पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:29 AM2018-06-12T04:29:52+5:302018-06-12T04:29:52+5:30

वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर आता याच भागातील आकृती प्रकल्पामध्ये केले जाणार आहे.

Transporation of families of police colonies in the city | पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर

पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर

Next

ठाणे - वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर आता याच भागातील आकृती प्रकल्पामध्ये केले जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी या कुटुंबांची भेट घेऊन अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा तिढा सोडवला.
वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील सात इमारती अतिशय धोकादायक असल्याने येथील ३३० कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. भार्इंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा गृहसंकुलात या कुटुंबांना हलवण्यात येणार होते. पावसाळ्यास सुरुवात झाल्याने ही प्रक्रिया त्वरेने करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या पथकाने शनिवारी इमारतींची पाहणी करून कारवाईस सुरुवातही केली होती. मात्र, भार्इंदरपाडा येथे जाण्यास पोलीस वसाहतीमधील कुटुंबांनी तीव्र विरोध केला. मुलांची शाळा आणि कुटुंबातील नोकरदारवर्गासाठी भार्इंदरपाडा हे सोयीचे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. एमएमआरडीएच्या आयुक्तांशी पालकमंत्र्यांनी लगेच संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला. आकृती प्रकल्पामध्ये जवळपास १५० कुटुंबांचे स्थलांतर होऊ शकेल. उर्वरित कुटुंबांचीही सोयीच्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, स्थानिक नगरसेविका, महापालिका अधिकारी राजीव खांडपेकर आणि इतर उपस्थित होते.

भार्इंदरपाडा लांब असून तेथील घरे केवळ १६० चौरस फूट आकाराची असल्याने वर्तकनगरातील आकृती किंवा खेवरा सर्कल या पालिकेच्या रेंटल हाउसिंगमध्ये स्थलांतर करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी पोलीस वसाहतीमधील कुटुंबांची भेट घेतली. स्थानिक रहिवाशांच्या समस्या पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

रहिवाशांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळल्याने वर्तकनगरातील आकृती प्रकल्पामध्ये स्थलांतर करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी मान्य केली.

Web Title: Transporation of families of police colonies in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.