Shiv Sena's Opposition on BJP's efforts in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये भाजपाच्या प्रयत्नांवर शिवसेनेची दारोमदार
मीरा-भाईंदरमध्ये भाजपाच्या प्रयत्नांवर शिवसेनेची दारोमदार

- धीरज परब

मीरा रोड : ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात भाजपापाठोपाठ शिवसेनेचे वर्चस्व आहे. स्थानिक पातळीवर भाजपा व सेनेत असलेला सवतासुभा जगजाहीर असल्याने सेनेच्या राजन विचारे यांना निवडून आणण्यासाठी भाजपा आपली संपूर्ण ताकद लावेल का, याबद्दल साशंकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केल्यास, या पक्षाचे अस्तित्वच उरले नसल्याने आनंद परांजपे यांची संपूर्ण भिस्त काँग्रेस व नाईक कुटुंबीयांवर अवलंबून असणार आहे. २०१४ मध्ये संजीव नाईक असताना विचारे यांना ९६ हजार मते मिळाली होती. नाईक यांना ५३ हजार मतांवर युतीने रोखले होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ हा २००९ पासून अस्तित्वात आलाय. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी ६२ हजार १३ मते मिळवली होती. भाजपा-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना ५१ हजार ४०९ मते पडून पराभवास सामोरे जावे लागलं होतं. मनसेचे चंद्रकांत वैती यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत भाजपाच्या तिकिटावर मेहतांनी ९१ हजार ४४० मतं मिळवून मेंडोन्सा यांना पराभूत केले होते. मेंडोन्सा यांना ५९ हजार १५२ मतांवर समाधान मानावे लागले होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळी युती व आघाडी नसल्याने काँग्रेसचे उमेदवार याकुब कुरेशी यांना १९ हजार ४८० मतं मिळाली होती. तर, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे १८ हजार १४१ मतं मिळवून, चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती असल्याने सेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ९६ हजार ४६ मतं मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विद्यमान खासदार संजीव नाईक यांना अवघ्या ५३ हजार ६९८ मतांवर रोखण्यात युतीला यश आले होते. तसं पाहायला गेलं तर स्व. प्रकाश परांजपे हे येथून सतत खासदार म्हणून निवडून येत होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत आनंद परांजपे एकदा निवडून आले होते. परंतु, पुढे संजीव नाईक यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेससोबत आघाडी असल्याने परांजपे यांना खरा आधार मिळाला, तर तो काँग्रेसकडूनच मिळेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस व सहकारी अपक्ष मिळून सध्या १२ नगरसेवक या विधानसभा मतदारसंघात आहेत. माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस असलेले मुझफ्फर हुसेन यांच्यासह काही प्रमाणात काँग्रेसची संघटना बांधणी आहे. नयानगर व परिसरात काँग्रेसचा प्रभाव आजही आहे. त्यामुळे परांजपे यांची भिस्त स्वपक्षाऐवजी काँग्रेसवरच अधिक असणार आहे. गणेश व संजीव नाईक मैदानात सक्रियपणे उतरले, तर परांजपेंसाठी काहीशी आनंदाची बाब ठरू शकते.

याउलट, मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजपा आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपाचे तब्बल ४२ नगरसेवक आहेत. यावरून, भाजपाची या मतदारसंघातील ताकद लक्षात येते. शिवसेनेचे या मतदारसंघात अवघे नऊ नगरसेवक आहेत. त्यातही मीरा रोडमधील सेनेच्या अनिता पाटील व काँग्रेस आघाडीतील अपक्ष नगरसेवक अमजद शेख यांनी भाजपात प्रवेश केलाय. आणखी काही नगरसेवकांनासुद्धा फोडण्याची तयारी आ. मेहतांनी चालवली आहे. सेनेसह काँग्रेसला पालिकेतून हद्दपार करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे.

आ. मेहतांविरोधात पक्षांतर्गत व बाहेरसुद्धा नाराजीचा सूर असला, तरी पालिका आणि पक्ष दोन्ही त्यांनी आपल्या खिशात ठेवले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत वा पक्षाबाहेरील विरोधकांमध्येही मेहतांचा चांगलाच दबदबा आहे. मेहतांनी आपला एकछत्री अंमल कायम राहावा, म्हणून सेना आणि काँग्रेसला जेरीस आणले आहे. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे हातखंडे अवलंबले आहेत.

