ठाणे : खाजगी बसवर कारवाईबाबत आरटीओला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून हालचाल होत नसल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले. दुसरीकडे आमच्याकडून वारंवार अशा बसवर कारवाई होत आहे. परंतु, जप्त केलेल्या बस ठेवण्यासाठी परिवहनकडे जागा मिळावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडूनच याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचा उलट आरोप आरटीओने केला. यामुळे खाजगी बसना आश्रय कोणाचा, हा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला असून परिवहन आणि आरटीओने एकमेकांकडे बोट दाखवल्याने त्या बंद होणार नाहीत, हेच यातून स्पष्ट होत आहे.
परिवहनचे उत्पन्न घटण्यात खाजगी बसेसचा मोठा वाटा असल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीत चांगलाच गाजला. या खाजगी बसवर संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, आजही त्या कशा सुरू आहेत, असा सवाल सदस्य सचिन शिंदे यांनी केला. कारवाई झाली, असे जरी म्हटले, तरी त्या रस्त्यावर कशा धावत आहेत. त्यांच्या चालकांकडून हप्ता जातो, हे आता उघड झाले आहे. त्यामुळे त्या बंद होणार नसल्याचे त्यांनी केलेल्या आरोपावरून स्पष्ट झाले आहे. मग, या बसवर कारवाई होणार की नाही, असा सवाल सदस्य प्रकाश पायरे यांनी केला. परंतु, त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी ही परिवहनची नसून ते केवळ संबंधित विभागाला सांगू शकतात, असे मत सदस्य राजेश मोरे यांनी व्यक्त केले. मग, संयुक्त कारवाईच्या आश्वासनाचे काय, असा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या बसवर संयुक्तपणे कारवाईसाठी आजही आम्ही तयार असल्याचे मत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी व्यक्त केले. या बसवर कारवाई व्हावी, त्यासाठी जी मदत लागेल, ती करण्याची आमची तयारी असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. परंतु, वारंवार पत्रव्यवहार करूनही आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे याबाबत आरटीओशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आमच्याकडून या बसवर वारंवार कारवाई केली जात आहे. तसेच त्या जप्तदेखील केल्या जात आहेत. परंतु, त्या ठेवण्यासाठी परिवहन प्रशासनाकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडूनच आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्याचा पलटवार आरटीओने केला. त्यामुळे एकमेकांच्या भांडणात खाजगी बसचालकांचे मात्र चांगभलंच होत असल्याचे दिसत आहे.

टीएमटीच्या दुरुस्तीवरून गदारोळ
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आणि कळवा आगारांतून निघणाºया बसबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत परिवहन समिती सदस्यांनी आक्षेप घेतला. परिवहनचे उत्पन्न वाढत असले तरीदेखील बस रस्त्यावर धावत नसतील, तर याला जबाबदार कोण. निधी देऊनही त्या दुरुस्त का होत नाहीत, अशा विविध मुद्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून कार्यशाळेलाही पुन्हा टार्गेट केले. परंतु, नादुुरुस्त बसच्या दुरुस्तीसाठी आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार, येत्या काळात तसा प्रस्ताव तयार करून त्या दुरुस्त केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिवहनच्या स्वत:च्या ३१७ पैकी वागळे आणि कळवा आगारांतून अवघ्या ८० बस रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दिवसाला ब्रेक डाउनचे प्रमाण ५० च्या आसपास आहे. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या परिवहनच्या बैठकीत उमटले. सदस्य सचिन शिंदे यांनी या मुद्याला हात घालून वागळे आगारातून ३० ते ३५ आणि कळवा आगारातून १८ बस रस्त्यावर धावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे वाढलेले उत्पन्न हा केवळ फुगा असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय, जीसीसी कंत्राटच्या बसचे किती उत्पन्न आपल्याला मिळते, याचा जाबही त्यांनी प्रशासनाला विचारला. एकूणच परिवहनच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु, कोणत्याही परिस्थितीत ते होऊ देणार नसल्याचे मत शिवसेनेचे सदस्य प्रकाश पायरे यांनी व्यक्त केले. बस निघत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातही परिवहनचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर चालक आणि वाहकांना विचारून रूट फायनल केले, तर नक्कीच ते वाढेल, अशी आशा सदस्य राजेंद्र महाडिक यांनी व्यक्त केली.

