ठाणे : मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बजावलेल्या एक कोटीच्या हमीदाराच्या नोटिशीत सुधारणा करत ती मंगळवारी पाच लाखावर आणण्यात आली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि इतर पदाधिकाºयांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यावर ही रक्कम घटवण्यात आली.
फेरीवाल्यांविरुद्ध पुन्हा मनसेतर्फे आक्रमक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीसाठी जाधव यांच्याकडे एक कोटीच्या हमीदाराची मागणी करणारी नोटीस नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी बजावली. तिला सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत आहे. ही नोटीस आल्यावर नाराजीचा सूर उमटताच मनसेचे नेते नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ही हमीची रक्कम घटवून पाच लाख करण्यात आली. त्याविरोधातही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नंतर नांदगावकर म्हणाले.
अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. अध्यादेश सरकारचा आहे. हे काम पालिका, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी करायला हवे होते. ते आमच्या मनसैनिकांनी केले. आम्ही १५ दिवसांची मुदत रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्याने आंदोलन झाले. त्यामुळे एक कोटीची हमीची रक्कम रेल्वे प्रशासनाने भरायला हवी, कोणत्याही कायद्यात अशा हमी रकमेचा उल्लेख नाही, याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले.
पोलिसांचा मनसैनीकांबाबत असाच दृष्टीकोन राहिला, तर अनेक मनसैनिक तडीपार होतील, अशी भीतीही या नेत्यांनी व्यक्त केली.