सोशल मीडियावरील लाईक हा कलेचा प्रतिसाद नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:30 AM2018-01-22T02:30:28+5:302018-01-22T02:30:39+5:30

सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये.

 Social media is not a response to the artwork! | सोशल मीडियावरील लाईक हा कलेचा प्रतिसाद नव्हे!

सोशल मीडियावरील लाईक हा कलेचा प्रतिसाद नव्हे!

Next

ठाणे : सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये. एखाद्या कलाकृतीला जास्त लाईक्स मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे, असे समजू नका. अनेक जण लाईक करतात. पण त्यातील मजकूरही त्यांनी वाचलेला नसतो, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी मांडले.
कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे आयोजित व्यंगचित्रकार संमेलनात सोशल मीडिया आणि व्यंगचित्रे या परिसंवादात ते बोलत होते. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडित, महेंद्र भावसार, गणेश जोशी, ‘लोकमत’च्या पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी आदी मान्यवर यात सहभागी झाले होते.
बोधनकर म्हणाले, सोशल मीडियाचा वापर मी गेली पाच वर्षे करत आहे. हे एक प्रभावशाली माध्यम आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. सोशल मीडियामुळे घराघरात बातमी लगेच पोहोचते. त्यासाठी दुसºया दिवशीच्या वृत्तपत्राची आपण वाट पाहत नाही. समाजाला व्यंगचित्र कळत नाही, असे जर कलावंताला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. समाज कलावंताची परीक्षा घेत असतो.
चित्रकारांनीही स्वत:च स्वत: चे परीक्षण केले पाहिजे. दुसºयांनी चुका दाखवून देण्याची वेळ येऊ नये. व्यंगचित्र लपविले तर ओळी कळणार नाही आणि ओळी लपविल्या तर व्यंगचित्र कळणार नाही. ही व्यंगचित्राची खरी ताकद आहे. अशाप्रकारची व्यंगचित्रे कलावंतानी काढली पाहिजे. व्यंगचित्रकारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत संचार करावा म्हणजे त्यांची व्याप्ती वाढेल, असे त्यांनी सांगितले.
चारूहास पंडित म्हणाले, सध्या चांगले कार्टुनिस्ट राहिले नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मीडियाजवळ कार्टुनिस्टकडे बघण्याचा डोळा नाही. या काळातही चांगले कार्टुनिस्ट तयार होत आहेत. आताच्या काळात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमेच चांगले होते किंवा लोकमान्य टिळकांचे अग्रलेख चांगले होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कार्टुनिस्टमध्येही वेगळे प्रवाह येतात. आपले व्यंगचित्र कोण पाहते, हे समजून घेतले तर त्यातून जास्त सुस्पष्टता येईल. कलावंतालाही अपग्रेड होता येईल. एखाद्या व्यंगचित्राला १५ लाख लोकांनी लाईक केले तर त्यांचा आर्थिक उपयोग काय? असे वाटेल. पण त्या लोकांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. वृत्तपत्राच्या तुलनेत सोशल मीडियाला लिमिटेशन नसतात. फेसबुक, युट्युुबपुरता आता सोशल मीडिया मर्यादित राहिलेला नाही. इन्स्टाग्राम, ट्विटर अशी अनेक माध्यमे आहेत. त्यातूनही अर्थाजन करता येऊ शकते. सोशल मीडिया हे व्यंगचित्रकारांसाठी वृत्तपत्रांच्या पुढचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत कुलकर्णी म्हणाले, एखाद्या कलावंताला मासिकात किंवा वृत्तपत्रात व्यंगचित्र छापण्याची संधी मिळते. एखाद्याला ती मिळत नाही. पण सोशल मीडियावर प्रत्येकाला संधी मिळतेच. माझ्या व्यंगचित्रात काय त्रुटी आहेत, हे सांगणारे संपादक मला माझ्या सुदैवाने मला भेटले. सोशल मीडियात व्यंगचित्र प्रसिध्द करताना एक ज्येष्ठ व्यक्ती संपर्कात हवी. जी आपल्याला त्रुटी सांगू शकतील. ही एक त्रुटी सोडली तर हे माध्यम अफाट आहे. आपल्या व्यंगचित्रामुळे दंगली व्हाव्यात, असे कोणत्याही व्यंगचित्रकाराला वाटणार नाही. एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात. त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. पण बहिष्कार टाकणे योग्य नाही. आपला देश , समाजाचे भान राखल्यास सोशल मीडियासारखे माध्यम नाही, असे त्यांनी सांगितले.
गणेश जोशी म्हणाले, प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया, तेथील वाचक कोणत्या भाषेचा आहे याच काय त्या मर्यादा असतात.

जर चित्र काढताना शब्दाची गरजच नसेल, तर ते कोणत्याही विषयावर असले तरी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून त्यावर रिप्लाय येतो. त्यांचा न्यायनिवाडा लगेच होतो. तुम्ही चुकीचे मांडले तर त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटतात. कार्टुनवर नेत्याला काही वाटत नाही. पण कार्यकर्ता विभागला गेला आहे. त्यांच्यात मतभेद दिसून येतात.
कोणता रंग वापरायचा, असा प्रश्न हल्ली निर्माण होतो. कलावंताला सगळे रंग सारखे असतात. पण आपल्याकडचे रंगही जाती-धर्मात विभागले गेले आहेत. कट्टरवाद, धार्मिक, जातीयवाद यांचा फटका तुम्हाला नक्की बसतो. कोणाच्या भावना दुखवल्यास माफीही मागता आली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
कैलास म्हापदी यांनी सांगितले, सोशल मीडियाचे मूळ प्रिंट मीडियात आहे. व्यंगचित्रकारांनी चित्राचा दर्जा सुधारण्यासाठी रोजची वृत्तपत्रे वाचली पाहिजेत. लोक समजून घेतले पाहिजेत. वृत्तपत्रांचे वाचन केले नाही तर चित्रे बोन्सायसारखी होतील. बदलत्या जमान्याबरोबर चित्रकारांनीही बदलले पाहिजे. नंदकुमार टेणी म्हणाले, ज्यांच्यामुळे कॅरेक्टर सुचतील अशा व्यक्ती माझ्या काळात होत्या याबद्दल बाळासाहेब ठाकरे स्वत:ला भाग्यवान समजत. व्यंगचित्रकारांची रेषा, डौल चांगला हवा. कार्टुनिस्टला व्यंग नेमके पकडता यायला हवे.

Web Title:  Social media is not a response to the artwork!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.