शिवसेना फुटण्याच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:57 AM2018-07-20T01:57:18+5:302018-07-20T02:00:25+5:30

संतप्त झालेल्या शिवसेनेच्या गटनेत्याने नगरसेविकेच्या पतीला शिवीगाळ केली.

rift in bhayandar shiv sena | शिवसेना फुटण्याच्या वाटेवर?

शिवसेना फुटण्याच्या वाटेवर?

Next

राजू काळे

भार्इंदर: विशेष समित्यांच्या ठरावाच्यावेळी बुधवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने भाजपाला आपला हेतू साधता आला. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या गटनेत्याने नगरसेविकेच्या पतीला शिवीगाळ केली. या प्रकाराने नगरसेविका नाराज झाली असून शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपानेच हे कुंभाड रचल्याचे बोलले जात आहे.
महासभेत विशेष समित्यांच्या स्थापना करण्याच्या ठरावावेळी सेनेच्या चार नगरसेविका अनुपस्थित होत्या. त्यामुळे भाजपाचे फावल्याने या समित्या स्थापन करण्यासाठी आवश्यक दोन तृतीयांश बहुमताने हा ठराव मंजूर झाला. यावेळी सेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षादेश बजावूनही त्यांनी मारलेली दांडी त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे महासभेनंतर सभागृहाबाहेर नगरसेविका कुसूम गुप्ता या नगरसेविकेचे पती संतोष यांना त्यांनी शिवीगाळ केली. त्यांनी संतोष यांच्यावर हात उचलून धक्काबक्कीही केली. आमगावकर यांनी केलेला प्रकार निंदनीय असल्याची चर्चा सुरू होती. तसेच संतोष यांनीही निषेध व्यक्त केला. गटनेत्यांनी विरोधी पक्षाच्या दालनात किंवा त्यांच्या कार्यालयात त्याची विचारणा करणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले.
या प्रकारामुळे गुप्ता दांपत्य तणावाखाली तसेच नाराज झाले असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. नगरसेविका कॅटलिन परेरा परदेशात गेल्या आहेत. अर्चना कदम व दीप्ती भट या दोघी आजारी असल्याने त्या अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात येत आहे. भट यांच्यावरही पक्षांतराचा आरोप केला असता त्यांचे पती शेखर यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्याचे त्यांनी सांगितले. महासभेसाठी कुसुम आलेल्या असतानाही ऐन ठरावाच्यावेळी त्या गायब झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. इतर अनुपस्थितांचे काय, त्याबद्दल गटनेते मूग गिळून गप्प का असा सवाल विचारला जात आहे.
सेनेच्या अनुपस्थितांसह काँग्रेसचे अमजद शेख व नरेश पाटील हे दोन नगरसेवकही अनुपस्थित राहिल्याने भाजपाच्या बहुमताला बळ आले. तरी एकट्या कुसूम गुप्ता यांच्यावरच रोष का हे अद्याप अस्पष्टच आहे.
या अनुपस्थितीच्या राजकारणातूनच सेना फोडण्याचा गनिमी कावा भाजपाकडून रचला जात असल्याचे बोलले जात आहे. सेनेचे काही नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजपात सातत्याने कुरघोडीचे राजकारण करत असते. वरिष्ठांच्या पुढे शक्तिप्रदर्शन करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असल्याने विरोधकांना कायमच डावलले जात असल्याचे पाहयला मिळते. बुधवारच्या घटनेमागे भाजपाच असल्याचे बोलले जात असले तरी सेना नगरसेवकांच्या गैरहजेरीबाबत आमच्या पक्षाचा संबंध नसल्याचे नेते सांगत आहेत.

शिवसेना व काँग्रेसचे अनेक नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर निश्चितच चित्र स्पष्ट होईल.
-आसिफ शेख,
भाजपा नेते

बुधवारी आमच्या शेजारच्या दुकानात चोरी झाली होती. त्याची तक्रार देण्यासाठी पत्नी कुसूम नवघर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. अर्ध्या तासानंतर त्या महासभेला आल्या. त्याची विचारणा न करताच गटनेत्यांनी शिवीगाळ करणे योग्य नाही. यामुळे नाराज असलो तरी पक्ष मात्र सोडणार नाही.
-संतोष गुप्ता, नगरसेविकेचे पती

सेनेचे सर्व नगरसेवक पक्षातच राहणार असल्याने शिवसेना फोडण्याचा भाजपाचा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
- शंकर विरकर, शिवसेना
उपजिल्हाप्रमुख

Web Title: rift in bhayandar shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.