मेहतांनी सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तर सोडाच, खुद्द शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनासुद्धा धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. पालिकेतील सरनाईकांची महत्त्वाची कामंसुद्धा मेहतांनी रोखून धरल्याने, युती झाल्यानंतर राजन विचारे व सरनाईकांनी मेहतांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला होता. पण, मेहतांनी त्यालासुद्धा झुगारून लावत आपला ताठर पवित्रा कायम ठेवला आहे. विचारेंनी आचारसंहिता लागण्याआधी भूमिपूजन व उद्घाटनाचा धडाका लावला होता. त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमांची प्रसिद्धी करताना भाजपाच्या स्थानिकपासून केंद्रातील नेत्यांची छायाचित्रे व नावं टाकून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही भाजपाने फारशी दाद दिली नाही.

खासदारकीच्या काळात राजन विचारे यांनी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात भार्इंदर व मीरा रोडच्या रेल्वे प्रवाशांना सरकते जिने, लिफ्ट, लोकलसंख्येत वाढ, पादचारी पूल आदी सुविधा देण्याचा प्रयत्न केला; पण लांब पल्ल्यांच्या गाड्यांना भार्इंदर स्थानकात थांबा देणे शक्य झाले नाही.

शिलोत्र्यांच्या मिठागरमालकीचा केंद्र शासनाच्या अखत्यारीतील प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यासाठी प्रयत्न होताना दिसले नाहीत. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसह अन्य विविध योजना या मतदारसंघात राबवण्यासाठी विचारेंना केवळ भाजपाची सत्ता असल्याने पालिकेने सोबत घेणे टाळले का, असा प्रश्न विचारला जाणे साहजिकच आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटने आणि भूमिपूजनांचा सपाटाच विचारेंनी लावला होता. मच्छीमारांची राहती घरं व मासळी सुकवण्याच्या जागा यांच्या सातबारा नोंदी करण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी पत्र काढले असले, तरी आचारसंहिता लागल्याने काम सुरू झालेच नाही.

राजकीय घडामोडी
मीरा-भार्इंदरमध्ये आनंद परांजपे यांचा संपर्क तसा नगण्यच आहे. नाईक कुटुंबीयांना ओळखणारा व मानणारा वर्ग आजही आहे. पण, त्यांच्यापैकी कोणी उमेदवारच नसल्याने नाईक समर्थक वा स्वत: गणेश नाईक, संजीव नाईक हे परांजपे यांच्यामागे ताकद उभी करतील का, असा प्रश्न निर्माण झालाय.
एकेकाळी पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. पक्ष संघटना नाममात्र असून पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची भिस्त ज्यांच्यावर होती, ते गिल्बर्ट मेंडोन्सा शिवसेनेत गेले आहेत.

दृष्टिक्षेपात राजकारण
लोकसभेचा उमेदवार आपल्याच पक्षाचा हवा, असा मतप्रवाह भाजपात स्थानिक पातळीवर होता. भाजपा-सेनेची युती झाली नाही, तर आ. नरेंद्र मेहतांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चासुद्धा मध्यंतरी रंगली होती.
नरेंद्र मेहतांना पालिकेतच स्वारस्य असल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यतासुद्धा वर्तवली गेली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपाकडून सेनेच्या विचारेंना निवडून आणण्यासाठी किती प्रामाणिकपणे काम केले जाईल, याबद्दल साशंकताच आहे.
अशा परिस्थितीत भाजपाची मर्जी राखत त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे आव्हान सेनेला पेलावे लागणार आहे. सेनेने त्यासाठी कितीही प्रयत्न केला, तरी शहरात टोकाचा विरोध असताना भाजपालासुद्धा सेनेचे काम करणे अवघड जाणार आहे.

वाहतूककोंडी, परिवहनसेवेचा उडालेला बोजवारा, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांचा वाढता विळखा, उत्तन डम्पिंगचा प्रलंबित प्रश्न, उत्तुंग इमारतींच्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव, रखडलेली भूमिगत गटार योजना, पर्यावरणाचा होणारा प्रचंड ºहास, झोपडपट्ट्यांसह जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आदी एक नव्हे तर अनेक समस्यांनी या मतदारसंघाला ग्रासले आहे.
३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात चार लाख २२ हजार २५२ मतदार आहेत. त्यात दोन लाख २५ हजार ५६७ मतदार पुरुष, तर एक लाख ९६ हजार ६८४ स्त्री मतदार आहेत.
३० सैनिक मतदार व एक इतर मतदार आहेत. मतदारांच्या संख्येत काहीशी वाढ होणार आहे. या मतदारसंघात एकूण ४१६ मतदान केंद्रे व ११ सहायक मतदान केंदे्र आहेत.

 


Web Title:  Shiv Sena's Opposition on BJP's efforts in Mira-Bhayander
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.