भाजप प्रवेशाकरिता सेनेच्या भोईर कुटुंबावर दबाव, राजू भोईर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:17 AM2019-05-10T01:17:45+5:302019-05-10T01:18:28+5:30

काशिमीरा भागातील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर, बंधू विरोधी पक्षनेते राजू भोईर आणि त्यांची नगरसेविका असलेली पत्नी भावना भोईर या तिघांवर भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता दबाव होता.

The pressure on the Bhoir family for the BJP's entry, the claim of Raju Bhoir | भाजप प्रवेशाकरिता सेनेच्या भोईर कुटुंबावर दबाव, राजू भोईर यांचा दावा

भाजप प्रवेशाकरिता सेनेच्या भोईर कुटुंबावर दबाव, राजू भोईर यांचा दावा

Next

मीरा रोड : काशिमीरा भागातील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर, बंधू विरोधी पक्षनेते राजू भोईर आणि त्यांची नगरसेविका असलेली पत्नी भावना भोईर या तिघांवर भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता दबाव होता. मात्र त्या दबावाला जुमानत नसल्याने कमलेशला लाचखोरीच्या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोप राजू भोईर यांनी केला. ज्या प्रकरणात लाच घेताना कमलेश यांना पकडले त्या तक्रारदारासोबत भाजपचा पदाधिकारी कारवाईकरिता सक्रिय होता, याकडे राजू यांनी लक्ष वेधले.

मुंशी कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे चालतात. तेथे भाजपचे मोहन म्हात्रे, वीणा भोईर आणि सुरेखा सोनार, तर शिवसेनेचे कमलेश भोईर असे चार स्थानिक नगरसेवक आहेत. या भागातील मुमताज चाळीत राहणारे रामप्रसाद प्रजापती यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. आजूबाजूला सर्वांनीच घरावर एक मजला बांधून घेतला म्हणून रामप्रसाद यांनीसुध्दा वरच्या मजल्याचे काम सुरु केले.

फिर्यादीत नमूद माहितीनुसार, दि. ३० एप्रिल रोजी रामप्रसादचा मित्र निहाल खान याने पोटमाळा बांधतोय म्हणून तुला नगरसेवक कमलेश भोईरने बोलावल्याचा निरोप दिला. निहालच्या सांगण्यावरुनच रामप्रसाद त्याच्यासोबत कमलेशला भेटला. कमलेशने त्यावेळी २५ हजारांची मागणी केली होती. तेव्हापासून ठाणे लाचलुपत प्रतिबंधक शाखेकडे तक्रार करण्यापासून लाचेची १० हजाराची रक्कम कमलेशला भेटून मग मध्यस्थाला देताना रंगेहाथ पकडून देईपर्यंत निहाल सोबतच होता.

वास्तविक, निहाल खान हा भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हा सचिव असून, त्याचे याच भागात कार्यालय आहे. तो भाजप नगरसेविका विणा यांचा समर्थक आहे. विणा व कमलेश भोईर यांच्यात आधीपासूनच वाद आहेत. रामप्रसादच्या घरालगत भाजपचा कार्यकर्ता असलेल्या रामलखन प्रजापती याने वाढीव बांधकाम केले होते. तेव्हा कमलेश यांच्या तक्रारीवरुन पालिकेचे पथक कारवाईला आले होते. विणा यांनी विरोध केल्याने पालिकेने कारवाई केली नाही. तक्रारदार रामप्रसाद व रामलखन निकटवर्तीय आहेत.

भोईर कुटुंबाला भाजपमध्ये घेण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी पालिका निवडणुकीआधीपासून सतत प्रयत्न केले होते. पालिका निवडणुकीनंतर भोईर कुटुंबियांची मीरा गावातील हनुमान मंदिराशेजारची तीन मजली अनधिकृत इमारत पालिकेने पाडली होती. या इमारतीची तक्रार भाजप पदाधिकारी गजानन नागे, मुकेश मेहता यांनी केली होती, याकडे राजू यांनी लक्ष वेधले. त्यानंतर प्लेझेंट पार्क भागातील भोईर कुटुंबियांच्या सर्व्हे क्र. १५ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा भराव केल्याची तक्रार भाजप पदाधिकारी प्रवीण पाटील, नागे व मेहतांनी केली होती. या प्रकरणात भोईर कुटुंबियांना दंड भरावा लागला होते. त्यामुळे रामप्रसादला घेऊन कमलेशला भेटण्यापासून लाच घेताना अटक करवण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे पदाधिकारी निहाल खान यांचा सहभाग व यापूर्वी झालेल्या तक्रारी व त्यामागील भाजप पदाधिकारी हेच तक्रारदार असणे हा निव्वळ योगायोग नसल्याचे राजू यांना वाटते.

महापालिका निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपकडून मी, माझी नगरसेविका असलेली पत्नी भावना आणि नगरसेवक भाऊ कमलेश यांना भाजपत प्रवेश करण्यासाठी तगादा लावला जात होता. मात्र, आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा सर्व नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून आमच्या मागे भाजपची मंडळी लागली होती. आम्ही ऐकत नाही म्हणून वडिलांच्या नावे असलेली इमारत पाडण्यात आली. भरावापोटी महसूल विभागाकडून मोठा दंड लावण्यात आला. या सर्व प्रकरणात तक्रारदार हे भाजप पदाधिकारी आहेत, हा केवळ योगायोग असू शकत नाही. पालिका आणि महसूल विभागावर भाजपचा दबाव असल्याने आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली नाही. आता कमलेश यांना लाच प्रकरणात गोवण्यामागे भाजपचा पदाधिकारी असल्याचे समजले आहे. भाजपत प्रवेश करीत नाही म्हणून विविध प्रकारे त्रास दिला जात आहे.
- राजू भोईर, विरोधी पक्षनेता तथा कमलेश यांचे भाऊ

कमलेश यांच्या अटकेची घटना दुर्दैवी आहे; पण तक्रारदारासोबत भाजपचा पदाधिकारी आहे, याची माहिती नव्हती. भाजपचा यात काही संबंध नाही.
- हसमुख गेहलोत, गटनेते, भाजप

तक्रारदारासोबत भाजपचा पदाधिकारी असला म्हणजे भाजपचा संबंध आहे, असे थेट म्हणणे चुकीचे आहे. कमलेश यांना विरोधकांनी संगनमत करून गोवले असून, सखोल चौकशी करून सत्य समोर आणले गेले पाहिजे.
- हरिश्चंद्र आमगावकर, गटनेते, शिवसेना

Web Title: The pressure on the Bhoir family for the BJP's entry, the claim of Raju Bhoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.