दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 08:05 PM2017-12-01T20:05:29+5:302017-12-01T20:06:00+5:30

मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय.

Shop Lists in the Official Language of the Shop, Otherwise Movement, MNS 'Warnings | दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

Next

मीरा रोड - मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. या शिवाय मराठी एकीकरण समितीने मराठी राजभाषेत पाट्या लावण्यासह लेखी आश्वासन देऊन देखील कारवाई न करणा-या पालिका अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. यामुळे शहरात मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

दुकाने वा विविध आस्थापनांचे नामफलक हे प्रामुख्याने राजभाषा मराठीमध्ये लावले पाहिजेत, असे नियमात आहे. परंतु मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास या नियमाचे उल्लंघन करून मराठी राजभाषेचा अवमान केला जातोय. मुंबई महापालिका एकीकडे मराठी भाषेत पाट्या नसल्यास खटले दाखल करून दंड वसूल करते. पण मीरा-भार्इंदरमध्ये मात्र महापालिकेचा परवाना विभाग तसेच शासनाचा दुकान - आस्थापना नोंदणी विभाग मात्र सातत्याने याकडे दुर्लक्ष करत आलाय.

शहरात अन्य भाषिकांची संख्या जास्त असल्याने मतांसाठी प्रमुख राजकीय पक्ष देखील याकडे सोयीस्कर डोळेझाक करतात. तसे या आधी काही वर्षांपूर्वी मराठी भाषेत दुकाने - आस्थापनांच्या पाट्यांचा मुद्दा पेटला होता. परंतु काही काळाने पुन्हा तो बाजूला पडला. मराठी एकीकरण समितीने देखील १४ मार्च व १५ नोव्हेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन शहरातील दुकाने-आस्थापनांचे नामफलक मराठी राजभाषेत हवेत म्हणून मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. महापालिकेच्या परवाना विभागाने ५ जुलै २०१७ला मराठी भाषेत नामफलक लावण्याबाबत कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन समितीला दिले होते. पण पुढे कारवाई मात्र काहीच झाली नाही.

आता समितीचे उपाध्यक्ष सचिन घरत यांनी १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पत्र देऊन दुकाने -आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याबद्दल कार्यवाहीचे आश्वासन देऊन देखील त्याचे पालन न करणा-या पालिका अधिका-यांना निलंबित करा तसेच मराठी राजभाषेचा अवमान करणा-या दुकाने - आस्थापनांवर कारवाईची मागणी घरत यांनी केली होती. तोच मनसेने देखील मराठी नामफलकांचा मुद्दा हाती घेतला असून शहरातील दुकानदारांना मनसेच्या वतीने पत्र वाटप करण्यात आले आहे. दुकाना-दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी पत्र देऊन नामफलक मराठी भाषेत करून मराठी राजभाषेचा सन्मान राखा, असे आवाहन केले आहे.

मराठी नामफलकासाठी आग्रह धरतानाच १५ दिवसांत मराठी भाषेत नामफलक केले नाहीत तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा देखील दुकानदारांना दिला जात आहे. मराठी भाषेत नामफलक हवेत असे नियमाने बंधनकारक आहे. याची कल्पना प्रशासनासह दुकानदारांना देखील आहे. परंतु तरी देखील मराठीला डावलून अपमान केला जात असल्याने आम्ही आधी मराठीतून नामफलक लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. पालिका व गुमास्ता विभागास देखील कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे, असे मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.

Web Title: Shop Lists in the Official Language of the Shop, Otherwise Movement, MNS 'Warnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.