विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज! - मेधा पाटकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:31 PM2019-07-08T17:31:11+5:302019-07-08T17:33:15+5:30

विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज असे प्रतिपादन मेधा पाटकर यांनी केले. 

Rejecting Opposition and Caste - The Significance Program for Significating Politicalism - Medha Patkar | विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज! - मेधा पाटकर 

विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज! - मेधा पाटकर 

Next
ठळक मुद्देआपल्या प्रश्नांवर बोलणारा माणूस इथे घडतोय!विषमतेला नाकारणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज! - मेधा पाटकर  सहासष्ट विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार प्रदान!

ठाणे : समाजात अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार वाढत असतांना, एकलव्य पुरस्कार हा विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा प्रभावी उपक्रम आहे. हा उपक्रम सर्वत्र होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साथी मेधा पाटकर यांनी काल ठाण्यात बोलतांना केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित अठ्ठाविसाव्या एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

      अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकर्ते सुनील दिवेकर होते. संयोजक मनिषा जोशी यांनी प्रास्ताविक तर आधीची एकलव्य अनुजा लोहारने सूत्र संचलन केले. मेधा पाटकर भाषणात पुढे म्हणाल्या, ही संस्था निव्वळ  मदत देवून एकलव्यांना परावलंबी बनवत नाही. हे विद्यार्थी एका अर्थाने वंचित नसून स्वावलंबन व साधेपणाचे संचित त्यांच्याकडे आहे. या संचितामधून, सर्व समाजाला बरोबर घेत समृद्धी कडे नेण्याचा मार्ग ही संस्था एकलव्यांना दाखवत आहे. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजींचा वारसा पुढल्या पिढीकडे पोहोचवणारा हा कार्यक्रम सर्वत्र घेण्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. नर्मदेच्या घाटीत आदिवासी  व शेतक-यांसाठी चालविल्या जाणा-या जीवन शाळा व एकलव्य यांची लढाई एकच असल्याचे सांगत सरकारने केजी ते पीजी शिक्षण सर्वांना मोफत दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भारतीय संविधानाच्या कलम ४७ शी विसंगत सरकार दारूच्या व्यसनाला उत्पन्नाचं साधन बनवतं आणि विरोध केल्यावर, ते उत्पन्न आहे म्हणून शिक्षणावर खर्च करू शकतोय, असं सांगतं, तेव्हा सरकारला तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय, नव्हे तर सरकार शुध्दीवर आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला. शेवटी संस्थेचं अभिनंदन करतांना त्या म्हणाल्या, कोचिंग क्लासेसच्या बाजारात एकलव्य सक्षमीकरण योजनेतून समता विचार प्रसारक संस्था देत असलेले विचारधनच शिक्षणाची पुढील दिशा ठरवणार आहे!

आपल्या प्रश्नांवर बोलणारा माणूस इथे घडतोय!

         बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत। कसे रूजावे बियाणे, माळरानी खडकात। कवी मधुकर आरकडे यांच्या या ओळी. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणा-या ख-या एकलव्यांसाठी या ओळी समर्पक वाटतात या उद्गारांनी समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्य पुरस्कार कार्यक्रमात मार्गदर्शक कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी मनोगतारंभीच विद्यार्थ्यांची मने जिंकली. एकलव्यापुढे तत्कालीन परिस्थितीत धर्मसत्तेसोबतच गुरुंचा वर्चस्ववाद होता. आजच्या एकलव्याला मात्र धर्मसत्तेसोबतच, आर्थिक, राजकीय सत्तेचाही सामना करावा लागत आहे. किंबहुना तत्कालीन एकलव्यापेक्षा आजच्या एकलव्यापुढची परिस्थिती ही अधिक प्रतिकुल आहे. शिक्षण, आरोग्य, स्त्रीसक्षमीकरण, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था अशा मुद्द्यांना राज असरोंडकर यांनी आपल्या मनोगतात स्पर्श केला. शिकणासाठी लागणारं मनमोकळं वातावरण हे केवळ शिक्षण हक्क कायद्यात वाचायला मिळतं. प्रत्यक्षात मात्र कष्टकरी वर्ग शैक्षणिक सोयी सुविधांपासून वंचित असल्याचं दिसतं. अशा परिस्थितीत चव्वेचाळीस टक्के मिळवणारा सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणारा विद्यार्थी चौ-याण्णव टक्क्यांच्या बरोबरीचा वाटतो. अशा एकलव्यांसाठी काम करणा-या समता विचार प्रसारक संस्थेचं हे फलित आहे. एकलव्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या ओळखीत 'स्पष्टबोलणारा' ही ओळखही सद्यपरिस्थितीत फार महत्त्वाची आहे. कारण आज विद्याविभूषित लोकांनाही बोलण्याची विनंती करावी लागते. अशा परिस्थितीत आपल्या प्रश्नांवर बोलणारा माणूस घडवण्याचं काम समता विचार प्रसारक संस्था करतेय. देशाची लोकसंख्या खूप वाढतेय पण माणसं कमी होत चाललेत. समता विचार प्रसारक संस्थेचे एकलव्य ही माणसं जोडतील अशी आशाही राज असरोंडकर यांनी व्यक्त केली. 

 ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील सहासष्ट विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार प्रदान!

         अजय भोसले या पुर्वीच्या एकलव्य विद्यार्थ्याने आपल्यापेक्षा दैन्यावस्थेत जगणारी डंपिंग ग्राऊंडवरील मुले व दूर पाड्या - खेड्यात जगण्यासाठी लढणारे आदिवासी यांची अवस्था अधीक बिकट असल्याचे सांगत आपण समाजासाठी कार्यरत राहुयात. शोषण, अन्याय व दारीद्रय याविरूद्ध सर्व मिळून लढण्याचे आवाहन सर्वांना केले. यंदा महापालिका व जिल्हा परिषद शाळांमधील १०३ विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांना एकलव्य गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. यापैकी २१ विद्यार्थी प्रथम वर्ग, प्रावीण्यात उत्तीर्ण झाले. बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक भांडी  काम,कंत्राटी काम करणारे आहेत. बारा विद्यार्थी दहावीच्या वर्षीही स्वतः नौकरी करत शिकले. समता संस्कार शिंबीर, क्रीडा महोत्सव, वंचितांचा रंगमंच यात निम्म्याहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि चांगले गूण मिळाले आहेत. ठाणे महापालिका सावरकर नगर माध्यमिक शाळेतून पहिली आलेली स्मिता मोरे, मानपाड्याची गौतमी शिनगारे, उथळसर शाळेतील अय्युब खान, माजिवड्याची अक्षता दंडवते आदी विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देतांना संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. एकलव्य सक्षमीकरण योजनेतील शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या वतीने बोलतांना शैलेश मोहिले म्हणाले की, या यशात आमचा वाटा काही नसून सर्व श्रेय परिस्थितीशी झगडून यश मिळवणा-या एकलव्यांचेच आहे. यावेळी पती हयात नसतांनाही जिद्दीने शिकणा-या लढवय्या एकलव्य माता मिनाक्षी कांबळे यांचाही गौरव करण्यात आला. दिपक वाडेकर, दर्शन पडवळ, ओंकार जंगम आदींनी पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीचे सादरीकरण केले. लता देशमुखने गौरवपत्राचे वाचन केले. वंदना शिंदे, कल्पना देवधर, हर्षदा बोरकर, संजय पाटणकर, डाॅ. गिरीश साळगावकर, प्रदीप इंदुलकर, अॅड. जयेश श्राॅफ, तुकाराम नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त बिरपाल भाल तसेच अनेक मान्यवर हितचिंतक जसे अंनिसचे अविनाश पाटील, राष्ट्र सेवा दलाचे गणेश चिंचोले, आयपीएचच्या वैदेही भिडे, मुक्ता श्रीवास्तव, विलास गांवकर, सोनल भानुशाली, जयंत कुलकर्णी, जवाहर नागोरी, ऍड नीट कर्णिक, प्रा. वृषाली विनायक, प्रा. मीनल सोहोनी, संतोष पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते. जगदीश खैरालिया, हर्षलता कदम, लतिका सु. मो., कल्पना भांडारकर, राहूल सोनार, प्रवीण खैरालिया आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. 

Web Title: Rejecting Opposition and Caste - The Significance Program for Significating Politicalism - Medha Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.