भाजपच्या जात्यात आज आव्हाड तर उद्या शिंदे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 11:14 PM2019-06-09T23:14:51+5:302019-06-09T23:16:29+5:30

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भगवी लाट पुन्हा एकदा उसळली

Shinde tomorrow if the BJP is in the awakening? | भाजपच्या जात्यात आज आव्हाड तर उद्या शिंदे?

भाजपच्या जात्यात आज आव्हाड तर उद्या शिंदे?

googlenewsNext

अजित मांडके, ठाणे

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भगवी लाट पुन्हा एकदा उसळली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हीच लाट टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना विरोधकांना पाय रोवण्याकरिता इंचभरही जमीन मिळू न देण्याकरिता भाजप आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून वरिष्ठ पातळीवरील मंडळी प्रत्येक मतदारसंघावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघावर भाजप, संघाने पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात महापालिकेपासून लोकसभेपर्यंत केवळ भाजप आणि भाजपच शिल्लक राहील, या दिशेने भाजप व संघाचा प्रवास सुरू आहे. मुदलात दिल्लीत बसून गल्लीवरही ताबा मिळवण्यासाठी भाजप आणि संघाची मंडळी धडपडत आहेत. ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार व हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधात नेहमीच हिरिरीने भूमिका घेणारे राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड आता भाजप व संघाच्या रडारवर आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने ठाणे जिल्ह्यावर पुन्हा एकदा आपली पकड घट्ट केली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत २२० चे लक्ष्य गाठून ही पकड टिकवण्याकरिता व भविष्यात अधिक घट्ट करण्यासाठी शिवसेनेच्या आधीच भाजपने गूढ रणनीती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप तसेच संघाच्या विचारधारेच्या विरोधात बोलणाºया व कृती करणाऱ्यांची राजकीय कोंडी करण्याची खेळी त्या पक्षाच्या नेत्यांनी केली. तशीच काहीशी खेळी आता विधानसभा निवडणुकीतही केली जाणार असल्याचे भाजपचे नेते खाजगीत सांगत आहेत. त्यासाठी एक कृती आराखडा ठरवण्यात आला असून ज्याज्या मतदारसंघावर विरोधकांचे वर्चस्व आहे, ते मतदारसंघ पिंजून काढून तेथील विरोधी पक्षाच्या उमेदवाराची बलस्थाने आणि दुर्बलता जाणून घेण्यात येत आहे. मागील निवडणुकीत व अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघात भाजप कुठे कमी पडला, याची चाचपणी केली जात आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा कुशल रणनीतीचा आणि गनिमी काव्याचा अवलंब करून पराभव केला. तशीच पद्धत आता ठाणे जिल्ह्यातील विरोधकांची बलस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी राबवण्याकरिता भाजप आणि संघ सज्ज झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेस वरचढ आहे. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघ भाजपकरिता सोपा नाही, तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा हा किल्ला राखण्याकरिता आव्हाडांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे भिवंडीत सुरेश टावरे, ठाण्यात जितेंद्र आव्हाड तर नवी मुंबईत गणेश नाईक यांना धोबीपछाड देणे हे सध्या भाजपचे लक्ष्य आहे. ठाण्याचा विचार केला तर ठाण्यातील तीन मतदारसंघांवर शिवसेना आणि भाजपचा वरचष्मा आहे. लोकसभा निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना तब्बल २० ते २५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य आणखी वाढवण्याचा भाजपचा मानस आहे.

मात्र, ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदासंघावर भगवा फडकवणे हे भाजप नेत्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी या भागातील मंडळींबरोबर गुप्त बैठका घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाडांमार्फत कोणती विकासकामे झाली आहेत, कोणती कामे झालेली नाहीत व त्याचा राजकीय फायदा कसा घेता येऊ शकतो, याची चाचपणी सुरू आहे. आव्हाडांच्या विरोधात कुठल्या भागात नाराजी आहे व ती राजकीयदृष्ट्या आपल्या कशी पथ्यावर पडू शकते, याचाही आढावा घेतला जात आहे. भाजपला कळवा किंवा पुढील पारसिकनगर, खारेगावात कसा प्रतिसाद मिळू शकतो. भाजपला मिळणारा प्रतिसाद वाढवण्याकरिता काय करता येऊ शकते, याचाही अभ्यास सुरू आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाडांना पराभूत करायचे तर मुस्लिम उमेदवार द्यायला हवा की, हिंदू उमेदवार त्यांना धूळ चारू शकतो. ही जागा भाजपने लढवावी की, मित्रपक्ष शिवसेनेला सोडावी की, वंचित बहुजन आघाडीतील एमआयएमसारखा उमेदवार रिंगणात उतरवून मुस्लिम मतांच्या मतविभाजनातून आव्हाडांना पराभूत करणे सहज शक्य आहे, अशा सर्व शक्यतांचा अभ्यास करण्याकरिता ६०० स्वयंसेवकांचा ताफा भाजप, संघाने उतरवला आहे.

विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघ काबीज केला, तर पुढे २०२२ मध्ये महापालिका निवडणुका आहेत, त्या निवडणुकीत भाजपला कळवा, मुंब्रा आणि दिव्यात वाढण्याची संधी दिसत आहे. त्यामुळे लोकसभा किंवा आगामी विधानसभा निवडणुकीत युती करून लढणारा भाजप आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करेल, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळावर सत्ता प्रस्थापित केली. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेला युती करायला भाग पाडून ज्या पद्धतीने भाजपने छोटा भाऊ करून टाकले, तशीच काहीशी रणनीती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आखली जाऊन महापालिकेपासून लोकसभेपर्यंत केवळ भाजपचाच डंका वाजला जावा, याकरिता हे प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत दुसºयांदा भरघोस यश मिळाल्यावर आता भाजप विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना यश लाभलेले मतदारसंघ काबीज करण्याकरिता रणनीती आखण्याकरिता भाजप व रा.स्व. संघाचे स्वयंसेवक या मतदारसंघात पायपीट करीत आहेत.

विरोधकांना पाऊल ठेवायला इंचभरही जमीन लाभू द्यायची नाही, ही विधानसभा निवडणुकीतील रणनीती असली तरी २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गतवेळी स्वबळावर सत्ता प्राप्त करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या सत्तालालसेचा सामना करावा लागू शकतो.

कारण, महापालिकेपासून लोकसभेपर्यंत केवळ भाजपचा आणि भाजपचाच डंका वाजला पाहिजे, ही त्या पक्षाची सत्तालालसा लपून राहिलेली नाही.
 

Web Title: Shinde tomorrow if the BJP is in the awakening?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.