पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 09:31 PM2018-05-16T21:31:43+5:302018-05-16T21:31:43+5:30

ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले.

Thane police reunite 15 year old girl with parents after 5 years | पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट

ठाण्याच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

Next
ठळक मुद्देमुंबईची मुलगी सापडली ठाण्यातगुगल आणि व्हॉटसअ‍ॅपची पोलिसांनी घेतली मदतठाण्याच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

ठाणे: पाच वर्षांपूर्वी काशीमीरा परिसरातून बेपत्ता झालेल्या एका मुलीचा ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी शोध घेतला. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर पालकांनी तिची गळाभेट घेतली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या.
नेहा दिनेश विश्वकर्मा (१६, रा. कांदीवली, मुंबई) असे पाच वर्षांपूर्वी कादीवली परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. सध्या ती ठाण्याच्या वर्तकनगर येथील ‘दिव्यप्रभा मुलींचे आश्रम’ येथे वास्तव्याला होती. ‘चाईल्ड प्रोटेक्शन युनिट’च्या सहायक पोलीस निरीक्षक मंजूषा भोंगळे, हवालदार प्रतिभा मनोरे, भाऊसाहेब शिनगारे, पोलीस नाईक प्रमोद पालांडे, महंमद मुलाणी आणि नितिन पाटील आदींच्या पथकाने १४ मे रोजी या आश्रमामध्ये २०१३ पासून असलेल्या नेहाची विचारपूस केली. वडील मालाड येथे डीजे बनविण्याचे काम करतात. गाव सुलतानपूर. मुन्ना आणि जानू अशी भावांची नावे आहेत. लहान असतानाच आई वारली. त्यामुळे तिचा चेहरा फारसा आठवत नाही. मात्र, बिंदू ही सावत्र आई आहे. सूरज हा अन्य एक भाऊ आहे. इतकीच जुजबी माहिती तिने पोलिसांना चौकशीमध्ये दिली. त्यानंतर गुगलच्या आधारे मालाडमधील डीजे चालकांचे संपर्क क्रमांक पोलिसांनी मिळविले. त्यातील काही संपर्क क्रमांकावर मुलीच्या पालकांबाबत चौकशी करण्यात आली. त्यापैकी सिद्धार्थ याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मुलीची माहिती देऊन ती डीजेच्या व्हॉटसअ‍ॅपवर गृ्रपवर टाकण्यात आली. त्यानंतर दिनेश विश्वकर्मा या डीजे बनविणाऱ्याची मुलगी पाच वर्षांपूर्वी हरविल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर कांदिवलीतील साईबाबा मंदिराजवळील दिनेश विश्वकर्मा यांनी मोबाईलवरुन पोलिसांना संपर्क साधून आपली मुलगी वयाच्या ११ वर्षी २०१३ मध्ये त्यांची मुलगी हरविल्याचे त्यांनी सांगितले. १३ एप्रिल २०१३ रोजी कुरार पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पाच वर्षांपूर्वीचा नेहाचा फोटो तिच्या वडीलांकडे पोलिसांनी पाठविला. त्यांनी तो ओळखला. त्यानंतर तिच्या आई वडीलांचाही फोटो व्हॉटसअ‍ॅपवरुन मागविण्यात आला. मात्र, हे फोटो पाहूनही तिने त्यांना ओळखत नसल्याचे आणि काही आठवत नसल्याचेही सांगितले. त्यानंतर कुरार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलगी हरविल्याच्या तक्रारीची खातरजमा करण्यात आली. कुरार पोलिसांनी दिलेली मुलीची माहिती आणि नेहाची माहिती तंतोतंत जुळल्यानंतर १५ मे रोजी तिच्या पालकांना ठाण्याच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या कार्यालयात बोलविण्यात आले. त्यावेळी तिच्या पालकांनी मुलीला तर मुलीनेही आई वडीलांसह भावांना प्रत्यक्ष पाहिल्यानरंतर ओळखले.
ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या पथकाने लेक आणि पालक यांच्यात पुनर्भेट घडवून आणल्याने या दोघांनीही पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केले. पाणावलेल्या डोळयांनी आपल्या मुलीला पालकांनी जवळ घेतले. त्यावेळी पोलिसांनाही गहिवरुन आले.


 

Web Title: Thane police reunite 15 year old girl with parents after 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.