भाजी मंडई नसल्यानेच रस्त्यावर फेरीवाले झाले उदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:05 AM2018-06-25T00:05:42+5:302018-06-25T00:05:57+5:30

१९८० पासून नागरिक मंडईची मागणी करत आहेत. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात भाजी हवी असल्यास येथील रहिवाशांना पूर्वेकडेच भाजी खरेदीसाठी यावे लागते. मात्र

There was no vegetable garden because of the rambling streets | भाजी मंडई नसल्यानेच रस्त्यावर फेरीवाले झाले उदंड

भाजी मंडई नसल्यानेच रस्त्यावर फेरीवाले झाले उदंड

googlenewsNext

पश्चिमेला भाजी मंडईचा अभाव आहे. यामुळे रस्त्यावर सर्रास भाजी विक्री केली जाते. १९८० पासून नागरिक मंडईची मागणी करत आहेत. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात भाजी हवी असल्यास येथील रहिवाशांना पूर्वेकडेच भाजी खरेदीसाठी यावे लागते. मात्र
रोजच जाणे शक्य होत नसल्याने नोकरदार मंडळी घरी जाताना रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजी विकत घेतात. अद्ययावत भाजी मंडईसाठी प्रयत्न केले जात नाहीत. प्रस्ताव असल्यास ते कागदावरच आहेत.
माजी नगरसेवक दिलीप भोईर यांनी मच्छीमार्केटच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. लाचखोर अतिरीक्त आयुक्त संजय घरत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे आदींच्या दृष्टीनेही तो प्रकल्प महत्वाकांक्षी असाच आहे. पण तो प्रकल्प अस्तित्वात येण्यासाठी संथगतीने प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. तो प्रकल्प तातडीने मार्गी लागावा आणि पश्चिमेच्या विकासाचा शुभारंभ व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकृत रिक्षातळ एकच आहे. पण शहरीकरणामुळे वाहने वाढली, गरजा वाढल्या. त्यामुळे गल्लीबोळात रिक्षा उभ्या असतात. त्यापैकी काही जणांच्या मनमानी कारभाराचा त्रास सगळयांना होतो. कुठेही कशाही पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे स्टेशन परिसरात, फुले रोड, गुप्ते रोड येथे कोंडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. टोर्इंग व्हॅनचा अभाव असल्याने बेशिस्त वाहनचालकांवर आभावानेच कारवाई होते.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या नियोजनाचा अभाव असल्याने ठिकठिकाणी कोंडी होते. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. अनेकदा कोंडी सोडवण्यासाठीही त्यांचे कार्यकर्ते पुढे येतात. वाहतूक पोलिसांचा कानाडोळा, दुर्लक्षामुळे समस्येत वाढ होत असल्याचे ते नेहमी सांगतात.

पदवी महाविद्यालयाची गरज
पूर्वेला तीन पदवी महाविद्यालये आहेत, पण पश्चिमेला एकही नाही. त्यामुळे पश्चिमेत राहणाºया हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पूर्वेला यावे लागते. अन्यथा डोंबिवली बाहेर जावे लागते. पश्चिमेलाही पदवी महाविद्यालय असावे यासाठी विशेषत्वाने कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. शाळा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामध्ये खासगी, अनुदानीत तसेच महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. पण पुढील शिक्षणासाठी मात्र अवलंबून रहावे लागत असल्याने पालकांसह पाल्यांसमोर मोठी चिंतेची बाब आहे.परिवहन सुविधेपासून वंचित
परिवहन विभागाचेही या ठिकाणी दुर्लक्ष आहे. पश्चिमेकडील भागामध्ये परिवहनचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहयला लागते. माजी सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी पश्चिमेकडील भागात बस वाहतुकीचे जाळे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना माजी सभापती संजय पावशे यांची साथ मिळाली नसल्याने अल्पावधीतच सेवेत खंड पडला. आता तर पश्चिमेकडील रिंगरूट सेवाही विस्कळीत झाल्याने नागरिक नाराज आहेत. परिवहनने मात्र उत्पन्नाअभावी सेवा देता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आणखी एक प्रभाग कार्यालय हवे
पश्चिमेकडील वाढत्या लोकसंख्येनुसार पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे. पश्चिमेसाठी एकच प्रभाग कार्यालय असून आता वेगाने वाढलेल्या नागरीकरणामध्ये दोन प्रभाग कार्यालये असणे आणि कामाची विभागणी होणे अत्यावश्यक झाले आहे. पूर्वेला ग आणि फ तसेच २७ गावांसाठीही दोन स्वतंत्र प्रभागांची निर्मिती झाली आहे. तशी आवश्यकता पश्चिमेलाही आहे. त्यासाठी महापालिका स्तरावर सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणीही तात्काळ व्हायला हवी.

