तिढा बारवी प्रकल्पग्रस्तांचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:26 AM2019-06-16T00:26:50+5:302019-06-16T00:27:04+5:30

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम झालेले असले, तरी त्या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविणे पुनर्वसनाअभावी अवघड जात होते.

Tiger wall project affected! | तिढा बारवी प्रकल्पग्रस्तांचा!

तिढा बारवी प्रकल्पग्रस्तांचा!

Next

- पंकज पाटील

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम झालेले असले, तरी त्या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविणे पुनर्वसनाअभावी अवघड जात होते. त्यामुळे गेल्या वर्षभरात बारवी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रीत केले होते. त्याअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना जागेचा मोबदला आणि घर उभारण्यासाठी मोबदला देण्यात आला असून, त्यांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. पुनवर्सन केलेल्या गावांना सुविधा पुरविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ग्रामस्थांनाही स्थलांतरणाचा पर्याय दिल्याने आता त्यांनीदेखील एमआयडीसीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. तोंडली आणि जांभूळवाडी या भागातील प्रकल्पग्रस्तांनीही स्थलांतरणास सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता बारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

म हाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे(एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढविण्यात आली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घन मिटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची ९ मीटर वाढविल्याने ही क्षमता दुप्पट झाली असून, आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घन मिटर एवढा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. धरणाची उंची वाढवण्यासोबत आता धरणातील ११ स्वयंचलीत दरवाजांचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र धरणात क्षमतेएवढे पाणी साठविणे अवघड जात होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांनी स्थलांतरणाला विरोध केला होता. पूनवर्सन पॅकेज, नोकरी आणि घरांच्या मोबदल्यात भरपाई या विषयांवर सातत्याने वाद सुरु होता. आता एमआयडीसीनेही या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसन प्रश्नावरुन धरणाची उंची नऊ मिटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक प्रकल्पबाधितांना त्यांच्या घरांचे मूल्यांकन, पर्यायी जागा देण्यात आल्या असून शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले काळू आणि शाई हे धरण प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ठाण्यातील शहरांना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी बारवी धरण विस्तारीकरण हाच पर्याय आहे. दिवसेंदिवस पाण्याची गरज आणि पुरवठा यात येणारी तूट वाढू लागली आहे. ठाणे जिल्ह्याच्या पाणी पुरवठयाचा गंभीर प्रश्न लक्षात घेता गेल्या वर्षभरात युद्धपातळीवर कामे करण्यात आली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या घरोघरी जात त्यांच्याशी थेट संवाद साधला. पूनर्वसन भरपाईविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी गावकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. गावात जाऊन लोकांना धनादेश दिले. पर्यायी जागांवर गावठाण विकसीत करून दिले. शाळा, समाजमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते बांधले. या सर्व सुविधा मिळताच आता प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या जागांवर आपले घर बांधण्याचे काम सुरु केले आहे.

तोंडली आणि काचकोली येथील रहिवाशांचे तोंडली-१, तोंडली-२ आणि कोचकोली-१ आणि कोचकोली-२ अशा प्रत्येकी दोन ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आहे. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला ३७० चौरस मिटरचा भूखंड किंवा ६ लाख ६५ हजार रूपये देण्यात आले. पाचपेक्षा अधिक सदस्यसंख्या असलेल्या कुटुंबांना ७४० चौरस मिटरचा भूखंड किंवा १३ लाख ३० हजार रूपये देण्यात आले. तोंडली, काचकोली येथील शेकडो कुटुंबांनी पूनर्वसन पॅकेज स्वीकारले असून ते पर्यायी जागेत स्थलांतरीतही झाले आहेत. काही घरांची कामे सध्या सुरू असून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नव्या घरात राहायला जातील. तोंडली १ आणि २ ही गावठाणे मुरबाड-म्हसा रस्त्याच्या दुतर्फा स्थलांतरीत झाली आहेत. काचकोलीवासियांना मोहघरच्या दिशेला जागा देण्यात आल्या आहेत. तिथे घरांची कामेदेखील पूर्ण करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झालेले नाहीत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थादेखील एमआयडीसीने करुन ठेवली आहे. यंदा धरणात क्षमतेएवढे पाणी साठविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना पूर्णविराम देण्याचे कामही सुरु केले आहे. अधिकाºयांचे पथक थेट नेत्यांसोबत नव्हे, तर ग्रामस्थांसोबत चर्चा करुन त्यांचे समाधान करित आहे. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांमध्येही संभ्रमावस्था राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने संघर्ष करण्यासाठी राजकीय पुढारी पुढे सरसावले होते. मात्र त्यातील काही पुढारी हे स्वत:चा स्वार्थ पाहत असल्याने बारवी धरणाचा तोडगा निघत नव्हता. मात्र गेल्या वर्षभरात अधिकाºयांनी नेत्यांना सोडून थेट ग्रामस्थांसोबत चर्चा केल्याने तो वादही आता मिटला आहे. गावोगावी जाऊन त्यांच्या घरांचे आणि जागेचा मोबदला देण्यात आला आहे. एमआयडीसीच्या या सकारात्मक भूमिकेला आता ग्रामस्थही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
कोळे-वडखळ गावाला पूनर्वसनासाठी दिलेली जागा वनविभागाची असल्याने तेथील शंभर कुटुंबांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे तोंडली गावातील काही कुटुंबांच्या घरांचे फेरमूल्यांकन केले जात आहे. तोंडलीत अजूनही २८६ कुटुंबे विस्तारीत धरण प्रकल्पाच्या कक्षेत आहेत. त्यापैकी ९९ कुटुंबांनी पूनर्वसन पॅकेज स्वीकारले आहे. उर्वरित १८७ जणांना तोंडली-१ आणि तोंडली-२ मध्ये भूखंड देण्यात आले आहेत. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबांना जून महिन्यात दरमहा सहा हजार रुपये घरभाडे आणि ५४ हजार रूपये खावटी देण्यात येणार आहे. त्यांचेही लवकरात लवकर पूनवर्सन करुन बारवीच्या आड येणाºया समस्या सोडविण्यात येत आहेत. बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचाही प्रश्न मार्गी लागला असून पहिल्या टप्प्यातील सर्व इच्छुकांना एमआयडीसी नोकरीत सामावून घेणार आहेत. उर्वरित इच्छुकांना इतर महापालिका आणि पालिकांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. जे गेल्या २२ वर्षात झाले नाही, ते काम गेल्या वर्षभरात करुन बारवीचा प्रकल्प मार्गी लावण्यात अधिकाºयांना यश आले आहे.

अतिरिक्त जलसाठा
सध्या धरणात २३४ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होतो. विस्तारीकरणानंतर ३४०.४८ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होणार आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करताना संबंधित प्राधिकरणांना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील शहरवासियांना दिलासा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यात नवीन धरण होत नाही, तोवर संपूर्ण जिल्ह्याला बारवी धरणावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Web Title: Tiger wall project affected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण