Suggest names for planned metro stations; Appeal to the Mayor's opponents | नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा; महापौरांचे विरोधकांना आवाहन

राजू काळे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

शहरातील नियोजित मेट्रो मार्ग दहिसर चेकनाका येथुन विस्तारीत करण्यात आला असुन त्यासाठी ९ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. मात्र त्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नसल्याने त्यांना सर्वानुमते मान्य ठरणारी नावेच देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. या नियोजित ९ मेट्रो स्थानकांत राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाका परिसरातील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरात दोन स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. भार्इंदर पुर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके निश्चित करण्यात आली असुन त्यात काशिमिरा वाहतुक बेटालगतच्या झंकार कंपनी, मीरारोड येथील साईबाबा नगर, दिपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट या छेदमार्गावरील क्रिडा संकुल व इंद्रलोक या परिसरांचा समावेश आहे. भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित करण्यात आली असुन त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसरांचा समावेश आहे. सुरुवातीला नियोजित मेट्रो मार्ग काशिमिरा वाहतुक बेटाहुन छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला होता. तो तत्कालिन महासभेच्या मान्यतेनंतर भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान व पुर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. या नियोजित मेट्रो मार्गाच्या पाहणीकरीता एमएमआरडीए आयुक्त यु. पी. एस. मदान व अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या शिष्टमंडळाने फेब्रुवारी २०१७ मध्ये शहराला भेट देत मेट्रोच्या कारशेडसह स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यात ९ मेट्रो स्थानकांच्या जागा निश्चित करण्यात आल्या असुन त्याचा रितसर ठराव महासभेत मंजुर करुन पाठविण्याची सुचना पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना एमएमआरडीएने पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार महापौरांनी शिवसेना व काँग्रेस सदस्यांनीही त्या स्थानकांना नावे सुचवावी, असे आवाहन केले असुन त्यावर चर्चा करुनच सर्वानुमते नियोजित स्थानकांना नावे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 तत्पुर्वी भाजपाचे सभागृह नेता रोहिदास पाटील यांनी नियोजित मेट्रो स्थानकांना शहरातील प्रमुख गावांची नावे देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यात त्यांनी १९८५ मध्ये १) भार्इंदर पुर्व (नवघर, गोडदेव, खारी व बंदरवाडी) २) भार्इंदर पश्चिम (राई, मोर्वा व मुर्धा) ३) काशी व मीरा

४) घोडबंदर या चार ग्रुप ग्रामपंचायत समावेशाने नगरपरिषदेची स्थापना झाल्याचे सांगुन १९९० मध्ये चेना, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेशाने नगरपालिकेची स्थापना झाल्याचे म्हटले आहे. यानंतर २८ फेब्रूवारी २००२ रोजी महापालिकेची स्थापना झाली असली तरी शहराचे गावपण राखण्यासाठी त्यांनी पांडुरंगवाडी, अमर पॅलेस, झंकार कंपनी, दिपक हॉस्पिटल, इंद्रलोक, क्रिडा संकुल, इंद्रलोक व मॅक्सस मॉल या परिसरातील मेट्रो स्थानकांना अनुक्रमे पेणकरपाडा, मीरागाव, काशीगाव, शिवार गार्डन, नवघरगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहिद भगतसिंग अशी नावे स्थानकांना देण्याची सुचना केली असुन उर्वरीत साईबाबा नगर व नेताजी सुभाषचंद्र बोस हि नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे.