ठाण्यात वाढतोय चिरलेल्या रेडिमेड भाज्यांचा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:42 AM2018-04-17T02:42:28+5:302018-04-17T02:42:28+5:30

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत.

Treated in the heart of the REDMED vegetables growing in Thane | ठाण्यात वाढतोय चिरलेल्या रेडिमेड भाज्यांचा ट्रेण्ड

ठाण्यात वाढतोय चिरलेल्या रेडिमेड भाज्यांचा ट्रेण्ड

Next

ठाणे : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘रेडी टू कुक’ ही संकल्पना चांगलीच रुजते आहे. पाकिटबंद वस्तुंप्रमाणेच तो ट्रेंड भाज्यांमध्येही दिसून येऊ लागला असून मंडईत मिळणाऱ्या भाज्यांप्रमाणे ठाण्यात काही मोक्याच्या ठिकाणी छान चिरलेल्या भाज्यांची पाकिटे मिळू लागली आहेत. त्यांना ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यासाठी पुढे आलेल्या महिलांचा हुरूप वाढतो आहे. काही तासांतच या भाज्या हातोहात संपत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
या चिरलेल्या, सोललेल्या, कापलेल्या भाज्यांच्या पाकिटासोबतच किसलेले ओले खोबरे, कोशिंबिरीचे साहित्य, चायनीजसाठी वेगळ््या आकारात कापलेल्या भाज्या, सांबारासाठी लागणाºया भाज्यांची पाकिटेही पाहायला मिळतात. त्यामुळे ठाणेकरांच्या बदलत्या खाद्यसवयी यातून दिसतात. नोकरदार स्त्रियांची घर आणि नोकरी सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेत चिरलेल्या भाज्या, फळांचीही खरेदी करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. ठाणे-डोंबिवलीसारख्या शहरात तो प्रामुख्याने दिसतो. दररोज हॉटेलचे खाणे नको वाटते. बºयाचदा ते परवडतही नाही. स्वत: घरी पदार्थ तयार करायचे असतात. पण सवड मिळत नाही. शिवाय पिशवी घेऊन बाजारात गेल्यावर भाज्या खरेदी करताकरता नाकीनऊ येतात. त्या घरी नेऊन निगुतीने साठवणे, धुवून-चिरुन ठेवण्यास वेळ लागतो. या तारेवरच्या कसरतीतून थोडा ब्रेक घेण्यासाठी स्त्री-पुरूष, ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे चिरलेल्या भाज्यांच्या खरेदीकडे वळू लागले आहेत. यात केवळ फळभाज्याच नव्हे, तर मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, फळेही मिळत आहेत. लोकांच्या गरजांचा विचार करून ही पाकिटे साधारण १५० ग्रॅम, २०० ग्रॅममध्ये मिळतात. साधारण २० ते ३० रुपये असा त्याचा दर आहे. फळे व कोशिंबिरीचे साहित्य साधारण ३० रुपये आणि खोवलेले खोबरे ४० रुपयांना पाकिट या दराने मिळते.
सध्या कच्च्या फणसाची अधिक विक्री होते; तर आॅल टाईम फेव्हरेटमध्ये गवार, फरसबी आणि पालेभाज्या जास्त खरेदी केल्या जातात. सूपसाठी मिक्स भाज्या, चायनीजसाठी मिक्स भाज्या आणि सलाडचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते.

कडधान्यामध्ये चवळी, काबुली चणे (छोले), हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, मूग, मटकी, मिश्र कडधान्ये, मसूर, कडवे वाल असे साधारण १५ प्रकार मिळतात. फळांमध्ये पपई, टरबूज, कलिंगड, डाळिंबाचे दाणे; तर कोशिंबिरीसाठी चोचलेली काकडी, गाजर, बीट, सलाड मिळतात. चिरलेल्या फळभाज्यांमध्ये किसलेले गाजर, काकडी, वांगी, भेंडी, कैरी, मुळा, चिरलेला मुळा, फ्लॉवर, कोबी, तोंडली, फरसबी, गवार, लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा, मक्याचे दाणे, सिमला मिरची उपलब्ध आहेत. सिझननुसार कच्चा फणस, केळफुल मिळते.
शिवाय तळण्यासाठी सुरणचे चौकोनी काप, फ्राईड राईससाठी वेगळ््या चिरलेल्या भाज्या; सूपसाठी भाज्या, मशरुम, गाजर, ब्रोकोली व काकडीचे काप मिळतात. सांबारसाठी वांगी, टोमॅटो, लाल भोपळा, दोडका, शेवग्याच्या शेंगांची पाकिटे तयार असतात. चिरलेल्या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, चवळी, शेपू, लाल माठ, मायाळू, अळू अशा विविध भाज्यांचे पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे रवि कुर्डेकर यांनी सांगितले.
खोवलेल्या खोबºयाची दिवसाला १०० पाकिटेसंपत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. दररोज साधारण दुपारी तीन-साडेतीनला वाजता या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होण्यास सुरूवात होते. पण खरेदीसाठी सायंकाळी पाचनंतर गर्दी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या भाज्या सकाळी पुणे, नाशिकवरुन येतात. त्या साफ करून चिरण्याची तयारी सकाळी सहा वाजल्यापासून होते. चिरुन, वजन करुन त्यांचे पॅकिंग केले जाते, असे कुर्डेकर कुटुंबाने सांगितले. यात त्यांना मनोहर कुर्डेकर, मालन तांबे, मंगेश यादव, राजू येन्बर यांचीही मदत होते.

ग्राहकांना चिरलेली भाजीत दर्जा आणि स्वच्छता या दोन गोष्टी मिळाल्या, की ते पैशांकडे पाहत नाहीत. आमच्याकडून केवळ ठाणे परिसरातून नव्हे, तर पश्चिम रेल्वेवर राहणारे ग्राहकही आठ दिवसांच्या भाज्या एकदम घेऊन जातात. सध्या प्लास्टिक बंदी केल्याने यापुढे या भाज्या कागदी पिशव्यांमध्ये दिल्या जाणार आहेत.
- रवि कुर्डेकर

पालिकेने माझे भाजीचे दुकान तोडल्यानंतर उपजीविकेसाठी दुसरे कोणते साधन शोधायचे असा विचार सुरू होता. एरव्ही भाजी खरेदी करताना ग्राहक कोबी-फ्लॉवर कापून मागत, घेवडा साफ करुन द्यायला सांगत ते आठवले. आपणच त्यांना या भाज्या चिरुन, सोलून किंवा कापून द्याव्या असा विचार मनात आला आणि सहा वर्षांपूर्वी तशी विक्री सुरू केली. सुरूवातीला तीन- चार दिवस प्रतिसाद नव्हता. मग त्या भाज्या आम्हीच घरी जाऊन शिजवून खात असू. त्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढला. सुरूवातीला या व्यवसायात ३०० रुपयांची गुंतवणूक केली होती. आज तेवढ्या संथ्येची भाज्यांची पाकिटेच असतात. ती सर्व संपतात.
- सुरेखा कुर्डेकर

Web Title: Treated in the heart of the REDMED vegetables growing in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे