ठाण्यात आजी-माजी शिवसैनिकांत ‘काँटे की टक्कर’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:45 AM2019-04-29T02:45:21+5:302019-04-29T02:45:49+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली

Thane: A 'thorn in the thorn' of former Shiv Sena activists | ठाण्यात आजी-माजी शिवसैनिकांत ‘काँटे की टक्कर’

ठाण्यात आजी-माजी शिवसैनिकांत ‘काँटे की टक्कर’

Next

अजित मांडके

ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक प्रचार संपेपर्यंत अटीतटीची होत गेली. यात राष्ट्रवादीसाठी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. तर, शिवसेनेसाठी ठाणे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडे हा विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरतील.

मागील काही दिवसांपासून प्रचाराचा जो काही धुरळा उडाला होता, तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या ज्या फैरी झडल्याचे दिसून आले, त्यावरून ही निवडणूक रंगतदार होत गेली. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या उमेदवाराच्या शिक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने वातावरण चांगलेच तापले. मात्र, आम्ही शिक्षणापेक्षा ठाणेकरांवर विश्वास ठेवत असून त्यांनी दिलेल्या मतांच्या कौलावर आम्ही विश्वास ठेवत आहोत; ठाण्याचा विकास केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. परंतु, राष्ट्रवादी एवढ्यावरच थांबली नाही, तर होर्डिंग्ज पडल्याच्या मुद्द्यानेही या निवडणुकीत राजकीय वळण घेतल्याचे दिसून आले. त्या होर्डिंग्जसाठी एका खासदाराने पाच लाख घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने करून थेट विचारेंनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल नंदलाल समितीच्या अहवालाचे भूत पुन्हा बाहेर काढून विचारे यांच्यापुढील अडचणींत वाढ केल्याचे दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे परांजपे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील समस्यांचा पाढाच वाचल्याचे दिसून आले. यावर हवा तसा पलटवार शिवसेनेकडून झाला नाही. या घडामोडींनंतर शिवसेनेतही चलबिचल सुरू झाली असून ते सुद्धा आता ‘काँटे की टक्कर’ होईल, असे खाजगीत मान्य करू लागले आहेत.

शिवाय, या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान पालकमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाचा मुद्दा मांडत दलित ऐक्याची हाक देत ज्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले, त्याला सत्तेत वाटा मिळत नसल्याच्या नाराजीतून रिपब्लिकन आठवले गटाने युतीची साथ सोडून परांजपे यांना पाठिंबा दिला. त्याचवेळी ब्राह्मण समाजाच्या पाठिंब्यावरही दोन्ही उमेदवारांनी दावा केल्याने विविध समाजांतही ही लढत चर्चेत आली होती.

मागील पाच वर्षांत ठाणेकरांनी विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच मतदारसंघात विविध विकासकामे करण्यात यश आले. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरचे केंद्राच्या पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार, अनेक कामे सुरू झाली आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे. - राजन विचारे, शिवसेना

केवळ, महापालिकेच्या अर्थसंकल्पात ज्या कामांचा समावेश करण्यात आला होता, त्या कामांचा शिवसेना उमेदवाराचा वचननामा आहे. परंतु, आजही वाहतुकीचा, आरोग्याचा, डम्पिंगचा, मीरा-भाईंदरमधील जेट्टीचा आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. - आनंद परांजपे, राष्ट्रवादी

कळीचे मुद्दे
डम्पिंग, रेल्वेचे प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाहीत. ठाण्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. हक्काचे धरण मिळवण्यात अपयश.
नवीन ठाणे स्टेशनचे भिजत पडलेले घोंगडे, रेल्वेचे अन्य रखडलेले प्रकल्पही चर्चेत. सर्व शहरांतील वाहतूककोंडी, मीरा-भाईंदरचा जेट्टीचा रखडलेला प्रश्नही प्रचारात अग्रभागी.

Web Title: Thane: A 'thorn in the thorn' of former Shiv Sena activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.