परिवहन सदस्य निवडणूक : भाजपात बेबनाव, सेनेत जोरदार खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:07 AM2019-02-08T03:07:55+5:302019-02-08T03:08:21+5:30

परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी गुरुवारी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करताना भाजपामधील बेबनाव चव्हाट्यावर येऊन, उमेदवारी देण्यासाठी पक्षनेतृत्वाने २५ लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात आला.

Transport Member Election news | परिवहन सदस्य निवडणूक : भाजपात बेबनाव, सेनेत जोरदार खडाजंगी

परिवहन सदस्य निवडणूक : भाजपात बेबनाव, सेनेत जोरदार खडाजंगी

कल्याण : परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी गुरुवारी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करताना भाजपामधील बेबनाव चव्हाट्यावर येऊन, उमेदवारी देण्यासाठी पक्षनेतृत्वाने २५ लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात आला. शिवसेनेतही उमेदवारीवरून खडाजंगी झाली. सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासमोरच तमाशाने झाल्याने दिवस चांगलाच गाजला.
फेब्रुवारीअखेर सभापती सुभाष म्हस्केंसह नितीन पाटील (दोघेही भाजपा) तसेच शिवसेनेचे राजेंद्र दीक्षित, संतोष चव्हाण, काँग्रेसचे शैलेंद्र भोईर आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे असे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. या सदस्यांचा कालावधी फेब्रुवारीअखेरपर्यंत असला तरी, तत्पूर्वी या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शिवसेनेकडून सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील यांची अधिकृत नावे पक्षाकडून देण्यात आली. त्यांच्यासह नगरसेवक मल्लेश शेट्टी समर्थक असलेले गणपत घुगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खारूक, पिंगळे आणि पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर, घुगेदेखील सचिवांच्या दालनात अर्ज भरण्यासाठी आले. तेव्हा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि गटनेते दशरथ घाडीगावकर यांनी त्यांना मज्जाव केला. तितक्यातच मल्लेश शेट्टी दालनात आले आणि त्यांनी घुगे यांना अर्ज भरण्याचा आग्रह धरला. यावेळी शेट्टी आणि लांडगे यांच्यात खडाजंगी झाली. अन्य पदाधिकारी समजावत असताना शेट्टींचा त्यांच्याशीही वाद झाला. पत्रकार आणि सचिव संजय जाधव यांच्यासमोरच हा तमाशा सुरू होता. शेट्टी यांच्याकडून घुगे यांना उमेदवारी अर्ज भर, बाहेर आलास तर तुला मारेल, अशी दमदाटीदेखील करण्यात आली. अखेर, नगरसेवक विश्वनाथ राणे आणि अन्य पदाधिकाºयांनी शेट्टी यांना दालनाबाहेर नेले. घुगे यांना शेट्टी आणि महेश गायकवाड यांचे अनुमोदन असून, त्यांच्या उमेदवारीचे चित्र ११ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

भाजपा नेत्यावर टीका, पैसे घेतल्याचा आरोप

भाजपाकडून संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला; पण यावेळीही डावलले गेल्याने नाराज झालेले प्रशांत माळी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्ष नेतृत्वाने २५ लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुपारपर्यंत भाजपाचे उमेदवार म्हणून व्यापारी राकेश मुथा आणि विकी गणात्रा यांची नावे चर्चेत होती. ही नावे ऐनवेळी वगळण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपात आलेले मुथा कमालीचे नाराज झाले. एका कार्यकर्त्याने १५ माणसे जमवून आंदोलनाची धमकी दिल्याने नेतृत्व घाबरले; परंतु मी आवाज दिला तर ५०० दुकाने एकाचवेळी बंद करू शकतो, अशा शब्दांत मुथा यांनी लोकमतकडे संताप व्यक्त केला. मुथा यांना डावलल्यामुळे भाजपाला गुजराती, मारवाडी समाजाची नाराजी भोवण्याचीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महागठबंधन? : मनसे आणि काँग्रेसच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मनसेच्या वतीने मिलिंद म्हात्रे, तर काँग्रेसच्या वतीने गजानन व्यापारी या दोघांनी अर्ज भरले. काँग्रेसच्या उमेदवाराला मनसे सहयोगी अपक्ष नगरसेवक प्रभाकर जाधव यांचे अनुमोदन लाभले. त्यामुळे दोघांचे अर्ज भरताना केडीएमसीत मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महागठबंधन झाल्याची चर्चा होती. दरम्यान, १५ फेब्रुवारीच्या निवडणुकीत महागठबंधन आहे की नाही, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले.

माळींचा अर्ज बाद होईल
प्रशांत माळी यांनी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांना नगरसेवक म्हणून कुणीही सूचक, अनुमोदक लाभलेले नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Transport Member Election news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.