Police Rejected Permission to New year celebration | नववर्ष स्वागतयात्रेच्या आनंदावर विरजण? पोलिसांनी नाकारली परवानगी
नववर्ष स्वागतयात्रेच्या आनंदावर विरजण? पोलिसांनी नाकारली परवानगी

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे  - गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाते. याच स्वागतयात्रेचाच भाग म्हणून शहरांतील विविध ठिकाणी उपयात्राही काढल्या जातात. घोडबंदरवासियांना या स्वागतयात्रेत सहभागी होता यावे म्हणून घोडबंदर रोड, ठाणेतर्फे त्या ठिकाणी नव्याने काढण्यात येणाऱ्या उपयात्रेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे आयोजकांसह उपयात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे गेली १८ वर्षे नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली जाते. कौपिनेश्वर मंदिरापासून तिची सुरुवात होत असते. ठाणे शहर हे मोठे असल्याने प्रत्येक ठिकाणांतील नागरिकांना यात सहभागी होता येत नाही. म्हणूनच त्या त्या विभागांची उपयात्रा याच दिवशी काढली जाते. यंदा प्रथमच घोडबंदर रोड, ठाणे यांच्यावतीने वाघबीळ आणि कासारवडवली या भागांत उपयात्रा काढली जाणार आहे. तिचे पदाधिकारी महिन्याभरापासून याची तयारी करीत आहेत. वाघबीळ येथील उपयात्रा ही पलाशिया संकुलापासून सुरू होऊन टीजेएसबी सर्कलजवळ समाप्त होणार आहे. कासारवडवली येथील उपयात्रा राम मंदिरापासून सुरू होऊन सरस्वती विद्यालय येथील मैदानाजवळ समाप्त होणार आहे.
या उपयात्रेत सहभागी होणारे घोडबंदरवासीय हे ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहे. दोन्ही ठिकाणी अंदाजे ५०० नागरिक सहभागी होण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उपयात्रेचे आयोजक परवानगीसाठी कासारवडवली पोलिसांत गेले असता त्यांनी एनओसी दिलेली नाही, असे आयोजक दिनेश ठाकूर यांनी सोमवारी स्वागतयात्रेच्या बैठकीत सांगितले. आमची सगळी तयारी झाली आहे. परंतु, पोलीस आम्हाला नविन स्वागतयात्रा सुरू करण्याला परवानगी देत नाहीत, एकाच जागी ही स्वागतयात्रा आयोजित करा, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, स्वागतयात्रा ही एकाच जागी कसे काय काढणार? तसेच, नविन मार्गावरून ती नेता येणार नाही असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या उपयात्रेत सहभागी होण्यासाठी घोबंदरवासीय जे उत्सुक आहेत, त्यांनाही स्वागतयात्रेत सहभागी होता यावे, इथेही संस्कृती जोपासली जावी, या उद्देशाने ही उपयात्रा काढत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रचंड नाराज झालेले हे घोडबंदरवासीय पुन्हा एकदा परवानगीसाठी पोलीस स्टेशनच्या दारी जाणार आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.

या उपयात्रेला परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. आम्ही कोणताही अडथळा आणणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात येणार आहे. परवानगीसाठी त्यांना विनंती करू. - विद्याधर वालावलकर,
विश्वस्त, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास

याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना विचारणा केली असता, त्यांनी तुम्हाला जे छापायचे ते छापा, माझे यावर काहीही म्हणणे नाही, असे लोकमतला सांगितले.


Web Title: Police Rejected Permission to New year celebration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.