ठाण्याचे हवा-ध्वनीप्रदूषण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:25 AM2018-12-16T06:25:40+5:302018-12-16T06:26:00+5:30

१६ चौकातील धूलीकणांत झाली वाढ : पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कमी

Thane wind-sound pollution decreases | ठाण्याचे हवा-ध्वनीप्रदूषण घटले

ठाण्याचे हवा-ध्वनीप्रदूषण घटले

Next

ठाणे : शहरात वाहनांची वाढत असलेली संख्या, औद्योगिक कामकाज आणि नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे ठाण्यातील हवा आणि ध्वनी प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असली तरी यंदा मात्र त्यात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. शिवाय दिवाळीच्या काळातही ध्वनीप्रदूषणासह, हवेतील प्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही तिनहातनाका परिसराचे सर्व्हेक्षण केले असता येथील हवेची गुणवत्ता ही मागील वर्षी अतिप्रदूषित होती. यंदा मात्र, त्यात सुधारणा झाली आहे. मात्र, १६ चौकांमधील हवेतील धुलीकणात वाढ झाल्याचे पर्यावरण अहवालात दिसून आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांच्या संख्येत १ लाख १४ हजार ८४८ ने वाढ झाली आहे. त्यानुसार शहरात सध्याच्या घडीला तब्बल २० लाख ४५ हजार १२३ वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यातही शहरातील दुचांकींची संख्या ही १ लाख ७६ हजार ५६४ एवढी झाली आहे. तसेच आजही काही ठिकाणाच्या औद्योगिक पट्यात कामकाज सुरूअसल्याने आणि नव्याने सुरू असलेल्या बांधकामांचा परिणाम, तसेच कळवा खाडीवरील तिसºया नव्या पुलाच्या कामामुळे त्याच्या परिणाम शहराच्या वातावरणावरही झाला आहे. यामुळे शहरात हवेच्या आणि ध्वनी प्रदूषणात काही भागांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, इतर ठिकाणी मात्र मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.
महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील १६ चौकांच्याठिकाणी सल्फरडाय आॅक्साइड (एसओटू), नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण मर्यादेशपेक्षा कमी आढळले आहे. परंतु हवेतील धुलीकणांचे प्रमाण हे मानकांच्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. तर कळवानाका, मल्हार सिनेमा आणि एम. एच. हायस्कूल येथे कार्बन मोनॉक्साईड आणि बेन्झिनचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे.
हवेची गुणवत्ता ही शहरातील निवासी स्थळात कोपरी प्रभाग कार्यालय, व्यावसायिक मध्ये शाहु मार्केट आणि औद्योगिकमध्ये रेप्टाकॉस ब्रेट अ‍ॅण्ड कंपनी अशा तीन ठिकाणचे सर्व्हेक्षण केले असता तेथे सल्फरडाय आॅक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा कमी आहे. तर धुलीकणांचे प्रमाण अधिक आढळले आहे.

२६ शांतता क्षेत्रातही आवाजाची पातळी वाढली

च्तीनहातनाका येथे केलेल्या वर्षभराच्या सर्वेक्षणात येथील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दिसत आहे. परंतु, धूलिकणांचे प्रमाण हे काही प्रमाणात जास्त आढळून आले आहे. शिवाय ठाणे-कळवा जोडपुलाजवळील बाळकुम साकेत , शिवाजी चौक आणि सिडको रोड आदी ठिकाणीदेखील ते वाढले आहे. तर दिव्याच्या डम्पिंगवर धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे.

च्दिवाळीत मागील वर्षी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले होती. परंतु, यंदा मात्र दिवाळीच्या काळात त्यात काहीअंशी घट आढळली आहे. तसेच हवेतील प्रदूषणही कमी झाल्याचे आढळले आहे. तर धुलीकणांचे प्रमाणही मानकांपेक्षा २ पटीने अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धूलिकणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच ध्वनीची तीव्रताही १०१.२ डेसीबलपर्यंत गेली होती.

च्प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत शहरातील निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र असे मिळून ४० स्थळांचे सर्व्हेक्षण केले असता त्यातील ३१ स्थळांची ध्वनीची पातळी ही ७५ डेसिबल पेक्षा अधिक आढळली आहे. यामध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या ध्वनी प्रदूषणातही वाढ झाली आहे. तसेच शहरातील २६ शातंता क्षेत्रातही ध्वनी पातळी वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात काढला आहे.

