भाजपावाले गुजरातमध्ये ब्ल्यू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवताहेत - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 07:13 PM2017-11-18T19:13:43+5:302017-11-18T21:36:26+5:30

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आज  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Raj Thackeray'S rally in Thane | भाजपावाले गुजरातमध्ये ब्ल्यू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवताहेत - राज ठाकरे

भाजपावाले गुजरातमध्ये ब्ल्यू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवताहेत - राज ठाकरे

Next

ठाणे - पंतप्रधान असूनही नरेंद्र मोदी यांना गुजराती माणसांचे प्रेम असेल तर राज ठाकरे याने मराठी माणसांबद्दल प्रेम व्यक्त केले तर आम्ही संकुचित कसे, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीचा वापर होत नसल्यास त्या विरोधात आंदोलन करण्याचा आदेश शनिवारी मनसैनिकांना दिला. फेरीवाल्यांकडून मिळणारा हप्ता सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या खिशात जात असल्यानेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागून पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात बसवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

ठाणे व पुण्यातील मनसैनिकांवर फेरीवालाविरोधी आंदोलनाकरिता गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले व मोठ्या रकमेचे बाँड लिहून मागितल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज यांची सभा झाली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लक्ष्य केले. राज म्हणाले की, मोदी हे देशाचे पंतप्रधान असूनही केवळ गुजरातच्या विकासाचा विचार करीत आहेत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची जखम भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मोदींचे बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता देशातील जनतेच्या माथ्यावर कर्जाचा बोजा लादणे चुकीचे आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील बकालीचे उदाहरण देऊन राज म्हणाले की, जे मोदी वाराणसी स्वच्छ करु शकलेले नाहीत ते देश स्वच्छ करण्याची भाषा करीत आहेत.

'मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस आहे हिंमत?'

कर्नाटकमधील अधिका-यांना कानडी शिकण्याची सक्ती तेथील सरकारने केलेली आहे. तशी महाराष्ट्रात करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे का, असा सवाल राज यांनी केला. समृद्धी महामार्ग स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता बांधण्यात येणार असेल तर मी तो मध्येच तोडून टाकीन, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन केल्यामुळे रस्ते मोकळे झाले असून मुंबईकर व ठाणेकर आनंदी आहेत. मात्र अडीच लाख अनधिकृत फेरीवाल्यांकरिता सर्व पक्ष एकवटले आहेत. कारण दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचा हप्ता त्यांच्याकडून सर्व राजकीय पक्ष व सरकारला दिला जातो. रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाले बसवण्यास उच्च न्यायालयाने बंदी केली आहे. मात्र हा निकाल रद्द करवून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा दावा राज यांनी केला. फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन केल्याने मनसैनिकांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केल्याचा उल्लेख करुन राज म्हणाले की, भाजपाला सत्तेचा अमरपट्टा मिळालेला नाही. उद्या सत्ताबदल झाल्यावर दरोड्याच्या केसेस तुमच्यावरही पडतील.

ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे एक कोटी रुपयांचा जामिनदार मागितल्याचा उल्लेख करुन राज म्हणाले की, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यातील छत्तीसगड जागा झाला होता. कुठल्या कायद्यानुसार ही कारवाई केली असा सवाल त्यांना केला असता कुणाची हैसियत काय ते मी ठरवणार, असे उर्मट उत्तर त्यांनी दिले. भविष्यात आम्हीही त्यांच्यावर असेच मोठ्या रकमेचे दावे टाकू, असा इशारा राज यांनी दिला. हिंमत असेल तर सिंग यांनी पोलिसांवर हात उगारणा-यांना धडा शिकवावा, असे आव्हान त्यांनी दिले.
गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या सेक्स सीडीचा उल्लेख करुन राज म्हणाले की, भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरून राजकारण करीत आहे. राहुल गांधी हे जर भाजपाच्या मते पप्पू असतील तर त्यांच्या दौ-यामुळे भाजपाचे धाबे का दणाणले आहेत. आमच्या सभेच्यावेळी ठिकठिकाणचा वीज व केबल पुरवठा खंडीत केला जात असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकार डरपोक, बिनडोक असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका घेणा-या अभिनेते नाना पाटेकर यांचा समाचार घेताना राज यांनी केंद्र सरकारने दोन चित्रपटांवर बंदी घातली त्याबद्दल पाटेकर हे गप्प का आहेत, असा सवाल केला. महाराष्ट्रात १५ वर्षांपूर्वीचा सर्वधर्म समभाव पुन्हा आणणार असाल तर हा राज ठाकरे पहिला हात पुढे करील. मात्र काही वेगळे करु पहाल तर हाच हात उठेल, असा इशारा राज यांनी अखेरीस दिला.

'भाजपाकडून गुजरातमध्ये ‘ब्लू फिल्म’ दाखवून प्रचार'

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी मनसेने महाराष्ट्राची 'ब्लू प्रिंट' दाखवून प्रचार केला. भाजपाकडून गुजरातमध्ये ‘ब्लू फिल्म’ दाखवून प्रचार केला जातो आहे,  अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी भाजपावर केली.  गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याची कथित सेक्स सीडी बाहेर आली. यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली.  एवढेच नाही तर काँग्रेसच्या राहुल गांधींना ‘पप्पू’ समजता तर मग भाजपाच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे? असा प्रश्नही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.  

'तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत'

तसेच तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत हे लक्षात ठेवा असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. मनसेला एकटे पाडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे. मात्र महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे हे विसरू नका असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. मनसेने एकही आंदोलन चुकीच्या गोष्टीसाठी केलेले नाही आमचे प्रत्येक आंदोलन जनतेच्या प्रश्नांसाठीच आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
 
पानसे, पाटील नेते तर जाधव जिल्हाध्यक्ष
मनसेचे अभिजीत पानसे व राजू पाटील यांची मनसेच्या नेतेपदी तर मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा राज यांनी केली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- मनसेने विधानसभा निवडणुकीत ब्ल्यू प्रिंट आणली होती, भाजपावाले गुजरातमध्ये  ब्ल्यू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवत आहेत.
- हार्दिक पटेलच्या क्लिप समोर आणल्या, त्याचं आयुष्य आहे.
- कायदा मोडतात त्यांच्याविरोधात मनसेने आतापर्यंत आंदोलनं केली, आमच्याविरोधातच कायदा मोडला म्हणून केसेस का?.  जामिनासाठी एक कोटींचा बॉण्ड कसा मागता?  
- भाषण असल्यावर वीज बंद करावी लागते, केबल बंद करावे लागतात ही तुमची ताकद आहे, भाजपावर राज ठाकरेंची टीका 
- मनसेची सभा आहे माहिती आहे गर्दी, जागा जास्त लागते हे पोलिसांना समजायला हवं  

मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना मारहाण

स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत. 
21 ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली. 

त्यानंतर, फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे प्रारंभी एक कोटींच्या जामीनदाराची मागणी करणारी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती. 

Web Title: Raj Thackeray'S rally in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.