ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:15 AM2018-12-11T00:15:27+5:302018-12-11T00:16:16+5:30

विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेपाच हजार रुपये : चार गणवेश आणि दोन जोड्या बूट घ्यावे लागणार, ठरावीक दुकानांची सक्ती

Thampapa student too attractive uniform! | ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात!

ठामपा विद्यार्थीही आकर्षक गणवेशात!

Next

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांचा मेकओव्हर करण्याचे निश्चित केले असताना आता महापालिका शाळांचेविद्यार्थीसुध्दा वेगळ्या रंगसंगतीच्या गणवेशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी सज्ज होणार आहेत. येत्या १० दिवसांत पालिकेचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांप्रमाणे हटके गणवेशात दिसणार आहेत. या गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आखल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना हायटेक शिक्षण देण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांचे गणवेश हे फारसे चांगले नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. आता एका खासगी बँकेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे हे गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांचे जसे गणवेश असतात, त्याच धर्तीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका शाळांमधील २८ हजार विद्यार्थ्यांचे जुने गणवेश डिसेंबरमध्येच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पूर्वीप्रमाणेच १६ कोटींचा खर्च होणार आहे. परंतू यातून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश उपलब्ध होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी केला आहे.

हे नवीन गणवेष विद्यार्थ्यांना स्वत:च विकत घ्यायचे असून त्याचे पैसे मात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग केले जाणार आहेत. गणवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात सुमारे साडे पाच हजार जमा होणार आहेत. या पैशात विद्यार्थ्यांना शाळेचे दोन गणवेश, प्रत्येकी एक - एक पीटी आणि खेळाचा गणवेष विकत घ्यावा लागणार आहे. त्याव्यतिरिक्त शाळेचे आणि खेळाचे असे प्रत्येकी एक - एक बूट ही विकत घ्यावे लागणार आहे. यासाठी महापालिकेने काही ठराविक दुकानदार निश्चित केले असून, त्यांच्याकडे हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता पालक अनेकवेळा इच्छूक नसतात. त्यांचा कल खासगी शाळांकडे अधिक असतो. परिणामी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत होती. याकडे गांभीर्याने पाहत आता या शाळांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२00 वर्गांमध्ये देणार टचस्क्रीन एलईडी
येत्या दोन महिन्याच्या कालावधीत ठाणे महापालिकेच्या शाळामधील २०० वर्गांमध्ये फळ्यांऐवजी ५५ इंचचा टचस्क्रीन एलईडी बसवण्यात येणार आहे. याशिवाय साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी खास अ‍ॅपही तयार करण्यात येत आहे.
तब्बल ३५० शिक्षकांना डिजीटल फळा कसा हाताळावा यापासून ते संकल्पांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीने कसे शिकवावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक इयत्ता व वर्गासाठी डिजीटल कीट तयार करण्यात आली आहे.

केडीएमसीचे विद्यार्थी प्रतीक्षेतच
सभापतींना दालन मिळाले : विद्यार्थ्यांना साधा गणवेशही नाही
डोंबिवली : सभापती विश्वदीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून कार्यालयासाठी तगादा लावला होता. अखेर मुख्यालयाच्या तळमजल्यावरील एका खोलीत त्यांना दालन मिळाले असून, त्याचा शुभारंभ बुधवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. सभापतींना दालन मिळाले असले तरी केडीएमसीच्या ६० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना मात्र अर्धे शैक्षणिक वर्ष सरले तरीही गणवेश मिळाला नसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपाच्या पवार यांना सभापती पद मिळाल्यानंतर शुभारंभापासूनच त्यांनी दालनासाठी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे पाठपुरावा केला. पावसाळ्यात त्यांना जागा मिळाली. आता डागडुजीचे काम झाले असून बुधवारी दालनाचा शुभारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा यासाठीही त्यांनी जूनपासून पाठपुरावा केला होता; परंतू अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांचे गणवेश अडले आहेत का, अशी टिका या पार्श्वभूमीवर होत आहे.

नगरसेविका सरोज भोईर महिला बालकल्याण सभापती होत्या, तेव्हा जूनमध्ये बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना गणवेश दिला होता. पण त्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने समस्या वाढली आहे. जूनमध्ये गणवेश देण्यासाठी आधी टेंडर काढणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागण्यासाठी ते आवश्यक आहे
- प्रकाश भोईर, गटनेते,मनसे

शिक्षण मंडळ सभापती हेदेखील प्रशासनाचा एक भागच आहेत. माझ्याकडे त्या विषयासंदर्भातली कोणतीही फाइल प्रलंबित नाही. मुळात, निविदा उघडणे यासारख्या तांत्रिक बाबी माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे नियमानुसार जे काही करणे शक्य आहे, तेच होणार यात संदेह नाही
- गोविंद बोडके, आयुक्त

विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत याला सर्वस्वी प्रशासन कारणीभूत आहे. आयुक्तदेखील हवे तेवढे लक्ष घालत नाहीत. टेंडर निघाले असून ते अजून उघडलेले नाही. त्यामुळे आता सभापती बसल्यानंतर निविदा उघडल्या जातील. त्यामुळे या महिनाअखेरीस अथवा जानेवारीत गणवेश दिले जावेत अशी अपेक्षा आहे.
- विश्वदीप पवार, सभापती, शिक्षण मंडळ

Web Title: Thampapa student too attractive uniform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.