A teenage girl raped and sentenced to 20 years rigorous imprisonment for the offense | अल्पवयीन मुलीवर एका मुलादेखत बलात्कार, आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे : अल्पवयीन मुलीवर एका मुलादेखत बलात्कार करणा-या आरोपीला ठाणे न्यायालयाने शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कळवा येथे दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
या प्रकरणातील आठ वर्षीय पीडित आईसोबत कळवा येथील सह्याद्री सोसायटीत राहण-ºया आजीकडे काही दिवसांसाठी आली होती. पीडित मुलगी एका लहान मुलासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी राहुल राजेंद्र गोंधळी (२१) हादेखील त्या वेळी तिथेच होता. राहुलने गोड बोलून पीडित मुलीला त्याच्या घरामध्ये नेले. सोबत खेळणारा लहान मुलगाही तिच्यापाठोपाठ घरामध्ये गेला. आरोपीने लहान मुलाच्या डोळ्यांदेखत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी जाऊन आजीला हा प्रकार सांगितला. आजीने याप्रकरणी कळवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली. ९ जून २०१५ रोजीची ही घटना असून आरोपी तेव्हापासून आजतागायत गजाआड आहे. जामिनासाठी आरोपीने उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने एकूण १० साक्षीदार तपासले. मात्र, कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुल्ला आणि डी.के. ताजणे यांनी केलेला तपास, गोळा केलेले साक्षीपुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. आरोपीचे वय विचारात घेऊन कमी शिक्षा देण्याची विनंती आरोपीच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने तीदेखील फेटाळून आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.


Web Title: A teenage girl raped and sentenced to 20 years rigorous imprisonment for the offense
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.