ठळक मुद्देठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवालाविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली होती. फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर एक-दोन दिवस रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा दिसला.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 18 नोव्हेंबरला शनिवारी ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून राज ठाकरे फेरीवाल्यांसह राज्यासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करतील. सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी मनसेने फेरीवाल्यांचे सामना उलथवून लावत पिटाळून लावले. त्यामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला. 

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवालाविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीरसभाही ठाण्यामध्येच होणार आहे. राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथ अडवून ठेवल्याने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हटवले. 

फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर एक-दोन दिवस रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा दिसला. पण आता पुन्हा पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता कुठली भूमिका घेतात याची उत्सुक्ता आहे. महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी कमालीची उत्सुक्ता आहे. राज ठाकरे शिवसेनेबद्दल काय बोलणार याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष असेल. 

राज्यात भाजपाचा प्रभाव वाढल्यानंतर ठाकरे बंधुंमध्ये ब-यापैकी जवळीक निर्माण झाली होती. पण शिवसेनेने मुंबई महापालिकेतील सत्तेवरील आपली पकड घट्ट करण्यासाठी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक पळवले. शिवसेनेची ही कृती मनसेसाठी एक धक्का होती. त्यामुळे या विषयावर राज ठाकरे काय भूमिका घेतात त्यावर भविष्यातील मनसे-शिवसेना संबंध ठरतील. 

सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही
 'सुशांत माळवदेवर झालेला हल्ला मी कधीच विसरणार नाही. म्हणून रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असे राज ठाकरे म्हणाले.  मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर 28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी अनधिकृत फेरीवाल्यांनी  जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला होता. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. 

संजय निरुपम यांच्याकडून समर्थन
हल्ला होण्याच्या काही वेळापुर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये पार पडली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला होता. याचे गंभीर परिणाम मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला होता. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं. विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे