रेल्वेच्या रांगेत हुज्जत घालून ५८ हजारांच्या ऐवजाची लूट: महिलेसह तिघांना अटक

ठळक मुद्देठाणे रेल्वे स्थानकातील घटना चॉपरच्या धाकावर लुबाडले नौपाडा पोलिसांची कारवाई

ठाणे : रेल्वे प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या बाबासाहेब साटे (३४) या प्रवाशाबरोबर हुज्जत घालून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल असा ५८ हजारांचा ऐवज लुटणा-या जुगल विश्वकर्मा (२८), बबलू विश्वकर्मा (३२) आणि पूजा आशेरी या तिघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले आहेत.
नवी मुंबईतील तळवलीनाका येथील रहिवासी साटे हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ४ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ च्या बाहेर असलेल्या तिकीट काउंटरवर तिकिटासाठी उभे होते. त्याच वेळी जुगल आणि बबलू यांनी आमचे फोटो का काढतोस, असे कारण पुढे करून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर, त्यांना जबरदस्तीने पकडून त्यांच्या पॅण्टच्या खिशातील ५० हजारांची रोकड आणि आठ हजारांचा मोबाइल असा ऐवज त्यांनी जबरीने हिसकावून घेतला. त्यांच्यापैकीच एकाने चाकू दाखवून इथे थांबलास तर कापून टाकीन, अशी धमकीही त्यांना दिली. याप्रकरणी त्यांनी ५ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, अजय गंगावणे यांच्या पथकाने या तिघांनाही मंगळवारी अटक केली.
गस्त वाढविण्याची मागणी
मध्यरात्रीनंतर बाहेरगावी जाणाºया मेल एक्सप्रेस गाडयांची तिकीटे काढण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यावेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरुनही अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रकार घडतात. अलिकडेच केवळ झोपण्यासाठी जागा मिळण्याच्या कारणावरुनही रेल्वे स्थानक परिसरात एकावर खूनी हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. चॉपरच्या धाकावर लुबाडण्याचे प्रकारही घडत असल्यामुळे ठाणे नगर, नौपाडा आणि ठाणे रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे या परिसरात रात्री आणि दिवसाची पेट्रोलिंग मोठया प्रमाणात वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.