पाणी विकून शिवसैनिक घर चालवतात, राष्ट्रवादीच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:38 AM2019-02-05T03:38:43+5:302019-02-05T03:39:04+5:30

कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

by selling water, runs Shivsainik's house - Jitendra Awhad | पाणी विकून शिवसैनिक घर चालवतात, राष्ट्रवादीच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा आरोप

पाणी विकून शिवसैनिक घर चालवतात, राष्ट्रवादीच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा आरोप

ठाणे - कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये कळवा पूर्वेतील भास्करनगर, वाघोबानगर, आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा या डोंगरपट्ट्यातील सर्वाधिक नागरिक सहभागी झाले होते. गेली २५ वर्षे ज्या पक्षाकडे ठाण्याची सत्ता आहे, त्या शिवसेनेने केवळ टक्केवारी मिळाली नाही, म्हणून धरणासाठी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत बिल भरणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी दिला. नगरसेवकासह अनेक शिवसैनिक महापालिकेचे पाणी विकून आपली घरे चालवित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष आहे. कळवा - खारीगाव - विटावावासीयांना आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन होत नसल्याने ठाणेकरांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने या जनआक्र ोश मोर्चाचे आयोजन केले होते. यात अनेक महिलांनी आपल्या हातात आणि डोक्यावर रिकामी मडकी घेतली होती. ती प्रभाग समिती कार्यालयासमोर फोडून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. संपूर्ण ठाणे शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली असून तिला सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे. २००२ मध्ये आघाडी सरकारने ठाण्यासाठी शाई धरण मंजूर केले होते. मात्र, येथील सत्ताधाºयांनी टक्केवारी मिळत नसल्याने हे धरण बांधण्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे हे धरण शासनाकडे गेले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमनची दादागिरी सर्वत्र सुरू असून ती आता सहन केली जाणार नाही. अशी दादागिरी करणाºयांची प्रभागातच धिंड काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रमिला केणी, महेश साळवी तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

आयुक्तांवरही टीका : शहरातील पाणीटंचाई दूर करायची असेल, तर इतर मोठे प्रकल्प बाजूला ठेवून आधी धरण बांधावे, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले. कळव्याबरोबरच संपूर्ण ठाणे शहरातच पाण्याची समस्या गंभीर असून मोठ्या प्रकल्पांवर पैसे खर्च करण्यापेक्षा धरण बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच कळवा पूर्व भागातील झोपड्या रंगवताना आयुक्तांबरोबर स्वत: उपस्थित असतानाही त्या रंगवण्यापेक्षा डोंगरपट्ट्यातील नागरिकांना पाणी द्या, अशी टीकाही आव्हाड यांनी आयुक्तांवर केली.

सायलेन्स झोनची ऐशीतैशी
सह्याद्री शाळेजवळ असलेल्या कावेरीसेतू या ठिकाणी मोर्चाला सुरु वात झाली. त्यानंतर, कळवानाक्यावरून कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी कळवा प्रभाग समितीच्या समोरच आव्हाड यांनी भाषण केले. कळवा प्रभाग समितीच्या बाजूला दोन शाळा असून पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर सायलेन्स झोन असतानादेखील या परिसरात पोलिसांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पाणी व कच-यातून शिवसेनेला पैसा

कळव्यातील एक शिवसेनेचा एक नगरसेवक महापालिकेचे पाणी विकून आपले घर चालवित असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. तो आपला मित्र असल्याने त्याचे नाव घेत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची घरे पाणी विकूनच चालत आहेत.

पाणी, कचरा यामधून शिवसेना पैसे कमावत आहे. त्यामुळे सामान्य ठाणेकरांचे हाल होत आहेत. आता हे हाल आम्ही सहन करणार नाही. जर, कळवा-खारीगाव-विटाव्यासह संपूर्ण ठाणे शहराची पाणीसमस्या निकाली काढली नाही, तर लाखोंचा मोर्चा ठामपा मुख्यालयावर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पाण्यासाठी भगिनींच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू आता आम्हाला पाहवत नाहीत. त्यामुळे आता आम्ही कायदा हातात घेऊन जनतेसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: by selling water, runs Shivsainik's house - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.