ठाणे स्थानक : जुन्या पुलांवरील ओढा जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:31 AM2017-10-05T05:31:59+5:302017-10-05T05:32:26+5:30

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कल्याण दिशेकडील दोन्ही पूल अरुंद असून, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Thane Station: Leaning on old bridges is fatal | ठाणे स्थानक : जुन्या पुलांवरील ओढा जीवघेणा

ठाणे स्थानक : जुन्या पुलांवरील ओढा जीवघेणा

googlenewsNext

ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कल्याण दिशेकडील दोन्ही पूल अरुंद असून, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील अरुंद पुलावर झाली तशी चेंगराचेंगरी ठाणे रेल्वे स्थानकात होऊ शकते. जुने पूल रुंद करण्यापेक्षा सरकते जिने बसवून स्टेशन स्मार्ट करण्याचा दिखाऊपणा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
मंगळवारपासून सुरू झालेल्या १०० रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा अॉडिटमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचाही समावेश केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मध्यभागी काही वर्षांपूर्वी नवा पूल बांधल्यामुळे स्टेशनच्या पुढील व मागील बाजूस असलेल्या अरुंद पुलांवरील ताण काही अंशी कमी झाला. तरीही प्रवाशांची वाढती संख्या व पुढील किंवा मागील डब्यात बसून प्रवास करण्याकडे प्रवाशांचा असलेला कल यामुळे त्या जुन्या पुलांवरच चेंगराचेंगरीचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या काही फलाटांची रचना हीदेखील प्रवाशांनी विशिष्ट पुलाच्या समोर थांबणाºया डब्यांमध्ये बसण्याचे एक प्रमुख कारण आहे. प्रवाशांचा ओढा ज्या पुलांकडे असतो त्यावर किंवा त्याच्या आजूबाजूला फेरीवाले, बुटपॉलिशवाले, फळ विक्रेते बसतात. त्यामुळे एकीकडे सकाळी व सायंकाळी प्रवाशांची गर्दी व त्यातच फेरीवाल्यांचा ठिय्या यामुळे अनेकदा पुलांवर गर्दी होते. ठाणे-वाशी-पनवेल ही लोकल सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.
नव्या पुलांच्या रचनेनुसार लोकल थांबणे गरजेचे!
लोकलच्या डब्यांची संख्या वाढत्या प्रवाशांमुळे वाढू लागली. त्यानुसार फलाटांची लांबीही वाढली. पण, अजूनही ब्रिटिशकालीन रचनेनुसार, लोकल थांबवण्याच्या पद्धतीमुळे नव्या प्रशस्त पुलापेक्षा जुन्या पुलांकडे प्रवाशांचा ओढा पाहण्यास मिळतो. या रचनेत बदल करण्याची आणि प्रवासी जास्तीतजास्त नवीन प्रशस्त पुलाचा वापर कसा करतील याचाही विचार होणे आवश्यक आहे.

ठाणे-वाशी आणि पनवेल या सेवेमुळे ठाण्यात गर्दी वाढली आहे. ९ आणि १० या क्रमांकांच्या फलाटांवरही इतर फलाटांप्रमाणे जुन्या पुलांचाच प्रामुख्याने प्रवासी वापर करताना दिसतात. त्यातच या फलाटांवरील पुलांना अद्यापही सरकते जिने उभारण्यात आले नाहीत. तसेच हे जिने उभारताना, त्या जिन्यांवरून दोनपेक्षा जास्त प्रवासी कसे जातील याचा विचार होणेही महत्त्वाचे आहे.

महत्त्व वाढले
हार्बर रेल्वेमार्गे नवी मुंबई व त्यापुढे जाण्यासाठी प्रवाशांना कुर्ला स्थानक गाठावे लागत होते. आता ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली व त्यापुढील प्रवासी ठाण्यातून गाड्या पकडतात. त्यामुळे महत्त्व वाढले आहे.

Web Title: Thane Station: Leaning on old bridges is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.