त्या बस अपघाताची  होणार चौकशी
ठाणे : पारसिकनगर येथे टीएमटीचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघाताची अखेर चौकशी सुरू केली आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत दिले आहे.
बुधवारी दुपारी ठाणे स्टेशन ते अलीमघर ही टीएमटी स्टेशनवरून निघाली होती. पारसिकनगर येथे ती आली असता अचानक तिचा ब्रेक फेल झाला. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, हा अपघात झाला कसा, ब्रेक फेल होण्यामागचे नेमके कारण काय, असे विविध प्रश्न परिवहनच्या बैठकीत उपस्थित करण्यात आले.
सदस्य सचिन शिंदे यांनी या बसच्या ब्रेक डाउनला जबाबदार कोण, असा सवाल केला. ही बस कार्यशाळेतून दुरुस्त करून कधी रस्त्यावर आली, असा प्रश्न सदस्य हेमंत धनावडे यांनी केला.यासंदर्भात परिवहनचे अधिकारी भालेराव यांनी या बसच्या पॅडलची हवा गेली आणि ब्रेक डाउन झाला, असे चालकाने आपल्या कबुलीत सांगितल्याचे स्पष्ट केले.
ही बस कार्यशाळेतून काम करून कधी बाहेर आली होती, असा सवाल धनावडे यांनी विचारला असता ७ तारखेला ती बाहेर आली आणि ८ तारखेला ही घटना घडल्याचेही भालेराव यांनी सांगितले. दुसºयाच दिवशी ब्रेक फेल कसा झाला, असा सवाल करून धनावडे यांनी प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणले. अखेर, चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश सभापती अनिल भोर यांनी प्रशासनाला दिले.

टीएमटीचे बसथांबे लवकर होणार हायटेक
ठाणे : रस्ता रुंदीकरणात हलवलेले टीएमटीचे थांबे आजही बसवण्यात आलेले नाहीत. शिवाय, त्यांची दुरवस्था झाली असल्याचा मुद्दा शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. त्यांची निगा, देखभाल राखण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असूनदेखील त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे येत्या काळात शहरातील सर्वच बसथांबे हायटेक करण्याची ग्वाही परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली.
ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत रस्त्यांचे रुंदीकरण करून ते नव्याने बांधलेदेखील. परंतु, आजही शहराच्या विविध भागांतील परिवहनचे बसथांबे मात्र तसेच पडून आहेत. काही दिवसांपूर्वी परिवहन सभापती अनिल भोर यांनी पाहणी करून त्यांचे फोटोदेखील काढले आहेत. परंतु, अद्यापही त्यांची उभारणी झालेली नसल्याचा मुद्दा प्रकाश पायरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे एक तर ते सुधारा किंवा नव्याने तयार करा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. तर, संबंधित सोल्युशनबाबत या कंत्राटदाराकडून त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप राजेंद्र महाडिक यांनी केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. शहरात आजघडीला ४७० बसथांबे आहेत. परंतु, त्यातील १७३ बसथांबे आजही शहराच्या विविध भागांत सडलेल्या अवस्थेत आहेत. काहींची अवस्था तर दयनीय झालेली आहे. त्यामुळे नव्याने बसथांब्यांची उभारणी करावी तसेच त्या बसथांब्यांवर जाहिराती प्रसिद्ध करून परिवहनच्या उत्पन्नात वाढ करावी, अशी मागणीदेखील सदस्यांनी केली.
दरम्यान, सध्या असलेल्या कंत्राटदाराकडून बसथांबे दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती माळवी यांनी दिली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.