शिवसेनेची पर्यावरणवादी कार्यकर्तीविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:17 AM2018-10-17T00:17:38+5:302018-10-17T00:17:50+5:30

अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद : पालकमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप

shivsena file complaint against environmentalist | शिवसेनेची पर्यावरणवादी कार्यकर्तीविरुद्ध तक्रार

शिवसेनेची पर्यावरणवादी कार्यकर्तीविरुद्ध तक्रार

Next

उल्हासनगर : पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याची तक्रार शिवसेनेने पर्यावरणवादी कार्यकर्त्या सरिता खेमचंदानी यांच्याविरुद्ध पोलिसांकडे दिली. त्यानुसार खेमचंदानी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


उल्हासनगरासह गणपती, नवरात्रोत्सव, इतर कार्यक्रमांच्या वेळी ध्वनिप्रदूषणाने लहाने मुले, वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सरिता खेमचंदानी यांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात लढा पुकारला. त्यांच्या पुढाकारामुळे ध्वनिप्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या शहरातील गणेश व नवरात्र मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. अंबरनाथमधील शिवमंदिर फेस्टिव्हलमध्ये ध्वनिप्रदूषण केल्याने खेमचंदानी यांनी खासदार शिंदे यांच्याविरोधातही जनहित याचिका दाखल केल्याने, शिवसैनिकांची त्यांच्यावर नाराजी होती. याशिवाय सपना गार्डन येथील एका नवरात्र मंडळाने शनिवारी ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्याची माहिती खेमचंदानी यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती. एकूणच प्रकारामुळे त्यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेतला होता.


दरम्यान, खेमचंदानी यांनी सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी करणारी असल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. खेमचंदानी या हिंदूंच्या सणांना विरोध करतात. त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपायुक्त प्रदीप शेवाळे यांची भेट घेऊन केली. बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी, मध्यवर्ती, शिवाजीनगर आणि अंबरनाथ पोलीस ठाण्यांमध्ये खेमचंदानी यांच्याविरुद्ध कलम ५०० आणि ५०१ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.


पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला नाही. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास, ते मी पोलिसांच्या निदर्शनास आणून देते. त्यात काही गैर नाही. मात्र, ऐन नवरात्रीत एका महिलेविरोधात शिवसेनेने घेतलेला आक्रमक पवित्रा बघून धक्का बसला.
- सरिता खेमचंदानी, पर्यावरणवादी

Web Title: shivsena file complaint against environmentalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.