चंदेरी दुनियेत काम न मिळाल्याने झाला रिक्षाचालक, अभिनयामुळे पोट न भरल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:42 AM2019-05-17T00:42:13+5:302019-05-17T00:42:30+5:30

चंदेरी दुनियेत प्रत्येकजण हीरो बनण्याची स्वप्ने घेऊन येत असतो.

Rickshaw driver due to lack of work in film-city | चंदेरी दुनियेत काम न मिळाल्याने झाला रिक्षाचालक, अभिनयामुळे पोट न भरल्याची खंत

चंदेरी दुनियेत काम न मिळाल्याने झाला रिक्षाचालक, अभिनयामुळे पोट न भरल्याची खंत

Next

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : नाटक, चित्रपट तसेच मालिकांत छोट्यामोठ्या भूमिका साकारणारा आणि या क्षेत्रात अद्यापही स्ट्रगलर लाइफ जगणाऱ्या ठाण्यातील रमेश चांदणे या कलाकाराने अर्थार्जनासाठी रिक्षाचा आधार घेतला आहे. ‘रेगे’, ‘ठाकरे’, ‘डी’ अशा अनेक चित्रपटांत झळकलेल्या चांदणे यांना अभिनय क्षेत्रात पूर्णवेळ काम मिळत नसल्याने अखेर रिक्षा चालवण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वत:ची रिक्षा विकत घेतली आहे.
चंदेरी दुनियेत प्रत्येकजण हीरो बनण्याची स्वप्ने घेऊन येत असतो. परंतु, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच, असे नाही. मग, अशातच छोटीमोठी भूमिका मिळते का ते पाहणे, कुठे आॅडिशन्स आहेत का, याचा शोध घेणे नाहीतर मग एखाद्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याकडे काम करणे, असे त्याचे स्ट्रगल सुरू असते. एखाद्या मालिका, चित्रपटात काम मिळाले, तरी ती मालिका बंद झाली किंवा चित्रपटाचे काम पूर्ण झाले, तर पुढे काम मिळेलच, याची शाश्वती नसते. मग, त्या कलाकाराला पोटापाण्याचा प्रश्न जाणवतो. रमेश यांनी कुटुंबासाठी अभिनयाकडे पाठ न फिरवता रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनय हे प्राधान्य असले तरी रिक्षा हे उपजीविकेचे साधन त्यांनी मानले आहे. मी नाटक, मालिका, चित्रपटात काम केले असले, तरी रिक्षा खरेदी करून ती चालवत असल्याचा मला अभिमानच वाटत आहे. मला रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटत नाही, असे रमेश यांनी सांगितले. २० वर्षांपासून रमेश या क्षेत्रात आहेत. शाळा, महाविद्यालयांपासूनच अभिनयाची त्यांना आवड होती. दिग्गज अभिनेते हे महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धांतूनच मोठे झाले, असे रमेश यांनी मासिकांत वाचले होते. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी नव्हे तर एकांकिका स्पर्धांत भाग घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘यदा कदाचित’ हे नाटक केले.

- पहिले नाटक, पहिली मालिका, पहिला चित्रपट हे माझ्यासाठी फ्लॉप शो ठरले. कधी शूट रद्द झाले तर कधी ठरलेली भूमिका रद्द झाली, असे रमेश यांनी सांगितले. अभिनय जीव की प्राण असल्याने कुठेही न डगमगता रमेश यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. ‘यदा कदाचित’ हे विनोदी नाटक सुरू असताना राम गोपाल वर्माच्या ‘डी’ चित्रपटात वास्तवदर्शी भूमिका ते बजावत होते.

- ‘रक्तचरित्र-२’, ‘चलचले’, ‘अतिथी तुम कब आओगे’, ‘हॉस्टेल’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘ठाकरे’, ‘फोर्स’, ‘तेरे बिन लादेन-२’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत, ‘रेगे’, ‘जत्रा’, ‘नशिबाची ऐशीतैशी’, ‘भैरू पैलवान की जय हो’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’ अशा अनेक मराठी चित्रपटांत, ‘जाणूनबुजून’, ‘यदा यदा ही धर्मस्य’, ‘बुवा भोळा भानगडी सोळा’, ‘पहिली भेट’, ‘आम्ही पाचपुते’, ‘आमचं सगळं सात मजली’, ‘साधू’ यासारखी अनेक नाटके, ‘वहिनीसाहेब’, ‘जयमल्हार’, ‘विठू माऊली’, ‘गणपती बाप्पा मोरया’ यासारख्या अनेक मालिकांत त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत.

- ही कामे पूर्णवेळ नसतात, मग उरलेल्या वेळात एखादी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चीच रिक्षा घेऊन ती चालवलेली बरी, असे रमेश म्हणाले. सकाळी ८ वाजल्यापासून दुपारपर्यंत रिक्षा चालवतो, मधल्या वेळेत जेवणाचा ब्रेक आणि मग रात्री ११ वाजेपर्यंत रिक्षा चालवतो, असे ते सांगतात. मला रिक्षा चालवता येत नव्हती, परंतु आधी मी रिक्षा चालवायला शिकलो. त्याचा परवाना काढला आणि मग ती रस्त्यावर आणली.

Web Title: Rickshaw driver due to lack of work in film-city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे