ठाण्याच्या आगीतील वास्तव: अंगावरील कपडयाशिवाय काहीच उरले नाही...संसार उद्ध्वस्त

By जितेंद्र कालेकर | Published: December 12, 2017 10:37 PM2017-12-12T22:37:16+5:302017-12-13T00:02:02+5:30

ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

Reality in the fire of Thane: nothing remains except the clothes of the body ... all property is ruined | ठाण्याच्या आगीतील वास्तव: अंगावरील कपडयाशिवाय काहीच उरले नाही...संसार उद्ध्वस्त

ठाण्याच्या आगीतील वास्तव: अंगावरील कपडयाशिवाय काहीच उरले नाही...संसार उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देआगीमुळे १७ झोपडया बेचिराखशालेय पुस्तकांपासून भांडी, कपडे, पैसे दागिने सर्वच जळून खाकपंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी

ठाणे: अंगावरील कपडयाशिवाय आता काहीच उरले नाही.. सर्व संसार अगदी डोळयादेखत बेचिराख झाला. भांडी कुंडी, कपडे, शालेय पुस्तके वहया किंवा पैसा अडका काहीच शिल्लक राहिले नाही, असे वर्तकनगर परिसरातील भिमनगर येथील आगीत घरे भस्मसात झालेली सर्वच कुटूंबिय ‘लोकमत’कडे व्यथा मांडत होते. आता किमान शासनाने पंचनामे करावेत. तशी नुकसानभरपाई द्यावी, अशी माफक अपेक्षा या कुटूंबियांनी व्यक्त केली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ‘ग्लास्को’ कंपनीला लागूनच असलेल्या एका झोपडीत सुरुवातीला ही आग लागली. बघता बघता आगीने इतके रौद्ररुप धारण केले की, सिलेंडरचे एकामागून एक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे हे रहिवाशी सांगतात. आता कुठे मदत मागू, जे होते ते सर्व जळून नष्ट झाले. अगदी कपाटातील नाणी, गाठीला ठेवलेले ५० हजार आणि काही दागिने असे सर्वच जळाल्यामुळे मोठया चिंतेत असल्याचे जळालेल्या भांडयांकडे आणि आपल्या सामानाकडे हताशपणे पहात हातगाडीवर फेरीचा व्यवसाय करणारे संगमलाल गुप्ता आपली व्यथा मांडत होते. अर्थात, ही आग नेमकी कोणाच्या घरातून लागली, हे मात्र समजू शकले नसल्याचे हे रहिवाशी सांगतात. दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास जशी आग लागली तसे सर्वचजण जीवाच्या आकांताने पळत सुटलो, ते फक्त आपला जीव वाचविण्यासाठी. त्यावेळी कोणीही आपल्या सामानाची पर्वा केली नाही, रामेश्वर कांबळे सांगत होते. काही जण सांगतात तुमची अन्यत्र सोय आहे, ती कुठे ते माहिती नाही. त्यामुळे जे राहिले तेही सामान कुणी नेऊ नये, म्हणून आम्ही कुठेच गेलो नसल्याचे परमेश्वर कांबळे म्हणाले. आमचे काहीच सामान शिल्लक राहिले नसल्याचे जयप्रकाश गिरी, त्यांचे भाडेकरु विश्वास महाडीक, रमेश खिल्लारे, स्फूर्ती शेळके, मुकेशकुमार शर्मा, सोहनलाल दुबे, लता आगनावे आदी कुटूंबियांनी सांगितले. याठिकाणी आगीत १७ घरे जळाली असून या घरांमधील महिला, पुरुष आणि त्यांची लहान लहान मुले अशी ५४ कुटूंबिय अक्षरश: रस्त्यावर आली आहे.
भंगारामुळे आग भडकली? या घरांमध्ये बहुंतांश कुटूंब ही धुणी -भांडी करणारी, टेलर काम, पानी पुरी विक्रेते, बिगारी काम तर कोणी भंगार वेचकाचे काम करणारे आहेत. काहींनी घरात भंगार सामानाचा मोठा भरणा केला होता. दुपारी एखाद्याच्या घरातील दिवा कलंडल्यामुळे आग लागली, तशी या भंगाराच्या सामानांमुळे ती आणखी भडकल्याचेही काहीजण सांगतात. आग लागली त्यावेळी सुदैवाने यातील बहुतांश लोक कामावर होते, त्यामुळे जिवितहानी झाली नसल्याचे खिल्लारे कुटूंबियांनी सांगितले. रमेश आणि मनिष हे दोन भाऊ त्यांच्या पत्नींसह एका घरात राहतात. त्यांचेही भांडे, कपडे आणि शिलाई मशिन सर्वच जळून खाक झाल्याचे ते सांगत होते.
गुप्ता ४ मुलांसह रस्त्यावर याठिकाणी बहुतांश घरे ही भाडोत्रींची आहेत. मालक अन्यत्र वास्तव्याला आहेत. मोजकेच मालक आपल्या घरामध्ये वास्तव्याला आहेत. त्यापैकीच संगमलाल गुप्ता. गेल्या २० वर्षांपासून ते आपल्या या छोटेखानी घरात वास्तव्य करीत होते. पत्नीसह मोठा मुलगा शुभम (२१), राज (२०), गौरव (१७) आणि आर्यन (१६) या चार मुलांसह ते आता जळक्या कपाटाच्या बाजूला बसून रस्त्यावर आले आहेत.
माय लेक बचावले... या आगीत लता आबनावे यांच्या घरात ज्योती येडे ही अवघ्या २० दिवसांपूर्वीच प्रसुत झालेली विवाहिता तिच्या बाळासह सुदैवाने बचावली. आग लागल्याचे समजताच बाळासह तिने घराबाहेर धाव घेतल्यामुळे ती यातून बचावल्याचे रहिवाशी सांगत होते.
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेविका राधिका फाटक, विमल भोईर आणि नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांना दिलासा दिला. या सर्वांना तीन दिवस नाष्टा आणि जेवण तसेच राहण्याची सोय केली जाणार असल्याचे स्थानिक शिवसेना पदाधिकारी राजू फाटक यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
सिनेमात दाखविता तसाच स्फोट...
या आगीच्या प्रत्यक्षदर्शी शुभांगी गवाटे म्हणाल्या, सिनेमात दाखवितात तसाच भयंकर स्फोट होता. दुसºया स्फोटाच्या वेळी सिलेंडर हवेत उडाल्याचेही त्यांनी सांगत, कानठाळया बसणारा आवाज झाल्याचे सांगितले.
काय आहेत मुख्य मागण्या...
या रहिवाशांनी आगीचे पंचनामे व्हावेत, नुकसानभरपाई मिळावी, राहण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी किंवा धर्मवीरनगर येथे पालिकेचे संक्रमण शिबिर आहे, तिथे राहण्याची सोय करावी, अशा मुख्य मागण्या असल्याचे सांगितले.

 

Web Title: Reality in the fire of Thane: nothing remains except the clothes of the body ... all property is ruined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.