टिएमटी एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला, भाजपा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:08 PM2017-10-24T16:08:40+5:302017-10-24T16:14:46+5:30

ठाणे परिवहन सेवेवरील अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसमोर प्रथमच भाजपाने आपले पॅनल उभे केल्याने या निवडणुकीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.

Shiv Sena's reputation in the election of Timmable Employees Union, BJP for the first time in elections | टिएमटी एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला, भाजपा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात

टिएमटी एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला, भाजपा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ वर्षानंतर कामगारांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर लागली निवडणुकशिवसेना विरुध्द भाजपामध्ये रंगणार सामनाप्रचार पोहचला शिगेला, भाजपाची सर्वच फळी प्रचारातशिवसेनेची अस्तित्वाची लढाई

ठाणे - तब्बल १२ वर्षांनंतर विविध प्रकारच्या अडथळ्यांची शर्यत पार करीत ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टिएमटी एम्पलॉईज युनियनची निवडणुक लागली आहे. या निवडणुकीत मागील कित्येक वर्षे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाने प्रथमच या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आपले पॅनल उभे केले आहे. तसेच विद्यमान शरद राव प्रगती पॅनल देखील या निवडणुकीत या दोघांच्या समोर असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे. या ठिकाणी देखील शिवसेना विरुध्द भाजपा असाच काहीसा सामना रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरु झाली. त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टिएमटी एम्पलॉईज युनियनची स्थापना करण्यात आली. ही एक मान्यता प्राप्त युनियन असून या युनियनवर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवील पॅनलने कब्जा केला होता. या युनियनचे सल्लागार म्हणून आनंद दिघे आणि पहिले अध्यक्ष होण्याचा मान विलास सामंत यांना मिळाला. त्यानंतर, देवीदास चाळके आणि नंतर शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्याचाच वरचष्मा दिसून आला. परंतु सुमारे १२ वर्षापूर्वी शिवसेनेला या ठिकाणी जबरदस्त हादरा बसला. शरद राव यांच्या प्रगती पॅनलने प्रथमच या युनियनवर कब्जा केला. परंतु त्यांना संपूर्ण कब्जा मिळविता आला नाही. त्यामुळे परिवहनवरील आपली ताकद कमी न करण्यासाठी शिवसनेने येथे निवडणुक न घेण्यासाठी जोर लावला होता. प्रत्यक्षात दर पाच वर्षांनी ही निवडणुक होणे अपेक्षित होते. तसेच या निवडणुकीत परिवहनमधीलच कर्मचारी निवडणुक लढविणे अपेक्षित होते. परंतु शिवसेनेने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यानाच या युनियनचे पदाधिकारी केल्याने हा देखील एक वादाचा मुद्दा झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु यामध्ये कामगारांनीच स्वत: लढा देत, कामगारांच्या हितासाठी युनियनची निवडणुक होणे अपेक्षित होते. अशी बाजू त्यांनी लावून धरली आणि अखेर न्यायालयाने कामगारांच्या बाजूने कौल देत निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखविला. परंतु याला स्थगिती मिळविण्यासाठी देखील शिवसेना न्यायालयात गेली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.
अखेर तब्बल १२ वर्षानंतर ठाणे परिवहन सेवेत टिएमटी एम्पलॉईज युनियनची निवडणुक लागली आहे. या निवडणुकीत तीनही पॅनलमधून प्रथमच कामगार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेतलेल्या भाजपाने आपले विकास पॅनल प्रथमच या निवडणुकीत उतरविले आहे. त्यांचे ३७ पैकी ३० उमेदवार रिंगणात आहेत. तर त्यांचे नेतृत्व भाजपा माथाडी कामगार संघटनेचे नेते शिवाजी पाटील हे करीत आहेत. तर शिवसेनेच्या धर्मवीर पॅनलची जबाबदारी परिवहन समितीचे सभापती अनिल भोर यांच्या खांद्यावर टाकण्यात आली असून त्यांचे ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शरद राव प्रगती पॅनलची जबाबदारी रवि राव यांच्या खांद्यावर असून त्यांचे २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. भाजपाने प्रचारासाठी आमदार, सर्व नगरसेवकांची फळी या निवडणुकीसाठी प्रचारात उतरविली आहे. तर शिवसेनेने देखील पालकमंत्र्यांसह इतर मंडळी प्रचारात उतविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
येत्या २८ आॅक्टोबरला ही निवडणुक प्रक्रिया एनकेटी कॉलेजमध्ये पार पडणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल हाती पडणार आहे. त्यामुळे टिएमटीवर कोण कब्जा घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





 

Web Title: Shiv Sena's reputation in the election of Timmable Employees Union, BJP for the first time in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.