पदे मिळूनही विकास
झालाच नाही
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे म्हणाले की, वास्तविक पाहता डोंबिवली पश्चिमेला आतापर्यंत दोनवेळा महापौरपद मिळाले असून बहुतांश वेळेला या ठिकाणी स्थायीचे सभापतीपदही मिळाले आहे. पण त्या तुलनेने पश्चिमेचा विकास झाला नाही. येथील लोकप्रतिनिधींना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. तत्कालीन सभापतींचीही प्रचंड इच्छाशक्ती होती परंतु तशी साथ महापालिकेच्या यंत्रणेने , अधिका-यांनी न दिल्याने तो तिढा सुटला नाही. अन्यथा पश्चिमेकडील खाडी किनाºयाचा कायापालट, जलवाहतूक हे प्रकल्प कधीच मार्गी लागायला हवे होते. निदान आता तरी ते मार्गी लागावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पाणीगळतीचे
प्रमाण अधिक
याठिकाणी पाणी मुबलक स्वरूपात आहे. वसाहतीत तीन पाण्याच्या टाक्या आहेत. यातील पाण्याची लाल टाकी ही सर्वात जुनी आहे. एका टाकीतून सुरूवातीच्या काळात वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा केला जायचा. परंतु केंद्र बंद झाले त्यातच लोकवस्तीही कमी झाल्याने आजच्याघडीला याठिकाणी मुबलक पाणी आहे. मात्र येथील बहुतांश जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. वास्तविक या परिसरातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु रेतीची बेकायदा वाहतूक होत असल्याने त्याचा दाब भूमिगत जलवाहिन्यांवर पडतो आणि त्यात त्या तुटून त्यातून बरेच पाणी वाया जाते. या गळतीवर मात्र उपाय तातडीने होणे गरजेचे आहे. येथील रस्त्यांची पुरती वाताहत झाली असून रिक्षाचालकही फिरकत नाहीत.

बावनचाळीत अनैतिक व्यवसाय सुरू
ठाकुर्ली पश्चिमेकडील भाग हा डोंबिवली पश्चिमेलाच जोडला जातो. त्यामुळे ठाकुर्लीवासियांना पश्चिमेवरच अवलंबून रहावे लागते. एकीकडे रेल्वेची अनास्था आणि महापालिका प्रशासनाकडून संपूर्णपणे होत असलेले दुर्लक्ष पाहता स्मार्ट सिटीची स्वप्न पाहणाºया कल्याण डोंबिवली महाापालिकेतील हा भाग विकासापासून आजवर कोसो दूर राहिला आहे.
वसाहतीतील बहुतांश घरांची पडझड झाली असून नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा आणि सुरक्षेअभावी अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. येथूनच पूर्व-पश्चिम उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा परिसर निर्जन असल्याने याठिकाणी दिवसाढवळया तसेच रात्री बिनधास्ता अनैतिक व्यवसाय सुरू असतात. महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच गणेशनगर परिसरासह आता नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावरही राबता असतो.
या परिसरातून रात्री उशिरा रेतीची बेकायदा वाहतूकही होते. मोठा गाव ठाकुर्ली, चिंचोळयाचा पाडा याठिकाणी रेती भरून रात्री ठाकुर्लीच्या या भागातून ट्रक कल्याणकडे जातात. कधीतरी कारवाई होते, पण पुन्हा स्थिती जैसे थेच असते. मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये गांजाचा व्यापार जोमाने चालत असल्याचीही चर्चा आहे. रात्रीच्या सुमारास या मैदानांवर मद्यपींचे अड्डे भरतात. जुगाराचे डावही याठिकाणी रंगतात. भले शॉर्टकट का असेना पण ती वाट नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे.

पश्चिमेला साडेतीन हजार रिक्षा आहेत. अरूंद रस्ते, पी १ पी २ चा अभाव, त्यासह विविध बस, टेम्पो, ट्रक, यांसह चारचाकी वाहने, दुचाकी यामुळे वाहतूक कोंडी भेडसावते. त्याचा फटका आबालवृद्धांना बसतो. येथे कायमचा आरटीओ अधिकारी हवा, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी यासाठी रिक्षा संघटनांनी अनेकदा निवेदने दिली, पण त्याचा काहीही फायदा झालेला नाही
- शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षा चालक-मालक संघटना.

सत्ताधारी पक्षांना केवळ पश्चिमेकडील मतदारांची मत हवी आहेत, मात्र त्यांना पायाभूत सुविधा देताना नाकीनऊ येत आहेत. विकासाबाबत खºया अर्थाने नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मंत्री, आमदारकी, सभापतीपद, महापौरपद सातत्याने मिळाले असूनही केवळ पक्षहित जोपासण्याची कामे केली गेली. सर्वसामान्यांच्या पदरी मात्र केवळ निराशाच पडली आहे.
- प्रकाश भोईर, नगरसेवक, मनसे.

नाट्यगृह, तरणतलाव, गार्डन अशी आरक्षणे पूर्वेसारखी पश्चिमेला नाहीत. त्या ठिकाणी स्मशानभूमीही अद्ययावत नाही. पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार यांच्या संकल्पनेनुसार मच्छीमार्केट अद्ययावत होणारच आहे. पोलीस ठाण्याच्या रिकाम्या जागेवर रिक्षातळ हलवणे, एलिव्हेटेड शॉपिंग सेंटर आदी सुविधा करण्यात येणार आहे.
- विनिता राणे, महापौर

शहरात सर्वाधिक बेकायदा बांधकामे पश्चिमेकडे होत असल्याबाबत येथील नगरसेवक तक्रारी करतात. मात्र प्रशासन कारवाई करत नाही. नागरिकही कारवाई होऊ देत नसल्याने विकास कसा होणार. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. खाडीकिनाºयाच्या विकासासाठी कोट्यवधींची तरतूद केली जात आहे.
- राहुल दामले, सभापती, स्थायी समिती.
 

Web Title: There was no vegetable garden because of the rambling streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.