'ऑन द स्पॉट' - ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाल्यांच्या कब्जात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 03:22 AM2018-12-17T03:22:19+5:302018-12-17T03:23:09+5:30

रेल्वे प्रशासनासह पालिकेचेही पाठबळ : न्यायालयाच्या आदेशाला तिलांजली, रेल्वे पोलिसांसह महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा केवळ दिखावा

'On the Spot' - Thane Railway Station Conquest of Ferries | 'ऑन द स्पॉट' - ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाल्यांच्या कब्जात

'ऑन द स्पॉट' - ठाणे रेल्वे स्थानक फेरीवाल्यांच्या कब्जात

googlenewsNext

पंकज रोडेकर, ठाणे

ठाणे रेल्वे स्थानक हे ऐतिहासीक असे स्थानक आहे. या स्थानकाच्या परिसरात महापालिकेने आपल्या महत्वांकाक्षी प्रकल्पांपैकी एक सॅटीस प्रकल्प उभारला आहे. याच परिसरात रेल्वे प्रशासन आणि ठाणे पालिकेच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत. त्या-त्या यंत्रणेने त्यांच्या हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई करणे अपेक्षित असते. पण दोन्ही यंत्रणांनी याबाबत कधी संयुक्त कारवाई केल्याचे पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे येथे बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांचे फावत आहे.
स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन कारवाई करण्यासाठी जाते, तेव्हा फेरीवाले त्यांचे ठेले रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत नेतात आणि रेल्वे प्रशासन कारवाई करण्यासाठी सरसावते तेव्हा ठेले महापालिका हद्दीत नेले जातात. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. तु मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो, असाच काहीसा प्रकार सरकारी यंत्रणा आणि फेरीवाल्यांमध्ये सुरु आहे. यामागे काही जणांचे हितसंबंध गुंतल्याने हे चित्र बदलणे शक्य नसल्याचा आरोप केला जात आहे. या परिस्थितीमुळे न्यायालयाच्या आदेशाला मात्र तिलाजंली दिली जात आहे.

सरकारी यंत्रणेसह राजकीय पक्षही गप्पच

एलफि न्स्टन रेल्वे स्थानकावरील अपघातानंतर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने खळखट्याक करण्यास सुरूवात केली होती. न्यायालयानेही सर्वच रेल्वे स्थानक आणि फेरीवाल्यांमध्ये १५० मीटरची लक्ष्मणरेषा आखून दिली. एवढेच नव्हे तर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस व रेल्वे पोलीस यंत्रणांना स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी नवलाईच्या नऊ दिवसांप्रमाणे आदेशाचे तेवढ्यापुरते पालन केले. त्यानंतर मात्र फेरीवाल्यांनी हळुहळू रात्री आणि आतातर दिवसाही बिनदिक्कतपणे धंदा मांडल्याचे चित्र प्रत्येक स्थानक परिसरात पाहण्यास मिळते. परिस्थिती एवढी गंभीर असली तरी, या मुद्यावर रान पेटवणारे राजकीय पक्ष किंवा शासकीय यंत्रणा आता का गप्प बसले, हा प्रश्नच आहे.

मनसे झाली थंड
एलफिस्टन अपघातानंतर ठाण्यातून खळखट्याकाला सुरूवात झाली खरी, पण हे खळखट्याक केवळ प्रसिद्धीपुरतेच होते, असा आरोप आता होऊ लागला आहे. सुरुवातीला ‘दिल से’ आक्रमक असलेली ‘मनसे’ किमान ठाण्यात तरी थंड पडल्याचे चित्र दिसत आहे.

दोष नागरिकांचाही
रेल्वेस्थानक परिसरातून पायपीट करताना प्रत्येक प्रवासी फेरीवाल्यांसह सरकारी यंत्रणेला दोष देऊन मोकळा होतो. पण या परिस्थितीसाठी फेरीवाल्यांबरोबरच त्या-त्या रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि तेथील स्थानिक नागरिकही तेवढेच दोषी आहेत. कितीही घाई गडबड असली तरी नागरिकांनी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत न घेण्याचा निश्चय केला, तर हे चित्र बदलण्यास मदत होईल. धंदाच झाला नाही, तर फेरीवाल्यांना आपोआप आळा बसेल आणि रेल्वे स्थानके फेरीवालामुक्त होतील. रेल्वे स्थानक आणि फेरीवाल्यांमध्ये १५० मीटरची लक्ष्मण रेषा आखण्याची वेळच येणार नाही.

