ठाणे : शहरातील टेंभीनाका येथील दहीहंडीचे महत्त्व वाढवण्याकरिता एकच हंडी बांधा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली सूचना उच्च न्यायालयाच्या निर्बंध शिथिल करण्याच्या आदेशानंतर चक्क दुर्लक्षित करून चार नेत्यांच्या चार दहीहंड्या उभारण्याचा निर्णय झाला आहे.
न्यायालयाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून ठाण्यातील दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले होते. त्यामुळे ठाण्यात एकच मानाची हंडी उभारण्याची सूचना ठाकरे यांनी केली. फिफा अंडर सेव्हन्टीन वर्ल्ड कपचा माहोल याच एका दहीहंडीच्या ठिकाणी तयार करावा, असे ठाकरे यांचे मत होते. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी स्व. आनंद दिघे यांनी सुुरू केली होती. तीच एकमेव मानाची दहीहंडी असावी, असे ठाकरे यांचे म्हणणे होते.
ठाण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि उत्सवाची एक परंपरा आहे. ठाण्यातील गणेशोत्सव म्हटले की, काही मोजक्याच गणेश मंडळांची नावे समोर येतात. नवरात्र आणि दहीहंडी उत्सव म्हटले की, टेंभीनाक्याचेच नाव कुणाच्याही डोळ्यांसमोर येते. टेंभीनाक्यावरील दिघे यांची हंडी मानाची म्हणून ओळखली जाते. दिघे होते, तोपर्यंत ठाण्यात एकच मानाची हंडी उभारली जात होती. त्या ठिकाणी समस्त शिवसैनिकांची गर्दी होत होती. परंतु, त्यांच्या निधनानंतर टेंभीनाक्याच्या एका हंडीच्या चार हंड्या झाल्या. टेंभीनाक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील जांभळीनाक्यावर खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने दहीहंडी उत्सव सुरू केला. आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांनी दहीहंडी उत्सवाला एक वेगळा लौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांत हंड्या उभारून मतांची बेगमी करण्याचा मार्ग प्रशस्त केला. हळूहळू सेलिबे्रटींचा वावर, मीडिया हाइप करून व उंची-बक्षिसांची स्पर्धा यामुळे या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त करून देण्यातही त्यांचा वाटा आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीच्या उंचीवर न्यायालयाने मर्यादा घातल्यानंतर दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. गोविंदा पथकांची संख्यादेखील कमी झाली. न्यायालयाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक गोविंदा मंडळांनी थरांचा सराव सुरू केला नव्हता. ठाण्यातील शिवसेनेचेही न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. ठाण्यात चार दहीहंड्यांऐवजी टेंभीनाक्यावर एकच हंडी उभारावी, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन आमदार आणि एक खासदार यांची बैठक होऊन एकमताने घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.

हंड्यांची संख्या वाढावी, हीच दिघेंची इच्छा

न्यायालयाचा निर्णय आला आणि निर्बंध शिथील झाल्याने एका दहीहंडीच्या निर्णयाला बाजूला सारून पुन्हा चार दहीहंड्या लावण्याचे ठरले. यासंदर्भात ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना विचारले असता, असा कोणताच निर्णय झाला नव्हता. उलटपक्षी स्व. आनंद दिघे यांची शहरातील दहीहंड्यांची संख्या वाढावी, अशी भूमिका होती, असे शिंदे म्हणाले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.