंतु सभेच्या ठिकाणी नाईक आणि आव्हाडांमध्ये आजही धग जाणवते. हे दोघे उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी एकमेकांवरच टीका करण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारावरील आरोप व दाखल गुन्हेही त्या पक्षाकरिता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Trying to keep NCP out of the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.