साठवणुकीच्या पाण्याची
गुणवत्ता मानकापेक्षा कमी
महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचीही गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार महापालिकेने १० हजार ४५१ नमुने तपासले. तसेच वितरण व्यवस्थेचे ११ हजार २०६ नमुने तपासले असून त्यातील १० हजार ४५१ नमुने पिण्यायोग्य आढळले असून ७५५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच वितरण व्यवस्थेतील पाण्याची गुणवत्ता ९१ टक्के आहे. ही गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकाच्या जवळपास असल्याचे आढळले आहे. तर साठवणीच्या ठिकाणातील पाण्याचे १५ हजार ५२६ नमुने तपासले असून त्यातील १२ हजार ४५९ नमुने हे पिण्यायोग्य आढळले आहे. तर ३ हजार ३६७ नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहे. याचाच अर्थ पाण्याची गुणवत्ता ७८ टक्के असून जी जागतिक आरोग्य संघटनेच्या ९५ टक्के या मानकापेक्षा कमी आढळली असली तरी ती सुधारल्याचा दावा पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे.

खाडीच्या
प्रदूषणात वाढ
ठाणे महापालिकेने शहरातील गायमुख, कोलशेत, कशेळी, साकेत, कळवा, रेतीबंदर, मुंब्रा, विटावा, कोपरी येथील खाडीच्या पाण्याची चाचपणी केली. यामध्ये खाडीचे प्रदूषणातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार आवश्यक जैव रासायनिक आॅक्सिजन चे प्रमाण ३ मिलिग्रम - प्रती लीटर पेक्षा जास्त आढळले आहे. तर विरघळलेल्या आॅक्सीजनचे प्रमाण सुद्धा ४ मिलिग्रॅम - प्रती लीटर पेक्षा जास्त आढळले आहे. तर तलावातील प्रदूषणात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे आढळून आले आहे.

शहरातील हवेची गुणवत्ता तपासता यावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी दोन कोटी खर्चून हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सध्या तीनहातनाका येथे केवळ एकाच ठिकाणच्या हवेची गुणवत्ता तपासात येत आहे. परंतु, आता इतर ठिकाणीसुद्धा अशी यंत्रणा उभारली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० डिसेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत दरवर्षी शहरातील हवेची गुणवत्तेचे निरिक्षण आणि मापन करण्यात येते. यामध्ये शहरातील विविध भागांतील हवा प्रदूषित असल्याचे सातत्याने समोर आले आहे. यंदाच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालामध्येही यावर प्रकाश टाकला आहे. सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फोटोकेमिकल आॅक्सिडन्ट, धूलिकण, बेन्झिन तसेच शिसे, आर्सेनिक, निकेल यांसारख्या जड धातूंचा हवेच्या प्रदूषकांमध्ये समावेश असतो.

औद्योगिक कामकाज, वाहन आणि बांधकाम साहित्यामुळे ही प्रदूषके हवेत मिसळतात. त्यामुळे त्याचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.हवेतील धूलिकणांचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. शहरात वाहनांचीदेखील मोठी वर्दळ असून यामुळे प्रदूषणाचा टक्कादेखील वाढता आहे. तीनहातनाका परिसरात तर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याने तेथे आधीच ही यंत्रणा बसवली आहे. मात्र, त्यामुळे केवळ एकाच ठिकाणच्या हवेतील गुणवत्तेची माहिती मिळत असल्याचे मंडळाचे मत आहे.

शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यावर आणखी तीन ठिकाणी ही यंत्रणा बसवणे आवश्यक असल्याने आता अन्य तीन ठिकाणी ती बसवली जाणार आहे. या नव्या उपकरणाच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता, हवामानातील नियमित घटकांची नोंद घेणेदेखील शक्य होणार आहे. ही यंत्रणा उभी करण्यासाठी अतिशय कमी जागेचा वापर होत असून कमी विद्युत भारावर ती चालवता येत असल्याचे या विभागाचा दावा आहे. या उपकरणाच्या माध्यमातून त्यावेळीच्या हवेचा डेटादेखील उपलब्ध होऊ शकणार आहे.

Web Title: Thane wind-sound pollution decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.