पूर्वेलाही
फेरीवाल्यांचा वेढा
ठाणे रेल्वेस्थानकाला पश्चिमेप्रमाणेच पूर्वेलाही फेरीवाल्यांचा तितकाच वेढा पाहण्यास मिळतो. पूर्वेकडील फेरीवाले थेट दहा नंबर फलाटापर्यंत पोहोचले आहेत. त्या परिसरातील रस्ता अगोदरच अरूंद आहे. त्यात फेरीवाले आणि रिक्षावाल्यांमुळे रेल्वे स्थानकात ये-जा करणे नकोसे होऊन बसले आहे.

बहुसंख्य फेरीवाले
हिंदी भाषिक
ठाणे, मुंब्रा, दिवा तसेच कळव्यातील फेरीवाले बहुसंख्येने हिंदी भाषीक असल्याचे दिसते. एखाद्या गोणीत किंवा एक टेबल मांडून बिनधास्तपणे ते धंदा करतात. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल साहित्य विकणारे, पट्टे, पायमोजे तसेच पुस्तक विक्रेत्यांसह सरबत, फळ विक्रेतेही आहेत. रात्रीच्या वेळी ठाण्यातील गावदेवी मंदीरापासून ठाणे रेल्वे स्थानकांपर्यंत हातगाड्या लावून रस्ता आपल्याच बापाच्या मालकीचा आहे, अशा अविर्भावात फेरीवाले धंदा करतात.

कळवा-मुंब्रा-दिव्यात
पूर्वेला फेरीवाले
कळवा-मुंब्रा आणि दिवा या तिन्ही रेल्वे स्थानकाच्या पुर्वेला फेरीवाल्यांनी जागा बळकावल्याचे दिसत आहे. कळवा आणि दिव्यात अगदीच भीषण स्थिती आहे. येथील स्थानकांना खेटूनच फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र दिसते. मुंब्य्रात रिक्षा थांबा असल्याने स्थानकाला अगदी खेटून नाही; पण जवळपास फेरीवाले बसलेले दिसतात. फेरीवाले आणि रिक्षावाल्यांमुळे पादचाऱ्यांना येथे तारेवरची कसरत करावी लागते.

स्टेशन असो वा सॅटीसखालचा परिसर, तो १०० टक्के फेरीवालामुक्त होऊ शकतो; पण ठामपाच्या अधिकाºयांची तशी मानसिकताच नाही. एलफिस्टननंतर मनसे ठाण्यातील फेरीवाल्यांवर लक्ष ठेवून आहे. ठाण्यात बºयाचवेळा मनसेने धाडी टाकून फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आहे. स्टेशन परिसर फेरीवालामुक्त व्हावा, यासाठी मनसे लक्ष ठेवून आहे आणि यापुढेही ठेवणार आहे.
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे

न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानक परिसरात १५० मीटरच्या आत बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईत कोणत्याही फेरीवाल्याची गय केलेली नाही आणि केली जाणारही नाही. स्टेशन परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

रेल्वे स्थानकात किंवा पुलांवर बसणाºया फेरीवाल्यांवर रेल्वे पोलिसांच्यामार्फत कारवाई होणे अपेक्षीत आहे; पण तशी कारवाई होताना दिसत नाही. याबाबत संबंधित यंत्रणेकडून मनुष्यबळ कमी असल्याची कारणे दिली जातात. जर खरंच मनुष्यबळ कमी असेल, तर ठाणे शहर पोलिसांची मदत घेवून कारवाई करणे गरजेचे आहे. त्यातच मी संचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रेल्वे पोलिसांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे. - राजेंद्र वर्मा, संचालक, ठाणे रेल्वे स्थानक

 

Web Title: 'On the Spot' - Thane Railway Station Conquest of Ferries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.