Take the University sub-station back! | विद्यापीठ उपकेंद्राची जागा परत घ्या!

कल्याण : मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कल्याणमध्ये सुरू करण्यासाठी केडीएमसीने जागा दिली आहे. मात्र, हे केंद्र सुरू करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची प्रशासनाला काडीमात्र लाज वाटत नाही. उपकेंद्र सुरू करता येत नसल्यास महापालिकेने दिलेली जागा परत घ्यावी. तेथे कॉलेज सुरू करावे, असे आदेश शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे दिले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करून व्हर्च्युअल क्लासरूम, टॅबचे वाटप तसेच आठवी ते दहावीचा अभ्यास सोप्या पद्धतीने शिकता यावा, याकरिता युवासेनेतर्फे आता ‘टॉप स्कोअर’ वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटच्या प्रोमोकार्डचे वाटप युवासेनेचे प्रमुख ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी वरील आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांना दिले.
कल्याण पूर्वेतील मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना सरचिटणीस वरु ण सरदेसाई, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर देवळेकर, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
२००५ पासून विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर, त्यासाठी लागणाºया खर्चाची तरतूद विद्यापीठ अर्थसंकल्पात करण्यात आली. महापालिकेने त्यासाठी जागा दिली. उपकेंद्राची इमारत बांधून तयार आहे. ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणे अपेक्षित होेते. विद्यापीठाच्या आॅनलाइन पेपरतपासणीमुळे हकालपट्टी करण्यात आलेले कुलगुरू संजय देशमुख यांनी केवळ आश्वासने दिली. त्यामुळे उपकेंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. उपकेंद्र सुरू होत नसेल, तर त्यासाठी दिलेली जागा परत घ्या, असे ठाकरे यांनी सांगितले.
विद्यापीठाने उभारलेल्या वास्तूमध्ये महापालिकेने कॉलेज सुरू करून त्याचा शैक्षणिक उपयोग सुरू करावा, असे स्पष्ट केले आहे. शिक्षणात काही बदल करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहे. मुलांच्या पाठीवर दप्तरांचे ओझे कमी झाले पाहिजे. शाळेनंतर मुले क्लासला जातात. त्यामुळे ती कोंडल्यासारखी राहतात. त्यांनी खेळायचे कधी? त्यांना दिलासा देऊन त्याचे शिक्षण हसतखेळत पद्धतीने करता येईल. त्यासाठी टॉप स्कोअर वेबसाइट सुरू केली आहे. ही वेबसाइट मुलांना त्यांचे विषय आकलन करून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

निवडणुकीची तयारी : कार्यक्रमाचे ठिकाण कल्याण पूर्व निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चीला गेला. कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड आहेत. ते भाजपा समर्थक आहेत. पूर्वेला शिवसेनेचे कार्यक्रम भरीव स्वरूपात होत नाही. त्यासाठी शिवसेनेने पूर्वेकडील शाळा निवडून शिवसेना निवडणुकीच्या दृष्टीने कल्याण पूर्वेतही वाटचाल करत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मात खावी लागली होती. यापूर्वी टॅबवाटपाचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी डोंबिवलीत झाला होता. त्यानंतर, डोंबिवलीतील खासदारांच्या नवरात्र उत्सवात आदित्य ठाकरे आले होते. आता पुन्हा शालेय कार्यक्रमासाठी ठाकरे यांची उपस्थिती महत्त्वाची मानली गेली. मुलांशी साधला संवाद...
शाळेत मुलांसमोर भाषणबाजी न करता थेट मुलांच्या घोळक्यात ठाकरे यांनी प्रवेश केला. मुलांच्या मनाचा ताबा घेत त्यांच्याशी संवाद साधला. मुलांना बोलते केले. अभ्यासाचे टेन्शन घेता का? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारता सगळ्यांनी एका सुरात ‘हो,’ उत्तर दिले. आता शिकता त्यापेक्षा सोप्या पद्धतीने शिकायला आवडेल का? असा सवाल विचारला. मुले पुन्हा एका सुरात ‘हो’ म्हणाली. त्यानंतर, ठाकरे यांनी स्वत: टॉप स्कोअर वेबसाइटची माहिती दिली.


Web Title: Take the University sub-station back!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.