मराठीसाठी झटणारा वकील हरपला; ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 07:22 PM2018-06-09T19:22:56+5:302018-06-09T19:22:56+5:30

न्यायदान मराठीत व्हावे यासाठी दातार यांनी लढा दिला होता

Senior lawyer Shantaram Datar passed away | मराठीसाठी झटणारा वकील हरपला; ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांचं निधन

मराठीसाठी झटणारा वकील हरपला; ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांचं निधन

Next

डोंबिवली- प्रसिद्ध वकील शांताराम दातार यांचे आज शनिवारी सकाळी सहा वाजता राहत्या घरी आजारपणामुळे निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. न्यायदान मराठीत व्हावे यासाठी दातार यांनी लढा दिला होता. त्यांच्या निधनाने मराठीचा लढवय्या वकील हरपला असल्याची प्रतिक्रिया मराठी प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कल्याणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महाराष्ट्रात मराठीची होत असलेली गळचेपी आणि शासनाचे मराठीविरोधी धोरण या सर्व गोष्टींविरूद्ध आवाज उठवण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे दातार संस्थापक होते. दातार यांना पेशींचा कर्करोग होता. त्यावर ते दर सहा महिन्यातून उपचार घेत होते. दातार यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असले तरी त्यांनी मराठी भाषेसाठी कायम लढा दिला. येत्या 3 जुलैला ते आपल्या अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या मुलांकडे जाणार होते. विशेष म्हणजे आज दातार यांचा वाढदिवस होता. मात्र आजच काळानं त्यांच्यावर घाला घातला.  

अल्प परिचय
दातार यांचा जन्म 9 जून 1942 ला मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. ते लहान असतानाच त्यांच्यावरील पितृछत्र हरपले होते. त्यामुळे त्यांच्या पाच बहिणी आणि एक भाऊ यांनी त्यांचे संगोपन केले. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. निरनिराळ्य़ा ठिकाणी छोट्या- मोठ्या नोकऱ्या करून त्यांनी पुढे एल.एल.बीपर्यंतचे शिक्षण इंदूरमध्येच घेतले. वकिली व्यवसायाचा श्रीगणेशा मुंबईतून करायचा म्हणून 1968 साली ते आपल्या बहिणीकडे कल्याणमध्ये आले. दातार हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. तेव्हापासून त्यांना समाजसेवेची आवड होती. कल्याण येथे वकिली व्यवसायास सुरूवात केल्यानंतर त्यांनी 1970 मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व 1972 पासून जनसंघाच्या कामास सुरूवात केली. 1974 मध्ये ते भारतीय जनसंघाचे कल्याण शाखेचे उपाध्यक्ष झाले. जून 1975 मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. तेव्हा ते आणीबाणीविरूध्दच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता. 

आणीबाणी उठवल्यानंतर स्थापन झालेल्या तत्कालीन जनता पक्षाचे कार्यकर्ते, रामभाऊ म्हाळगी यांच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. ते भाषा सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य आणि महाराष्ट्र राज्याच्या विधी सल्लागार परिभाषा समितीचेही सदस्य होते. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी परिषदेचे आयोजन, वनवासी कल्याण आश्रमाचे अनेक वर्षे जिल्हा उपाध्यक्षपद, लहान मुलांमध्ये भगवतगीतेचा विचार रूजावा म्हणून भगवतगीता अभ्यास मंडळाच्या माध्यमातून भगवतगीतेचा प्रसार अशा अनेक विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. ते अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम पाहत होते. 

मराठीसाठी लढा
वकिली व्यवसायास सुरूवात केल्यानंतर त्यात कोणकोणत्या अडचणी येतात. त्यांची पूर्ण जाणीव ठेवून नवोदित वकिलांना ते नेहमीच मदतीचा हात देत असत. न्यायालयाचे कामकाज मराठीत चालावे यासाठी दातार यांनी मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेची स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासनाला अधिसूचना काढावी लागली.  ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा या पुस्तकाच्या निमिर्तीमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच दिवाणी दावा दाखल करण्यापासून तो चौकशीला न्यायलयासमोर येईपर्यंतच्या प्रक्रियेबाबतच्या मराठीमधील पुस्तकाचे ते एक प्रमुख लेखक आहेत. मराठी राजभाषा नियम 1966 मध्ये दुरूस्ती करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र शासनाने दोन महिन्यापूर्वी मराठीच्या न्यायव्यवहारासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीत दातार होते. त्यांनी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश या विभागाचा दौरा केला होता. त्यांचा अहवाल त्यांनी राज्य शासनाला सादर केला होता. कनिष्ठ न्यायालयात मराठीचा वापर केला जावा याकरिता अधिसूचना काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. उच्च न्यायालयात मराठी भाषा प्रधिकृत भाषा व्हावी म्हणून त्यांचे शासन दरबारी प्रयत्न सुरू होते.  
 

Web Title: Senior lawyer Shantaram Datar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.