केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनीता राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 01:05 PM2018-05-09T13:05:58+5:302018-05-09T13:05:58+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

Shiv Sena's Vinita Rane elected KDMC mayor | केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनीता राणे

केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनीता राणे

googlenewsNext

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणा-या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी बुधवारी (9 मे) निवडणुकीच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले. 
यात शिवसेनेच्या विनिता राणे यांच्या गळ्यात महापौर पदाची तर भाजपाच्या उपेक्षा भोईर यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली. राणे या 13व्या महापौर ठरल्या आहेत. बुधवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली.  त्यासाठी शनिवारी (5 मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उल्हासनगरच्या सत्तांतराच्या राजकारणात भाजपा कल्याणमधील महापौरपदाचा दावा सोडेल, असे वृत्त लोकमतने दिले होते. 

त्याप्रमाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून विनिता राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु शिवसेना सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज सादर करणा-या भोईर यांनी महापौरपदासाठी देखील अर्ज भरला आणि तो सचिव जाधव यांना सुपुर्द केला. 

प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना भाजपामध्ये युतीचे चित्र दिसून आले असताना काही वेळातच घडलेली नाट्यमय घडामोड चर्चेचा विषय ठरली होती.  दरम्यान महापौरपदासाठी अर्ज दाखल करणा-या उपेक्षा भोईर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी केला होता. 

उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर भोईर आणि तानकी यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते तर दुसरीकडे भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी मात्र  निवडणुकीच्या वेळीच काय तो निर्णय होईल असे सांगत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर निवडणुकीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.

पालघरच्या घडामोडींचा परिणाम नाही!
पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत चिंतामण वनगा यांच्या मुलाला पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याने त्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. त्याचे पडसाद या निवडणुकीवर पडतील, असे काही नाराजांकडून पसरवले जात होते. मात्र मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या काळातही कल्याण-डोंबिवलीतील युती कायम राहिली होती. तेच सूत्र या निवडणुकीतही पाहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांत हे दोन्ही पक्ष गरजेनुसार निर्णय घेतात, हेच दिसून आले.

Web Title: Shiv Sena's Vinita Rane elected KDMC mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.