Sharad Joshi Passes Away | ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन
ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन

डोंबिवली -  निरपेक्ष भावनेने मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 
 
ग्रंथप्रसारक शरद जोशी
संगणक आणि खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची तसेच मराठी पुस्तकांची पहिलीच आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागत असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी वाचकांपर्यंत थेट पुस्तके पोहोचविण्यासाठी नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुस्तकांची चांगली विक्री होत असून त्यांच्या अनेक आवृत्याही निघत आहेत. वाचकांकडूनही या पुस्तकांना चांगली मागणी आहे. अक्षरधारा, साहित्ययात्रा आणि अन्य काही संस्था पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातूनही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र स्वत ग्रंथविक्रेते किंवा प्रकाशक नसतानाही केवळ मराठी साहित्य आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि दर्जेदार मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने जोशी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार संपूर्ण महाराष्टभर करत आहेत. आज वयाच्या ७३ व्या वर्षीही त्यांचे हे काम उत्साहाने सुरू  होते.ग्रंथप्रसारक शरद जोशी अशी त्यांची ओळख होती.
पत्रव्यवहारातून ग्रंथप्रसार आणि प्रचार हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या पदराला खार लावून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे हे ग्रंथप्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आजवर सुमारे पन्नास हजार पत्रे लिहिली आहेत. आपले मित्र, परिचित यांना किंवा कोणाला कुठला पुरस्कार मिळाला की त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवायचे आणि त्यात चांगल्या पुस्तकांची नावे, नुकतेच वाचलेले पुस्तक, त्याचे लेखक-प्रकाशक, पुस्तकाची थोडक्यात ओळख, वृत्तपत्रातून आलेली पुस्तकांची परीक्षणे आदी माहिती पत्रातून कळवायची. विविध साहित्यप्रेमी व्यक्ती, वाचक, पत्रकार, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांनाही पत्र पाठवून हा ग्रंथप्रसार केला आहे.केवळ ठाणे, मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्टातील काही भागांसह कोलकाता, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद येथे पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रातून हा ग्रंथप्रसार सातत्याने सुरू असतो.
पत्रलेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रातून मराठी साहित्य, लेखक, प्रकाशक तसेच एकूणच ग्रंथव्यवहाविषयी आलेले माहितीपूर्ण लेख, बातम्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्याही मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींमध्ये वाटणे, चांगली पुस्तके लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसंगी ओळखीच्या मंडळींकडे जाणे, त्यांना पुस्तकांविषयी माहिती देणे, ही पुस्तके त्यांनी विकत घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदी कामेही एकीकडे सुरुच असतात. महाराष्टातून प्रसिद्ध होणारी लहान मासिके, साप्ताहिके यांना ते सातत्याने नवीन मराठी पुस्तके, मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे वृत्त, निवडक पुस्तकांची ओळख करून देणारे स्फूट लेखन पाठवत असतात. अनेकवेळा ग्रंथप्रसाराबाबत पत्रके प्रसिद्ध करून ती विविध संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांना पाठवतात तर मोठ्या समारंभातूनही ही पत्रके वाटतात. एक होता काव्हर्र, डॉ. आल्बर्ट श्वाईट्झर, शापित यक्ष, प्रकाशाची सावली आणि अन्य अनेक पुस्तकांचा त्यांनी धडाडीने प्रचार-प्रसार केला आहे. 
मराठी पुस्तकांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे पुस्तके खरेदी केली जात नाहीत अशी लोकांकडून केली जाणारी तक्रार त्यांना मान्य नाही. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली हे जर मान्य केले तर त्याचा परिणाम मराठी पुस्तकांच्या किंमतीवरही होणारच.बरे महागाई वाढली म्हणून नाटक, चित्रपट पाहणे, सहलीला जाणे, मॉलमध्ये खरेदी करणे किंवा कपडे, हॉटेलिंग तसेच अन्य गोष्टींवर केला जाणारा आणि वाढता खर्च आपण कमी केला आहे का, त्या बाबत आपण कधी तक्रार करतो का, या गोष्टींवर एकावेळी पाचशे ते हजारो रुपये खर्च होतातच ना, मग मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी थोडे पैसे खिशातून गेले तर काय फरक पडतो, असे ते समोरच्याला सांगतात. घरगुती कार्यक्रम, लग्न, मूंज, वाढदिवस आदी प्रसंगी उत्तम पुस्तके भेट द्यावीत, असा त्यांचा आग्रह असतो आणि हे केवळ नुसते सांगणे नसते तर ते स्वतही वेळोवेळी पुस्तके भेट देत असतात.आयडियल बुक डेपोतर्फे देण्यात येणारा वामन देशपांडे पुरस्कृत संत नामदेव पुरस्कार, सन्मित्रकार स. पां. जोशी स्मृती पुरस्कार, दोंडाईचा येथील साहित्य मंडळ, स्नेहवर्धन प्रकाशन, नवचैतन्य प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, व्यास क्रिएशन्स आदी विविध संस्था व प्रकाशनांकडूनही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ललित लेखक अशोक बेंडखळे यांच्या जगावेगळी माणसं तसेच पत्रकार व लेखक श्रीनिवास गडकरी यांच्या जगावेगळं काहीतरी या पुस्तकात ग्रंथप्रसाराविषयी लेख आहेत.


Web Title: Sharad Joshi Passes Away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.